पुस्तक अगदी छोटसं आहे. एकूण नऊ कथा आहेत. त्याआधी लेखिका अरुणा ढेरे यांच्या विषयी थोडक्यात- कथा, कादंबरी, ललित लेख, अनुवाद, समीक्षा, लोकसाहित्य, सामाजिक, इतिहास पर, कुमारांसाठी, किशोरांसाठी इतका व्यासंग लाभलेल्या कवियीत्री अरुणा ढेरे. ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध साहित्य डॉ. राची ढेरे यांचीही सुकन्या .यांना बाळकडूच मिळाले साहित्यरसाच .मराठी साहित्यातील दांडग्या अभ्यासक म्हणून नावारूपाला आल्या. त्यांचे अतिशय गाजलेलं पुस्तक कृष्ण किनार आहे तर ते आपल्या अगदी हृदयाजवळ आहे.
पावसानंतरच ऊन हे पुस्तक देखील तितकच सुंदर आणि छोट्या स्वरूपात आहे प्रत्येक कथा मनाला भावणारी आणि विचार करायला लावणारी आहे .काही कथा नव्या विचारांच्या आहेत तर काही कथा या जुन्यातूनच नवं जगणं कसं शोधावे हे शिकवणारया आहेत. पावसानंतरच ऊन म्हणजे मनाला मिळालेला गारवा जसं की रात्री बराच पाऊस पडून गेलेला गॅलरीतील कुंड्यांवर छान शिडकाव झालेला सकाळचा ताज होऊन मनाबरोबर शरीरालाही निवांत करत आणि चहाचा मंद सुवास आणि अचानक कोणीतरी हातात तो आणून द्यावा बस आता आयुष्यात काही नको अशीच काहीशी जीवन कहाणी आहे या कथा नकांची *एखादा पावसाचा शिडका व्हावा आणि आणि कोवळं ऊन सुखावून जावं अगदी तसं
पहिली कथा- ओळख- स्वतःची ओळख शोधणारी, नात्यांच्या पलीकडे जाऊन स्वीकारणं, समजून घेणं, सोसण, सावरणं, कसलं दुःख आपल्या वाट्याला आलं आहे? उमग नाही ,अंत नाही, आकार नाही, रंग नाही वास नाही,चव नाही. एक अवाढव्य काळ ओझं, चिनूस टाकणार, घुसमटून टाकणार, त्याबरोबर एक सत्य आणि आपण स्वतः त्यातून निर्माण झालेली ओळख आणि तिची ती कथा.
दुसरी कथा- नवरात्र कथा एक सून, नव अंकुर बीज पोटी फुलतोय जणू ही घटस्थापनेच्या स्वरूपात सांगितले आहे. एक स्त्री तशीच ही पृथ्वी तिची गर्भधारणा म्हणजे नऊ दिवसाचे व्रत तिच्या कुशीतून जन्म घेणारे धान्य बीज पेरायचं ते वाढतं नऊ महिन्याचं ते प्रतीक म्हणून नऊ दिवस आपण ते वाढवायचं व्रतासारखं ते सांभाळायचं मग शेवटी पूर्णत्वाला गेले की आनंद उत्सव साजरा करायचा. दसऱ्यासारखा सुनेच्या पोटीही ते बीज अंकुरते. आणि ती ते अनुभवते.
तिसरी कथा- नवीन. कथेत नव्या दमाची तरुणाई आणि जुन्या विचारांची पिढी. त्यांनी ह्या पिढींशी एकरूप व्हावं आणि इतर जाती पंथांच्या सुना-मुलींची जुळवून घ्यावे ही सांगणारी नवी पिढी. आता काळ आला आहे की दोन्ही पिढ्या आपले हात एकमेकांच्या हातात गुंफून आनंदाने राहावे.
अशा प्रकारे प्रत्येक कथा वेगळी आहे. आशावाद आणि जगणं यामधील दुवा कसा शोधावा आणि स्वतःला शोधून आपलं जग कसं निर्माण करावं हे समजतं.
पावसानंतरच पडणार कोळवून कसं हवं असं वाटतं अगदी तसंच जीवनात येणाऱ्या चढ उतारा नंतर येणारा आनंदी क्षण देखील लोभस वाटतो गजबजलेल्या ढगांमधून एखादी उन्हाची तिरप चेहऱ्यावर घेताना रोमांचिक होतं अगदी तसंच असतं हे पावसानंतर ऊन म्हणून प्रत्येकानं एकदा तरी वाचावं असं आहे
परिचय : सुश्री अर्चना माने
सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “निशाशृंगार” (कविता संग्रह) – कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
पुस्तक परिचय
पुस्तक – निशाशृंगार
लेखिका – सौ.राधिका भांडारकर
कवी – डाॅ. निशिकांत श्रोत्री
प्रकाशक – शॉपीझेन प्रकाशन
किंमत -₹१६५/-
निशाशृंगार या एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा परिचय वाचकांसमोर सादर करताना मला फार आनंद वाटत आहे. साहित्याचे विविध प्रकार आजपर्यंत वाचनात आले, परंतु एकाच पुस्तकात कविता आणि त्याचे रसग्रहण अशा स्वरूपाचे पुस्तक माझ्या वाचनात प्रथमच आले. या पुस्तकात सिद्ध हस्त लेखिका सौ. राधिका भांडारकर यांनी डॉ. निशिकांत श्रोत्री या गुणवंत कवीच्या निशिगंध या काव्यसंग्रहातून १६ निवडक कविता घेऊन प्रत्येक कवितेवर अत्यंत समर्पक आणि बहारदार असे भाष्य केले आहे. या सर्व सोळा कविता भावगीत या काव्य प्रकारात मोडणाऱ्या असल्यामुळे त्या गेय आहेत. त्यातील भाव वाचकांपर्यंत पोहोचतात आणि त्या गीतातील रसास्वाद राधिकाताईंच्या रसग्रहणामुळे अधिक गोडीने घेता येतो.
भावगीत म्हटले की पटकन मनात येणारा भाव प्रीतीचाच ! मग ते प्रेम पती-पत्नीचे असेल, प्रियकर प्रेयसीचे असेल किंवा निसर्गातील चराचर सृष्टीचे असेल. त्यात भेटीची आतुरता, मिलनातील तृप्तता, प्रतीक्षेत झरणारे डोळे, हृदयाची स्पंदने हे सर्व भाव येणारच. तसेच नवरसांचा राजा म्हणून ज्या शृंगार रसाचा गौरव करावा त्या रसाचा परिपोष करणारी ही सर्व भावगीते.
निशाशृंगार ही डॉक्टरांची रसग्रहणासाठी घेतलेली पहिलीच कविता. चंद्र आणि निशा, रजनी यांच्या प्रेमातील धुंदी दर्शविणारी ही भावकविता.
रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली
धुंदीस बघुनी हवा कुंद झाली
तृप्त शशांक धन्य ती रजनी
संपन्न हो प्रीतीचा हा वसा
या ओळी वाचून वाचकांच्याही प्रणय स्मृती जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत. त्या धुंद करणाऱ्या प्रणयाच्या गोड आठवणींनी मनावर हळुवार तरंग उठल्यासारखे वाटतात. राधिका ताईंनी या भावगीता विषयी, ” हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं.” असं जे लिहिलं आहे ते शंभर टक्के पटणारे आहे. राधिका ताई म्हणतात त्याप्रमाणे खरोखरीच कविता वाचताना खजुराहोची तरल प्रणय क्रीडेची शिल्प पाहत आहोत असा भास होतो.
थकलेली पहाट या दुसऱ्या कवितेत दोन प्रेमी जीवांचे अत्युच्च, उत्कट मिलन नजरेसमोर आले. शृंगारात चिंब भिजलेली अशी ही कविता, परंतु कुठेही उत्तानता नाही. एका नैसर्गिक क्षणाचे हे नितळ असे चित्र आहे असे मला जाणवले. नुसती एकदा वाचून कविता वाचकाला किती समजू शकते हे नाही सांगता येणार,परंतु राधिका ताईंचे या कवितेचे रसग्रहण वाचले की एकेका शब्दातील भाव स्पष्ट उमगतात. कवितेविषयीच्या प्रस्तावनेत त्या वाचकांना सांगतात, “मला या काव्यरचनेतून झिरपणारं काम- क्रीडेचं चित्र म्हणजे एक नैसर्गिक कलाच भासली. संपूर्ण कविता म्हणजे समागमाच्या वेळच्या भावभावनांचं,देहबोलीचं एक वास्तविक आणि उत्कृष्ट वर्णन आहे. मानसिक आणि कायिक अशी एक स्थिती आहे.”
ज्योत निमाली झुळूक विसावी श्वास होऊनी दरवळली
आर्त व्हावया व्याकुळ होऊन भावनेतूनी विसावली
पुरी रात्र जागली मात्र ही पहाट तरी का थकलेली
या ओळींचा अगदी स्पष्ट अर्थ राधिकाताईंच्या रसग्रहणामुळेच वाचकांना सहज लावता येतो.
छेड तू काढू नको- बाहेरगावी कामानिमित्त गेलेला पती बऱ्याच दिवसांनी भेटलेला आहे,आणि या गीतातील नायिका कामातूर झालेली आहे.या क्षणी तिला तिच्या पती व्यतिरिक्त कोणाचेही अस्तित्व नको आहे,म्हणूनच खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राला ती विनवते,
*रजनी नाथा तू नभातून
वाकुल्या दाऊ नको*
*नाथ माझा साथ आहे
छेड तू काढू नको.*
अतिशय सुरेख आणि तरल भावनाविष्कार दर्शविणारी ही कविता असे मी म्हणेन.या कवितेवरील रसग्रहणकार राधिका ताईंचे भाष्य अगदी वाचनीय आहे.
त्या लिहितात,” रसमयता हा उल्लेखनीय गुण या गीतात जाणवतो. ती आतुरता, उत्कटता, आर्तता, मोहरलेपण, भावविभोरता कवीच्या शब्दप्रवाहातून कशी वाहत असते आणि याचा जाणीवपूर्वक स्पर्श वाचकांच्याही संवेदना चाळ वतात”. अगदी खरे आहे. कवितेतील नायिकेच्या भावना, संवेदना या घडीभर स्वतःच्याच आहेत की काय असे वाटते.
मराठी रांगडी भाषा आणि त्यातून दिसणाऱ्या जवान स्त्रीचं हे ठसठशीत रूप लावणी वाचताना नजरेसमोर साक्षात उभे असल्याचा भास होतो. व्हटाचं डाळिम कुस्करलं या शब्दरचनेत तक्रारीचा सूर असला तरी अंतर्यामी ही क्रिया तिला हवीहवीशी वाटणारी आहे हे स्पष्ट दिसते. राधिकाताईंना ही घटना अतिप्रसंगाची नसून खट्याळ प्रेम भावनेची वाटते.कृष्णाने गोपींची वस्त्रे पळवली तोच भाव त्यांना या कवितेत जाणवतो असे त्या लिहितात.हे रसग्रहण वाचून लावणीची रंगत अधिक वाढते.
आसुसलेली- प्रणय भावनेने धुंद झालेल्या एका प्रेयसीची ही गझल आहे. पुरुषाच्या पुलकित करणाऱ्या स्पर्शासाठी ही गझल नायिका आसुसलेली आहे,प्रेमाची गुंगी तिला आलेली आहे.ती म्हणते,
धुंदीत राहण्याला वाऱ्यास बांधिले मी
गंधित जाहले परि ना मुग्ध राहिले मी
किती सुंदर ख्याल आहे हा.संपूर्ण गझलच वातावरणात एक प्रकारची धुंदी आणणारी आहे. या शेराच्या खयालतीविषयी राधिका ताईंनी सर्वसाधारण वाचकाला जाणवणाऱ्या अर्थाव्यतिरिक्त आणखी एका अभिप्रेत अर्थाची शक्यता निदर्शनास आणून दिली आहे. त्या लिहितात, ” माझ्या मनात उसळलेले प्रेमभाव वाऱ्यासवे पसरत जाऊ नयेत. ते गुपित आहे आणि इतरांना कळू नये. माझं गंधावलेपण,ही प्रेम धुंदी, माझं वयात येणं इतरांच्या नजरेत येऊ नये.
सर्वसाधारणपणे कविता वाचून त्यातील सहज दिसणारा अर्थ, एकूण शब्दांकन,कवितेतील लयबद्धता याकडे वाचकांचे लक्ष असते. प्रत्येकच वाचक कवीच्या मनातील अभिप्रेत अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतोच असे नाही.या रसग्रहणांमुळे वाचकांची दृष्टी रुंदावण्यासाठी नक्कीच मदत होते यात शंका नाही.निष्णात गायक श्रोत्यांपुढे एखादा राग सादर करत असताना त्यातील बंदिशीच्या एकेक जागा हेरून त्या रागाचे सौंदर्य जसे खुलवत असतो त्याप्रमाणेच डॉ.निशिकांत श्रोत्री यांच्या कवितांतील सौंदर्य स्थळे हेरून राधिकाताईंनी या कविता खुलविल्या आहेत.प्रत्येकच कवितेचे रसग्रहण करताना त्यांनी कवितेच्या अंगोपांगांचा बारकाईने विचार केला आहे.कवितेत येणारा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ, त्यातील त्या शब्दांचा चपखलपणा या सर्व गोष्टींचा अभ्यास करून,योग्य ती उदाहरणे देऊन कविता कशी वाचावी, कवितेच्या गर्भात कसे शिरावे याचे उत्तम मार्गदर्शन वाचकांना केले आहे.
सौंदर्य आगळे ही डॉक्टर श्रोत्रींची अशीच एक शृंगारिक कविता! एका रूपवतीचे सौंदर्य पाहून कवितेतील नायक अगदी घायाळ झाला आहे. तो म्हणतो,” पाहुनी या सौंदर्य आगळे विद्ध जाहलो मनोमनी ” आणि या
विद्धावस्थेत तो त्या युवतीच्या रूपाचे वर्णन करतो, असे हे गीत. राधिकाताईंचे यावरील भाष्य वाचताना त्यांचा अभ्यास,वाचनाच्या कक्षा अमर्याद आहेत याचा साक्षात्कार होतो.त्या लिहितात, ” या ललनेचं सौंदर्य वर्णन वाचून मला कालिदासाच्या मेघदूत काव्याची आठवण झाली. प्रेयसी पर्यंत पोहोचण्याच्या मार्गादरम्यान यक्ष त्या मेघाला वाटेत भेटणाऱ्या संभाव्य स्त्रियांच्या सौंदर्याविषयीचे वर्णन करतो, काहीसे त्याच प्रकारचे हेही सौंदर्य आहे असे मला जाणवले.
अशा प्रकारची रसग्रहणे वाचून सामान्य वाचकांना वाचण्याची योग्य दिशा मिळते याची मला जाणीव झाली.
रसग्रहण हा भाषेच्या व्याकरणाचा एक भाग आहे.एखादे काव्य वाचले की त्याचा फक्त अर्थ जाणून घेणे म्हणजे रसग्रहण नव्हे. त्या काव्यातून होणारी रसनिष्पत्ती, त्यातील अनुप्रास,यमके, रूपके, दृष्टांत, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे शब्दालंकार व अर्थालंकार काव्यावर कसे चढविले आहेत,काव्यरूपी शारदेचे सौंदर्य कसे खुलविले आहे या सर्वांचा सापेक्ष विचार म्हणजे रसग्रहण! या दृष्टीने राधिकाताईंची ही सर्व सोळा रसग्रहणे परिपूर्ण आहेत असे मी म्हणेन.
प्रेम आणि रजनी यांचा घनिष्ठ संबंध आहे.दिवसभर थकले भागलेले शरीर जेव्हा रात्री प्रियकर/ प्रेयसीच्या कुशीत विसावते तेव्हा श्रमपरिहार होऊन गात्रे पुन्हा प्रफुल्लीत होतात,टवटवीत होतात, प्रीतीचा तो एक क्षण दिव्यानंद प्राप्त करून देतो या दृष्टीने निशाशृंगार हे पुस्तकाचे शीर्षक समर्पकच आहे.
मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक वाचण्यासाठी वाचकांचे मन नक्कीच आकृष्ट होणार याची मला खात्री आहे.पुस्तकाच्या *निशाशृंगार*या शीर्षकाला साजेसे असेच मुखपृष्ठ शाॅपीझेनच्या चित्रकाराने तयार केले आहे.पौर्णिमेचा चंद्र आणि एका शिळेवर बसून बासरी वाजविणारा श्रीहरि,बासरीच्या सुरात तल्लीन झालेली राधा असे हे प्रेमाचे प्रतीकात्मक असणारे मुखपृष्ठ फारच लक्षवेधी आहे.चंद्राच्या अवती भवती दाटून आलेले ढग राधेच्या मनोवस्थेचे प्रतिनिधित्व करतात.
या पुस्तकाची प्रस्तावना दस्तूरखुद्द डाॅ.निशिकांत श्रोत्री यांनीच दिली आहे.ते प्रस्तावनेत म्हणतात,”शृंगारिक काव्याचे रसग्रहण करणे ही दुधारी शस्त्र हाताळण्याइतकी कठीण कला आहे,आणि या शृंगारिक कवितांची रसग्रहणे विलक्षण संयमाने आणि तरीही सखोलपणे करून तिने(राधिका)माझ्या कवितांना पुरेपूर न्याय दिला आहे.”कवितेतील आशयावर जराही अन्याय न होऊ देता,अश्लीलतेचा मागमूसही दिसू द्यायचा नाही,म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड आहे,परंतु राधिकाताईंनी लीलया ते पेलले आहे याला डाॅ.श्रोत्रींनी मान्यता दिली आहे.
शाॅपीझेन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशन करून चोखंदळ वाचकांसमोर हा अमोलिक नजराणाच ठेवला आहे असे मी म्हणेन. त्यासाठी शाॅपीझेनचे आभार.
त्याचप्रमाणे डाॅक्टर, अशीच छान छान भावगीते लिहीत रहा आणि राधिकाताई, आपण रसग्रहणे करून
त्याचा रसास्वाद आम्हा वाचकांना देत रहा ही विनंती.
आपल्या उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पाखरमाया” – लेखक : श्री मारुती चितमपल्ली☆ परिचय – डॉ.माधवी किशोर ठाणेकर (मधुकिशोर) ☆
पुस्तक – पाखरमाया
लेखक – मारुती चितमपल्ली
प्रकाशक – साहित्य प्रसार केंद्र, नागपुर
तृतीय आवृत्ती
पृष्ठे – १४०
मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांची खासियत म्हणजे त्यांनी पुस्तकाला दिलेली नावे. केशराचा पाऊस असो, रानवाटा असो, पाखरमाया असो वा सुवर्णगरुड असो नाव वाचता क्षणीच मनात विचारांचं काहूर माजतं. त्याला भर म्हणजे पुस्तकाचे मुखपृष्ठ. मुखपृष्ठावर पुस्तकाच्या नावाला साजेसे असे किंवा त्याहूनही सुंदर चित्र असते. आणि आपण त्याच्याकडे आपसूकच ओढले जातो. सहज चाळायला म्हणून जरी पुस्तक हातात धरलं असलं तरीही त्यांच्या लिखाणात आपण स्वतःला विसरून जातो, आणि पुस्तकाशी एकरूप होतो.
‘पाखरमाया’ या नावावरून जरी पुस्तकांत पक्षी जगताबद्दल सर्व असेल अस वाटलं तरीही आत मात्र अनेक विषयांवर लेख आहेत. पक्षी, कीटक, लहान प्राणी, झाडं एकूण निसर्गाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकांत पक्षी आपली घरटी कशी बांधतात याबद्दल अधिक विस्तृत महिती सांगितली आहे. तसेच वाळवी, चेलपतंग, काजवे, बेडूक, खेकडे यांची माहिती आहे. वानर आणि वांब माश्यावर देखील सुंदर लेख आहेत. आकाश आणि पृथ्वी ग्रहतारे यांच्या गमकाची वर्णने आहेत. तर झाडांमध्ये पिंपळ, चिंच, सुरु, कुसुमगुंजा, बाभूळ, महारुख, रायमुनिया आणि शेवग्याची बारीक माहीती दिली आहे. निसर्गातील सर्व गोष्टी सांगून त्यांचा आणि योग याचा संबंध शेवटच्या लेखामध्ये त्यांनी सुंदर प्रकारे मांडला आहे.
चितमपल्ली यांची पुस्तकं निसर्गाची नवीन ओळख करून देतातच परंतु त्यातील भाषा आणि चित्रमय गोष्टींमुळे आपल्याला निसर्गाविषयी आपसूकच आपुलकी निर्माण होते. त्यांचे साहित्य वाचून प्रसिद्ध लेखक “जी. ए. कुलकर्णी” यांनी त्यांना सुंदर पत्र लिहिलं आहे त्यावरूनच आपल्याला त्यांच्या लिखाणाची शैली समजून येते. ते पत्र असे आहे:
“प्रिय चितमपल्ली,
निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत. त्यांतील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला. साधारणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाङ्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे यांचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी, जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात की आपणाला मराठी येते का याबद्दलच मला साशंकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसाय अथवा शास्त्रीय संकलन यापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे.”
असा सुंदर अभिप्राय वाचल्यानंतर हे पुस्तक मला आणखीनच वाचावं असं वाटले.
पुस्तकाच्या नावावरून असं वाटलं होतं की फक्त पक्ष्यांची माहिती असेल. वाचायला सुरू केल्यावर लक्षात आलं; पक्षीच नव्हे तर जलचर, उभयचर, प्राणी, कीटक, आकाश, पर्जन्य, वृक्षसंपदा, अशा कितीतरी गोष्टी आणि त्यासोबत त्यांचे विणलेले अनुभव, या सगळ्यांचा एकत्रित मिलाप म्हणजे ‘पाखरमाया’ आहे.
मला कॉलेज मध्ये असताना Botony आणि zoology चा अभ्यास करताना nursery आणि poultry च डोळ्यांसमोर यायची, आणि त्यात ते लॅटिन biological नावं लक्षात ठेवायची म्हणजे…
चितमपल्ली यांचे हे दुसरं पुस्तक वाचतेय मी, त्यांचे अनुभव वाचताना त्यापालिकडच्या जिवंत निसर्गाची ओढ लागते. महत्वाचं म्हणजे प्राणी पक्षी, वृक्षांची त्यांनी दिलेली मराठी किंवा आदिवासी बोली भाषेतील नावं इतकी साजेशी वाटतात, म्हणजे उगाचच आपण इंग्लिश नावं शोधत असतो असं वाटतं.
आपल्या पूर्वजांना असलेलं विस्तृत, सखोल आणि अचूक ज्ञान आणि त्याचा चितमपल्ली यांनी केलेला अभ्यास श्लोकासाहित दिलेला अर्थ वाचताना अचंबित व्हायला होतं.
चितमपल्ली हे साक्षात वनऋषीच. म्हणतात ना एखाद्या ज्ञानी व्यक्तीच्या सहवासात तासभर रहा, सतत नवीन शिकायला मिळतं. तशी अवस्था ही पुस्तकं वाचताना होते, एवढी त्यांनी आयुष्यभराची तपस्या आपल्या समोर पुस्तकरूपाने उघडून ठेवली आहे, आपण रसग्रहण करत राहावे. बरं एका वनाधिकार्याचे अनुभव म्हणजे सरळसोट गोष्टी असतील असं पण नव्हे. साहित्य, अभंग, दोहे, उपनिषद यांच्याशी अनुभवांशी घातलेली सांगड पाहून अचंबित व्हायला होतं. किती तो गाढा अभ्यास..
त्यांचे निसर्गातले अनुभव वाचतच राहावे असे आहेत..
**बहिरी ससाणा, सर्पगरूड उंच झाडाच्या शेंड्यावर घरटं बांधतात. बऱ्याच वेळा कावळे दुसऱ्याच्य घरट्यातल्या काड्या चोरून स्वतःचं घरटं बांधतात
**पक्षी अंड्यावर बसून तापमानाचा समतोल ठेवतात. कमी – जास्त तापमानाने आतला जीव गुदमरून मरू शकतो. पक्षी ठराविक दिवसाच्या अंतराने अंडी घालतात, मादी एकत्र सगळी अंडी घालू शकत नाही. सगळी अंडी घालून झाली की एकत्र उबवायला मादी सुरूवात करते.
**वानरांच्या शेकोटीची कथा तर facebook वर बऱ्याच ठिकाणी सगळ्यांनी वाचली असेल, ती कथा चितमपल्ली यांनी याच पस्तकात दिली आहे वानर म्हणे रामफळ-सीताफळाला हात लावत नाहीत. आता पुढच्या वेळी वनारांची टोळी आली की निरीक्षण करायला हवं.
**पावसाळ्या नंतर बेडूक जमिनीखाली महानिद्रेत जातात; विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट झाडाजवळ, विशिष्ट दिशेला खोदले तर त्यांना अचूक ठिकाणी शोधता येतं.
**लोयांग नावाचा एक जपानी गृहस्थ एका खंदकात पडला. तिथल्या खंदकातील भेगांत बेडकांनी आश्रय घेतला होता. सूर्य उगवताच सूर्यकिरण खावे तशी बेडकांनी जिभेची हालचाल सुरू केली, आणि लोयांग यांनी त्यांचे अनुकरण केले. असे केल्याने त्यांची भूक नाहीशी झाली, अगदी त्या खंदकातून सुटका झाल्यावर सुद्धा.
**खेकडे बिळात असताना आपल्या नांग्या आत ओढून घेतात. परंतु धोका वाटला तर नांग्या सज्ज करून बिळाच्या टोकाशी येतात. एकदा त्यांनी पकडलं की मग सहज सुटका नाही. अंदमान वरील खेकडे माडावरील नारळ पाडून, त्यांना छिद्र पाडून आतली माऊ मलई फस्त करतात. साधुबुवा खेकडा इतर जीवांनी सोडलेल्या शंखात राहतो.
**साप कात टाकतो त्याप्रमाणे खेकडाही कवच बदलतो.
**खेकड्याच्या डोळ्यांखालच्या कडांना राठ केस असतात. त्या केसांचा उपयोग ते कुंचल्यांसारखा डोळे साफ करण्यासाठी करतात, तेव्हा फुत्कारण्याचा आवाज येतो. खेकडे पाण्याखाली श्वासोच्छवास करताना बुडबुडे सोडतात, त्यांचाही आवाज येतो.
**कोल्हा आपली शेपटी खेकड्याच्या बिळात घालतो. खेकडा शेपटी पकडून बाहेर आला की खेकड्याला खाऊन टाकतो. खेकडे पावसाच्या आवाजाने हर्षभरित होतात. ठाकर/कातकरी लोकं दगडांचा पावसासारखा आवाज काढून खेकड्यांना बिळाबाहेर काढून शिकार करतात.
**गुंजांची पानं लाजळूच्या पानासारखी मिटून आपणाला भूकंप, ज्वालामुखी आणि हवामानातील प्रचंड उत्पाताची पूर्वसूचना देत असल्याचं वनस्पती शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.
**खाटीक पक्षी शिकार केलेले कीटक आणि सरडे बाभळीच्या काट्याना अडकवून देतो, मग सवडीने कुरतडून खातो.
–लँटाना या मूळ ऑस्ट्रेलियन झुडुपाला मराठीत घाणेरी / टणटणी आणि मेळघाटातील कोरकू लोक रान मुनिया म्हणतात. चंदनाच्या झाडाला सावली आणि अन्न देण्याकरता लावलेली ही झुडूपं अतिक्रमण वाटावं एवढी अतिवेगाने वाढली आहेत. त्यामुळे इथल्या वनश्रीची अंतिम अवस्था (climax stage) आली असल्याचं वन तज्ज्ञांचे मत आहे. मूळ ज्या ठिकाणी वनस्पती उगवते, त्या ठिकाणी त्यावर नियंत्रण ठेवणारे जीवही निसर्ग जन्माला घालत असतो. अशी वनस्पती दुसरीकडे नेली की अनियंत्रित वाढून स्थानिक निसर्गसंपदेचा घास घेते, याच मेळघाट हे ज्वलंत उदाहरण.
–शेवग्याच्या बहुविध उपयोगाविषयी चितमपल्ली आवर्जून सांगतात. पाखरांना बोलवायचं असेल तर अंगणात शेवग्याची झाडं लावण्याचा सल्ला पक्षीमित्रांना देतात.
–वन्य प्राणी हे सिद्ध जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नांनी सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागते. म्हणून ९०% योगासनांची नावे पशुपक्ष्यांच्या नावावरून आहेत.
–सिंहमुद्रेत जीभ लवचिक बनते, घसा आंबण्याची व आवाज फाटण्याची प्रवृत्ती कमी होते. मयूरासनाचा स्वामी झालेला योगी जहाल विष पचवू शकेल एवढी जठराची शक्ती प्राप्त होते. सापाचा श्वास निःश्वास या क्रिया प्राणायामाप्रमाणे दीर्घ असतात. योगशास्त्र च्या नियमानुसार दीर्घ जीवन प्राप्त होण्यासाठी प्राणायाम हे एक साधन आहे.
–संमोहन विद्या माणसाला योगसाधनेने साध्य होते, परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे.
या गोष्टी फक्त teaser आहेत पुस्तक वाचताना शेवटचं पान कधी आलं तेच कळत नाही
चितमपल्ली यांचे अनुभव आणि निसर्गातील प्रगाढ ज्ञान वाचतच बसावं असं वाटतं
आवर्जून वाचावं, आणि निसर्गप्रेमींनि संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे – पाखरमाया.
☆ “अशी माणसं : अशी साहसं” – लेखक : श्री व्यंकटेश माडगूळकर ☆ परिचय – सौ अनघा कुलकर्णी ☆
पुस्तक :अशी माणसं : अशी साहसं
लेखक : श्री व्यंकटेश माडगूळकर
व्यंकटेश माडगूळकर यांची साहित्य विश्वा त ग्रामीण कथा-कादंबरीकार म्हणून ओळख आहेच तसेच ते एक निसर्ग प्रेमी, प्राणी प्रेमी होते हे आपल्याला माहित आहे.या त्यांच्या प्रेमा पायी त्यांनी राने वने धुंडाळली जंगले पायाखाली घातली ,निसर्गाच्या सानिध्यात राहून निरीक्षणे केली रेखाटने केली, अनुभव घेतले ,विपुल वाचन केले आणि लेखनही केले.
असेच थोड्या वेगळ्या विषयावरचे त्यांचे पुस्तक आहे ,अशी माणसं :अशी साहस जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात .स्वतःच्याच पावलांनी नव्या वाटा पडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे ,अगदी थोडे. या थोड्यांच्या वाटचालीसंबंधीच्या हकीगती सांगणारे, त्यांच्या ग्रंथाची ओळख करून देणारे, लेख माडगूळकरांनी नियतकालिकातून लिहिले .या लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.
अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक कथा आपण सर्वांनीच वाचले आहेत.या कथेतील बहादूर दर्यावर्दी सिंदबाद आणि त्याच्या सात सफरी आपण वाचल्या आहे त. याच सफरीने प्रभावित होऊन टीम सेवरी न या भूगोल तज्ञाला वाटले की , पण सिंदबादप्रमाणे जहाजातून समुद्र पार करायचे सिंदबाद ने केले त्याच मार्गाने .या सफरींची तयारी आणि अनुभव याचे कथन या लेखात आहे.
‘जेन गुडाल ‘या त्यांनी केलेल्या चिंपांझी वानराच्या संशोधनामुळे प्रसिद्ध झाल्या .जेन गुडाल आणि त्यांचे पती यांनी टांझानियातील गोरो गारो या जागी राहून रान कुत्री ,कोल्हा आणि तरस यांचा अभ्यास केला.आणि त्यावर इनोसंट किलर्स ‘हे पुस्तक लिहिले .या पुस्तकाचा सारांश आपल्याला या लेखात वाचायला मिळतो.
फरले मो वॅट नावाच्या माणसाने उत्तर ध्रुवा कडील ओसाड प्रदेशात केलेल्या प्रवासावर पुस्तक लिहिलं .ते वाचताना माणूस नावाचा प्राणी किती चिवट आणि किती जिद्दी आहे ,निसर्गाशी जुळवून घेत तो या पृथ्वीतलावर कुठे कुठे वस्ती करून राहतो ,हे या पुस्तकातून कळतं .आपण ज्याला संकट म्हणतो त्या अति अडचणी वाटतात . तिसऱ्या लेखात फरले व त्याचे पुस्तक याचा परिचय होतो.
ओरिया ही तरुणी जंगली हत्तींच्या कळपात चार-पाच वर्ष राहिली .त्यांचा टांझा नियाला असलेल्या लेक मन्या रा नॅशनल पार्क मध्ये साडेचारशे हत्ती होते .झाडावर चढून बसणारे सिंह होते ,गेंडे होते ,मस्तवाल रा न रेडे म्हशी होत्या .विषारी चुळा टाकणारे सर्प होते .या सगळ्या पसाऱ्यात ओरिया राहिली.आपण घेतलेल्या अनुभवांना शब्द रूप दिले .ओरिया विषयी आणि तिच्या अनुभवाविषयी चौथ्या लेखात सांगितले आहे.
कुनो स्टूबेन नावाच्या अफाट जिद्दी तरुणाने एकट्याने नाईल नदी तरु न जाण्याचा निश्चय केला.अनेक संकटाशी सामना करत तो पार पाडला .आपल्या विलक्षण अनुभवाने भरलेले त्याचे पुस्तक आहे .’अलोन ऑन द ब्ल्यू नाईल’ या पुस्तकाचा सारांश या लेखात वाचायला मिळतो.
जिम कॉर्बेट हे नाव आपल्याला परिचित आहे ते नरभक्षक वाघांचा शिकारी म्हणून.परंतु जिम कॉर्बेट व्यक्ती म्हणून खूप वेगळा होता तो निष्णात शिकारी तर होताच पण सहृदय माणूस पण होता .एखाद्या शास्त्रज्ञाच्या तोडीची निरीक्षण शक्ती आणि चौकसपणा त्याच्याकडे होता .भीतीवर त्याने नेहमीच विजय मिळवला .जिम कॉर्बेटचे कार्य आणि व्यक्तीचित्र आपल्याला इथे वाचता येते.
यानंतरच्या लेखात पक्षी तीर्थ की ही म डॉक्टर सलीम आलि त्यांची भेट व अनुभव याविषयी लिहिले आहे.
संग्रहातील शेवटचा लेख आहे मारोतराव चित्तमपल्ली यांच्या विषयी.चितमपल्ली लेखक म्हणून आपल्याला परिचित आहेतच परंतु एक व्यक्ती म्हणून ते कसे आहेत हे आपल्याला या लेखात कळते .एक मित्र असलेल्या या’ जंगलातील माणसाचे’ ‘माडगूळकर यांनी रेखाटलेले शब्दचित्र आपल्याला चित्तमपल्लींची नव्याने ओळख करून देते.
संग्रहातील सर्वच लेख वाचनीय आहेत .’साहस ‘या शब्दाची आपली व्याप्ती किती तोकडी आहे हे पुस्तक वाचताना जाणवत राहत .माडगूळकर यांच्या चित्रमय आणि सुबोध शैलीत हे अनुभव वाचणे म्हणजे एक वेगळा ,आनंददायी अनुभव आहे.__
परिचय : सौ अनघा कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्रीमती सुरेखा सुरेश कुलकर्णी यांचा उमलत्या कळ्या हा दुसरा काव्यसंग्रह.हा कवितासंग्रह वाचून झाला आणि मग त्यांनी आपल्या मनोगतात सुरूवातीला जे लिहिले आहे ते प्रकर्षाने जाणवले.त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच या संग्रहात बाल आणि युवावर्ग केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कविता आहेत.कविता होत असताना त्यांचा तसा उद्देश नसेलही.परंतु अशा अनेक कविता त्यांच्याकडून रचल्या गेल्यामुळे त्यांना संग्रह करणे शक्य झाले आहे.पण याबरोबरच आपली संस्कृती ,परंपरा, निसर्ग आणि पर्यावरण, त्याचे जतन आणि संवर्धन अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या भावना दृढपणे व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे या उमलत्या कळ्या सर्वच वयोगटातील वाचकांना गंध देत आहेत.
बालकवितांचा विचार करताना एक गोष्ट जाणवते .ती म्हणजे बालकांना समजेल अशा सोप्या भाषेत त्यांनी रचना केल्या आहेत.काही वेळेला तर घरातील जबाबदार व्यक्तीशी आपण बोलत आहोत असे बालकांना वाटेल. गणपती, वाढदिवस, बालपण, घरातील मनीमाऊ, चिऊताई, प्राण्यांच्या कडून करण्यात आलेल्या तक्रारी, घराचे हरवलेले अंगण, नातवंडांशी असणारं नातं अशा अनेक विषयावर त्यांनी कविता केल्या आहेत.त्या त्या प्रसंगाला योग्य अशी भाषा,शब्द वापरले आहेत.
लहान मुले आणि किशोर तसेच युवा गटातील मुलांना त्यांनी अनेक कवितांमधून मार्गदर्शन केले आहे. धोक्याच्या सुचनाही केल्या आहेत.
आजकाल विसरत चाललेली संध्याकाळच्या प्रार्थनेची त्या आठवण करून देतात.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्या आदर्शांची मालिका बालकांसमोर , युवकांसमोर असली पाहिजे याची जाणीव त्यांनी एका कवितेतून करून दिली आहे.पुस्तके हीच आयुष्याची अमूल्य ठेव आहे.त्यांच्या जगात रमावे कारण वाचलात तरच वाचाल असा संदेशही त्या देतात.तरुणांच्या व्यसनाधिनतेने त्या व्यथित होतात.युवकांनी विवेकाने वागावे व मानवतारुपी संपत्ती जतन करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.तारुण्याचा वसंत फुलत असतानाही बेभान न होता मोहाचे श्रण टाळावेत.म्हणूनच एका कवितेतून त्यांनी सेल्फीप्रेमींना इशाराही दिला आहे.यंत्रयुगात मानवाने कितीही प्रगती केली असली तरी आपण निसर्गापेक्षा मोठे नाही हे ही त्या बजावून सांगतात.एकंदरीत युवा पिढीचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी लिहीलेल्या कवितांची संख्याही बरीच मोठी आहे.
याबरोबरच तिरंगा गीत,वीर जवानांसाठी केलेली कविता,ऑलिंपिक विजय, स्वातंत्र्य दिन,महाराष्ट्राचे गुणगान अशा देशप्रेमाचे दर्शन घडवणा-या कविताही त्यांच्याकडून लिहील्या गेल्या आहेत.
निसर्ग, पर्यावरण ,त्याचे महत्व व जतन याविषयी भाष्य करताना त्यांनी अचूकपणे काव्य केले आहे.वृक्ष लागवडीशिवाय सुख समृद्धी नाही.डोंगर जपले गेले तर आपलं आयुष्य उघडे बोडके होणार नाही.उदार निसर्गाचे आपण कृतज्ञ असले पाहिजे.त्याच्यासारखा दाता नाही.वनस्पती औषधींचे महत्त्वही त्यांच्या कवितेतून स्पष्ट झाले आहे. मानव आणि निसर्ग यांचे असणारे नाते त्यांनी साध्या शब्दांतून विषद केले आहे.
अनेक निसर्ग कवितांतून निसर्गाचे सुंदर वर्णन वाचावयास मिळते. उदाहरणार्थ: ‘ ऋतुरंग ‘ या कवितेत त्यांनी सहा ऋतुंची साखळी गुंफताना प्रत्येक ऋतुचे वैशिष्ट्य अगदी थोडक्यात पण नेमकेपणाने टिपले आहे.पाऊस,गुलमोहोर, रानफुले,औषधी वनस्पती या सर्वांचे वर्णन करताना त्यांच्या लेखणीला बहर येतो.मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे याची आठवण करून देत पर्यावरण रक्षणासाठीही त्या जागरुक आहेत.
त्यांच्या काही कवितांत गेयता अधिक दिसून येते. सुप्रभात,निसर्ग, नमन स्वातंत्र्यवीरा , वीरजवान या कवितांतील गेयता उल्लेखनीय आहे.याशिवाय षडाक्षरी, शेलकाव्य असे वेगळे काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत.
एखाद्या उद्यानात विविध प्रकारची फुले एकाच ठिकाणी पहावयास मिळावीत त्याप्रमाणे ‘उमलत्या कळ्या’ या काव्यसंग्रहात विविध विषयांवरील कविता वाचावयास मिळतात.पण कवितांची मांडणी करताना संमिश्र झाली आहे.त्याऐवजी विषयवार कविता एकत्र दिल्या असत्या तर मांडणी सुबक वाटली असती असे वाटते. बालकविता,संस्कार कविता,निसर्ग इ. असा काही क्रम ठरवून घेता आला असता.
तरीही काव्य लिहिण्यामागची तळमळ त्यामुळे कमी होत नाही.संस्कारीत समाज घडावा व देश बलसागर व्हावा हा मनातील भाव त्यांच्या लेखणीने अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे.आजच्या काळाचा विचार करता हे खूप महत्वाचे वाटते.त्यासाठी सुरेखाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आयुष्यात आता सगळं संपलं असं वाटत असतानाही नव्या उमेदीनं केवळ जिद्द, साहस, चिकाटी, निष्ठा, आत्मविश्वास, स्वीकार आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा एक अशी झेप घेणं म्हणजे जणू फिनिक्स भरारीच. असं यश त्यांच्याच वाट्याला येतं, ज्यांच्या शब्दांत, विचारांत, मनात, कृतीत नकारात्मकतेला जराही थारा नसतो. त्यांचा सकारात्मकतेचा झरा ‘राखेतून उगवतीकडे’ या पुस्तकात पानापानांवर झुळझुळत राहतो. पुस्तकातील नायक विंग कमांडर अशोक लिमये हे भारतीय हवाई दलात कार्यरत असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘द फिनिक्स रायजेस’ या पुस्तकात मांडले. लेखिका सोनाली नवांगुळ यांनी केलेला त्याचा अनुवाद ‘राखेतून उगवतीकडे’.
रोज एक पाऊल पुढं टाकत यश मिळवायचं असेल तर हे पुस्तक तो विश्वास देतं. ‘तू पुढे हो यश तुझ्या मागं आपोआप येईल’ असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करतं. पुस्तक वाचत जसंजसं आपण पुढं सरकत राहतो तसतसं हवाईदलात जाण्याची इच्छा बाळगणारे, आकर्षणापोटी हवाईदल जाणून घेणारे, आपल्या मुलांना सैन्यात पाठवणारे, न पाठवणारे, सामान्य – असामान्य अशा प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर हवाईदल उभं राहतं. हा लेखनप्रपंच करण्याचा लेखकाचा उद्देशही तोच होता.
पुस्तकाचे दोन भाग. पहिल्या भागात ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (एन.डी.ए.)’तील प्रशिक्षणापासून ‘फायटर स्वाड्रनच्या जबाबदारी’ पर्यंतचे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर अभ्यास, नियम, कडक शिस्त, यश – अपयश, सततचं रिपोर्टिंग, कुठल्याही आकर्षणाला बळी पडायलाही वेळ नसणं, कधी मजा, कधी सजा, कधी कडवटपणा, कधी मायेनं ओतप्रोत भरलेला आधार अशा पद्धतीनं देशाच्या संरक्षण खात्याची धुरा प्राणपणानं सांभाळण्याची शारीरिक – मानसिक तयारी करावी लागली. ती करत असताना प्रचंड अनुभव मिळत गेले. इथपर्यंतचा लेखकाचा प्रवास थरारपूर्ण अनुभव देतो.
ते अनुभव मांडताना सैन्यातील विशिष्ट शब्द, वाक्यं जशीच्या तशी दिली आहेत. उदा: स्वाॅड्रन, बटालियन, रिग, हँगर, ब्ल्यू बुक किंवा सुखोई ७, पासिंग आऊट परेड,राईट हँड सीट चेक इ. हे शब्द वाचताना वाचकांना कळावेत यासाठी पुस्तकात शेवटी परिशिष्टामधे त्याचे अर्थही दिले आहेत.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असतोच. पण त्यातील एक कोणतातरी दुसर्यापेक्षा कमी अधिक प्रमाणात आव्हानात्मक असतो. अशोक लिमयेंच्या बाबतीत दोन्ही भागांत त्यांना तितक्याच आव्हानांचा सामना करावा लागला. सैन्यदलात जायचं तर काही शारीरिक – मानसिक निकष पार पाडावेच लागतात. ते सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर ‘विंग कमांडर’ झाल्याचा आनंद होताच, पण आणखीही काहीतरी वेगळं घडायचं होतं… घडणार होतं.
नेहमीप्रमाणंच त्यांनी फायटर विमानाचं उड्डाण केलं आणि त्यांचा अपघात झाला. त्यानंतरचं अनुभवकथन पुस्तकाच्या दुसर्या भागात येतं. अपघात होऊनही व्हीलचेअरवर बसून त्यांनी भारतीय हवाईदलाला आपली सेवा दिली. अपघातानंतर पुन्हा घेतलेली झेप वाचताना अनेकदा वेदनांचं मोहोळ उठतं. विंग कमांडरांच्या दुसर्या जन्माचा पहिला दिवस वाचताना डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही. त्या दिवशी फिनिक्स राखेतून उठला होता. त्यानं उडायलाही सुरुवात केली होती…पुन्हा एकदा!
कथेचा नायक आणि अनुवादक दोघंही पॅराप्लेजिक असण्याच्या एका समान धाग्यामुळं हे पुस्तक मराठीत आलं. अगदी तसंच एक वाचक म्हणून हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे माझा जोडीदार असलेला भारतीय नौदलातील एक सैनिक. विवाहापूर्वीच्या त्यांच्या कष्टांची जाणीव या पुस्तकामुळं माझ्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. एक सैनिक दिसणारा कडक शिस्तीचा कणखर पुरूष अगदीच मवाळ नसला तरी प्रेमळ, सहृदयी, मदतीसाठी तत्पर आणि प्रचंड जिद्द अशा गुणांनी संपन्न असतो हा माझा रोजचा अनुभव. या पुस्तकात असे बरेच समान धागे मला सापडत गेले. त्यामुळे दोन बैठकीत पुस्तक वाचून संपलं.
पहिला भाग पूर्णपणे प्रशिक्षणावर आधारीत आहे. त्यात वाचकांच्या अनुभवातले शब्द नसल्यामुळं काही शब्द वाचताना अडखळायला होतं. पणक्षदोन प्रकरणानंतर सरावानं ते जमतंही. दुसऱ्या भागात अर्थातच ‘फिनिक्स भरारी’. दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींनी जे लोक नाराज होतात आणि निराशामय वातावरणात राहतात, अशांसाठी हे पुस्तक महत्त्वाचं. आशेचा किरण दाखवणारे. ज्यांना स्वत:चं छोटं दु:ख खूप मोठं वाटतं असतं ते ‘वेदनेची शिकार’ होतच राहणार. पण अशा वेदनांपासून सुटका हवी असेल तर ‘राखेतून उगवतीकडे’ वाचायला हवं.
ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाही. तर पुनश्च ‘राखेतून उगवतीकडे’ निग्रहानं झेपावतो त्याची आहे.
☆ “तुरुंगातील सावल्या…” – मूळ लेखक : रूझबेह भरूचा – अनुवाद : सुश्री लीना सोहोनी ☆ परिचय – डॉ. मुग्धा सिधये – तगारे ☆
पुस्तक – तुरुंगातील सावल्या
लेखक – श्री रूझबेह भरूचा
अनुवाद – सुश्री लीना सोहोनी
परिचय : डॉ. मुग्धा सिधये – तगारे
भारतीय तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या वा खटल्याच्या सुनावणीच्या प्रतिक्षेत असलेल्या स्त्रिया व त्यांची लहान मुले या विषयावर रूझबेह भरूच्चा यांचं हे पुस्तक. पुणे, दिल्ली, भुवनेश्वर,श्रीनगर इत्यादी ठिकाणच्या तुरुंगाना भेटी देऊन तिथल्या स्त्री कैदयांच्या व मुलांच्या मुलाखती देऊन लिहिलेलं हे अनुभवस्पर्शी व आगळं वेगळं पुस्तक…!
मुळातच कैदी किंवा गुन्हेगार हा शब्द आला की आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित असते. त्यांनी काही तरी वाईट काम केलं आहे म्हणून त्या शिक्षा भोगत आहेत. गृहितालाच काही वेळा धक्का बसतो हे पुस्तक वाचताना ! त्यांची ५ वर्षाखालील वयाची मुलं त्याच्याबरोबर तुरुंगात रहात असतात, वाढत असतात त्यांचा काहीही गुन्हा नसताना ! तुरुंगात बहुतांश वेळा त्यांच्यासाठी वेगळ्या काहीही सोयी नसतात. आणि त्यामुळे त्यांचं बालपण होरपळून जातं. ह्या बाबतीत संवेदनशीलपणे विचार व कृती केली. डॉ. किरण बेदी यांनी तिहार जेलची IG झाल्यावर त्यांनी इंडिया फाउंडेशन सारख्या NGO च्या मदतीने तुरुंगामधे मुलांसाठी पाळणाघर.गरोदर स्रियांसाठी बाळंतपणाची सोय. चांगला आहार इत्यादी अनेक अमूलाग्र बदल केले.माणूसकी व अनुकंपा,नेतृत्वगुण,सचोटी, वेगळा नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता इत्यादी गुणांमुळे डॉ. किरण बेदींनी तुरुंगामध्ये इतिहास घडवला.ज्याची जगाने मॅगसेसे पुरस्कार देऊन दखल घेतली. दुदैवाने त्यांच्या बदलीनंतर सार काही तसंच राहिलं नाही.
हया कैंदीच्या स्त्रियांच्या व त्यांच्या मुलांच्या भावविश्वाची दखल लेखकाने खूपच संवेदनशीलतेने घेतली आहे. 5व्या वर्षानंतर त्या बिचाऱ्या मुलाला किंवा मुलीला दूरवर कुठे तरी अनाथआश्रमात पाठवण्यात येते. आई असूनही ममतेला आईच्या वात्सल्याला स्पर्शाला ती पारखी होतात, झुरत राहतात.
एकूणच लेखकाबरोबर जेव्हा आपला हा तुरुंगातल्या भेटीचा प्रवास मनाने होतो. तेव्हा, तुरुंगातल दाहक वास्तव पाहून धक्का बसतो. भारतीय न्यायव्यवस्था, पोलिस यंत्रणा ,तुरुंगाधिकारी, कैद्याविषयींचे कायदा या सार्यामधल्या त्रुटी समन्वयाचा अभाव, दुरावस्था पाहून यामध्ये अमूलाग्र सुधारणा व त्याच्या अंमलबणीची गरज जाणवते.
कित्येक निरपराध स्त्रिया नाहक (व्यवस्थेच्या बळी ठरून) जेलमधे वर्षानुवर्षे सडत राहतात. केवळ जामिन भरायला काही हजार रुपये नाहीत म्हणून・・・・ तर कधी व्यवस्थेशी पंगा घेतल्याबाबत सुशिक्षित सुसंस्कृत माणसांना हयात ढकलं जातं. हे वाचून मन विदीर्ण होते.
हया पुस्तकात शेकडो स्त्रियांच्या कहाण्या आपण वाचतो प्रत्येकीची कहाणी वेगळी असली तरी ” आईपणाचं दुःख तेच आहे. एक समाज म्हणून किती बदल घडायला पाहिजेत आणि हयाची सुरुवात व्यक्ति म्हणून आपल्यापासून हवी. आणि तसं झालं तर गुन्हायांचे प्रमाण कमी होऊन हे तुरूंग भरलेच जाणार नाहीत.जे आज क्षमतेपेक्षा दुप्पटीने भरून वाहत आहेत. लेखकानेही यासाठी काही ठोस उपाय पुस्तकात सुचवले आहेत. विषय कितीही गंभीर असला तरी केस स्टडीच्या अंगाने जाणाऱ्या हया पुस्तकात लेखकाने अधूनमधून विनोदाचा शिडकावा करून ताण हलका करायचा प्रयत्न केला आहे. सत्य , वास्तवदर्शी असं हे पुस्तक आहे. अनुवादिकेनेही सुंदर अनुवाद करून पुस्तकाची लय व मराठी भाषेचा लहेजा हे दोन्ही सांभाळले आहेत.
परीक्षण : डाॅ. मुग्धा सिधये – तगारे
बालरोगतज्ज्ञ. सांगली.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘कथास्त्री’ – संपादक : श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे ☆ परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
पुस्तक – कथास्त्री
संपादक – श्री अशोक लेले / श्री प्रकाश पानसे
परिचय – सौ. रेखा दयानंद हिरेमठ
कथास्त्री हे पुस्तक म्हणजे कथाश्री या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या जेष्ठ लेखिकांच्या कथांचा संग्रह आहे. वसुंधरा पटवर्धन,गिरिजा कीर,विजया राज्याध्यक्ष,ज्योत्स्ना देवधर,शैलजा राजे, मंदाकिनी गोगटे, मंगला गोडबोले,अनुराधा वैद्य व प्रमोदिनी वडके-कवळे यांच्या कथा या पुस्तकात आहेत.या पुस्तकातील सर्व कथा स्त्री आणि तिचे भावविश्व याचे प्रभावी वर्णन करणाऱ्या आहेत. प्रवाही लेखन शैली आणि सर्वच कथा वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या आहे
वसुंधरा पटवर्धन यांच्या आसरा या कथेमधील गंगाबाई या वयस्क स्त्रीचे देवळात भेटलेल्या अनोळखी स्त्री बरोबराने हक्काने वागणे सुरुवातीला खटकते पण स्वतःचा मुलगा आणि सून असताना देखील त्या वयस्क स्त्रीला एका अनोळखी स्त्रीमध्ये भावनिक आसरा का शोधावा लागतो हे वाचून मन सून्न होते.या कथेमध्ये एका वयस्क सासूची हातबलता अधोरेखित केली आहे.
गिरीजा कीर त्यांची त्याची चाहूल ही कथा वेदवती या अनाथ मुलीची आहे.तिचे आई वडील कोण होते तिला हेही माहित नसल्याने अनाथपणाच्या ओझ्याखाली दबून गेलेली ती आपल्या आयुष्याचे बरे वाईट करून घेण्या आधीच तिला सत्य समजते आणि अघटित कसे टळते. आपले वडील युद्धात शहीद झालेले असून समाजाच्या विरुद्ध जाऊनही आपली जिद्दी आई आपल्याला जन्म देते हे समजल्यानंतर वेदवती मध्ये अक्षरशः उत्साह संचारतो.या कथेत त्याची चाहूल म्हणजेच अचूक वेळी काही दैवी संकेत मिळणे व त्याचा अर्थ उलगडणे हे कसे घडते ते विस्तृत पणे मांडले आहे.
मंगला गोडबोले यांच्या ताजवा या कथेत विषम आर्थिक परिस्थितीतील मैत्रिणींची कथा खूप विचार करायला लावणारी अशी आहे.आपल्यापेक्षा आर्थिक स्थिती उत्तम असणाऱ्या मैत्रिणी च्या घरी गेल्यानंतर दुस-या मैत्रिणीला खूप अवघडलेपण येते व जेव्हा त्या मैत्रीणीची दुखरी बाजू तिच्या मैत्रिणीला समजते तेव्हा तिचे ते अवघडलेपण कमी होऊन पुन्हा त्यांचे नाते पूर्वपदावर येते. अशा आशयाची ही कथा मनाला सुन्न करून जाते.
एखाद्याचं सर्वच बाबतीत चांगलं कसं असू शकतं याचं मानवाला पडणारं कोडं आणि त्या माणसाची दुखरी नस सापडल्या नंतर होणारे समाधान ही भावना या कथेत मांडली आहे.
खरे तर मंगला गोडबोले यांची कथा आहे म्हणजे विनोदी वाचायला मिळेल असे मला वाटले होते.पण मनाला चटका लावून जाणाऱ्या भावनेला लेखिकेने खूप सुंदरपणे गुंफले आहे
अनवाळ अनवाळ या शब्दाचा अर्थ उनाड असा आहे.ही कथा अगदी आजच्या काळातीलच वाटते. आई-वडील खूप प्रयत्न करून मुलाला शिकवतात पण मुलगा शिक्षणाला खूप महत्त्व न देता वायफळ वेळ दवडतो.जेव्हा त्याला आपल्या आई-वडिलांना सोडून शिक्षणासाठी परगावी जावे लागते तेव्हा त्याला आपली चूक व आई-वडिलांची किंमत कळून येते. ही कथा आई वडीलांची काळजी व मुलांची बेफिकिरी यावर भाष्य करते.
भैरवी या कथेत लेखिका मंदाकिनी गोगटे यांनी एका प्रख्यात गायिकेच्या मुलाची चुकीचे करिअर निवडल्याने संपूर्ण कुटुंबाची कशी फरफट होते हे वर्णन केले आहे मालिनीताई,शमा, व्रजेश,अभंग ही पात्रे यांनी खूप उत्तम रीतीने रेखाटली आहेत.
माणकांचं तळं ही कथा देवयानी नावाच्या अत्यंत बुद्धिमान व कर्तबगार स्त्रीची आहे.खरे पाहता स्त्रियांना आपल्या सौंदर्यावर खूप अभिमान असतो पण स्वतः च्या सौंदर्यामुळे देवयानीच्या अंगभूत कलागुण जसे की कर्तबगारी, बुद्धिमत्ता, समंजसपणा,धैर्य अशा एक न अनेक गुणांना दुय्यम दर्जा मिळत असतो. असे झाल्याने स्वतःच्या सौंदर्याचाच राग येणारी देवयानी ची व्यक्तिरेखा लेखिका प्रमोदिनी वडके-कवळे यांनी खूप सुंदर पण रेखाटली आहे अशा या तिच्या सौंदर्याला लेखिकेने माणकाचं तळं असं संबोधलं आहे.इतरांना हेवा वाटणाऱ्या सौंदर्यामुळे देवयानी ची कुचंबणा क्लेशदायी तर आहेच तसेच एक नवल निर्माण करणारी आहे.
या कथासंग्रहातील सर्वात कथा शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतात. अशा या सिद्धहस्त लेखिकांची स्त्रियांचे भावविश्व उलगडणारी लेखन शैली मनाला भावते तसेच विचार करायलाही उद्युक्त करते.
☆ “गारंबीची राधा” – लेखक : श्री ना. पेंडसे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
पुस्तकाचे नाव… गारंबीची राधा
लेखक… श्री. ना. पेंडसे
मैत्रिणींनो यशोदा ह्या श्री. ना. च्या कादंबरीचं अभिवाचन मी काही दिवसांपूर्वी केलं होत.. त्यामुळे श्री. ना आणि त्यांचं कोकण प्रेम त्यांच्या लिखाणाची शैली आपल्या सगळ्यांना परिचयाची झाली आहे.. खर तर गारंबीची राधा मी खूप वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तकं आहे.. आज माझ्याकडे तर ते पुस्तक ही नाहीय.. कोणीतरी वाचायला नेलेले दिलेच नाही.. असो.. पण राधा ने अशी काही भुरळ घातली आहे की बरेच प्रसंग अगदी काल वाचल्या सारखे लख्ख आठवतायत त्याच जोरावर मी अभिप्राय लिहिते आहे.. तुम्ही समजून घ्याल च.. खरं तर कोकण प्रदेश त्यातले अनेक लेखक कवी नेहमीच आपल्याला त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे भुरळ घालतात आणि आपण अधाश्या सारखे हे साहित्य वाचतो.. पण ह्या सगळ्या लेखकांमध्ये जास्त आवडतात किंवा लाडके लेखक म्हणू हवं तर ते म्हणजे श्री. ना. पेंडसे.. ह्यांच्या अनेक कादंबऱ्या, कथा संग्रह मी अगदी पारायण केल्या सारखे वाचले आहेत.. कॉलेज लाईफ मध्ये.. श्री. ना. च पहिलं पुस्तकं हातात पडलं ते म्हणजे गारंबीची राधा…ही कादंबरी वाचली आणि मी अक्षरशः श्री. ना. च्या लिखाणाच्या प्रेमातच पडले.. मग काय एका मागून एक त्यांची पुस्तकं वाचली.. गारंबीचा बापू, रथचक्र, लव्हाळी, ऑक्टोपस, चक्रव्यूह, राजे मास्तर आणि सगळ्यात आवडलेली कादंबरी म्हणजे 1400 पानांची दोन खंडात आलेली कादंबरी तुंबाडचे खोत..
गारंबीची राधा आणि गारंबीचा बापू ह्या अगदी एकाच कथेचे दोन मोठे भाग असावेत असं वाटतं.. कोकणातल्या एका छोट्याशा खेड्यात गारंबी त्या खेड्याच नाव.. तिथे सुरू झालेली ही कहाणी आपल्याला पुन्हा नव्याने कोकणच्या प्रेमात पाडते.. ह्या कादंबरीत अनेक व्यक्ती चित्रण बघायला मिळतात.. मुख्य पात्र तर आहेतच त्यांच्या सोबतच अनेक स्वभावाची वेगवेगळी कोकणी माणसं आपल्याला इथे भेटतात.. कोकणचा प्रदेश, तिथली सामाजिक, आर्थिक परिस्थिती, तिथल्या प्रथा परंपरा, राहणीमान, खानपान ह्याचं अगदी जवळून दर्शन ह्या कादंबरी मध्ये होत.. पुलावरच्या एका बकाल म्हणता येईल अशा वस्तीत.. रावजी च्या हॉटेल मधे काम करणारी राधा एक सामान्य मध्यम वयीन स्त्री.. पण लेखक तिचं तिच्या रुपाच वर्णन करताना म्हणतात राधा म्हणजे पारिजातकाचं टवटवीत फुल. राधा दिसायला सुंदर आहे पण रोज तेलाच्या घाण्यासमोर बसून भजी तळून रापलेली तिची गोरी पान कांती अजूनच तिच्या सौंदर्यात भर घालते.. त्या छोट्याशा टपरी वजा हॉटेलमध्ये रावजी सोबत राधा दिवसभर काम करते, तिथेच तिला गारंबीचा बापू भेटतो. गारंबीमध्ये बापूची ओळख म्हणजे सर्वपित्री अमावस्येला जन्मलेलं एक बिघडलेलं कार्ट अशी आहे.. अशा ह्या उनाड बापू आणि राधाची प्रेम कहाणी ही जगावेगळी आहे.. बापूचा विचित्र स्वभाव आणि राधाचा स्पष्टवक्तेपणा राधेचं खंबीर धीर गंभीर रूप ह्या कादंबरीत वारंवार दिसून येते.. बापू सारखा मन मानेल तसं जगणारा प्रियकर आणि कोणाचाही आधार नसलेली ही राधा यांची प्रेम कहाणी आपल्याला वेड लावते.. प्रत्येक पानावर उत्सुकता अजूनच वाढत जाते…
यासोबत कोकणातील अंधश्रद्धा श्रीमंती थाट जमीनदारांचा मुजोरपणा आणि ह्या सगळ्याशी लढणारा उनाड बापू आपल्याला अधिकच जवळचा वाटू लागतो याच सोबत बापूवर निस्सीम प्रेम करणारी, कुठल्याही बंधनात न अडकलेली ही राधा आपल्या मनात घर करून जाते,… त्या काळी लग्नाशिवाय बापू सोबत एकाच घरात राहून संसार करणारी ती राधा त्या काळची एक आधुनिक विचारांची स्वतंत्र स्त्री या कादंबरीत भेटते,.. गावात असणारे अण्णा खोत, दिनकर भाऊजी ,विठोबा, आणि राधेचा नवरा रावजी ही अशी कित्येक पात्र या कादंबरीत भेटतात,.. रावजी म्हणजे राधाचा नवरा हा एक क्रूर विचारांचा स्त्री स्त्रीला एक भोगवस्तू समजणारा नवरा राधेला याचा तिरस्कार आहे.. राधेच्या सौंदर्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये गिराईक वाढतील या उद्देशाने हा रावजी राधेला हॉटेलमध्ये बसवत असे,..
अशाच एका क्षणी राधेला बापू भेटतो.. आणि रावजीसारख्या माणसाला तो आपल्या ताकतीने हरवू शकतो हे ती काही प्रसंगातून समजून चुकते… एक प्रकारचे सुप्त आकर्षण बापूबद्दल तिला आधीच वाटत असते त्यातूनच ती त्याला अनेक पदार्थ करून पाठवत असे आणि तेही रावजीच्या हातून.. कित्येक दिवसांनी रावजी मरून जातो आणि राधा पुन्हा एकदा एकटी पडते… पण समाजात आधीच गल्ल्यावर बसणारी म्हणून राधेची नाहक बदनामी झालेलीच असते, त्यातच आता तिला एकटेपणा येतो. या सगळ्यात बापूचा आधार तिला वाटतो,… आणि कोणतीही पर्वा न करता ती बापूसोबत राहायला लागते याचवरून गावात सगळीकडे राधेने बापूला ठेवला अशीच तिची बदनामी सुरू होते… पण बापूचा हळव्या निर्मळ प्रेमामुळे या सगळ्याकडे दुर्लक्ष करून राधा आणि बापूचा संसार सुरू होतो या सगळ्या परिस्थितीत राधेची मानसिक घालमेल सुरू असते… बापूचं कितीही प्रेम असलं तरी या प्रेमाला गावात मान्यता नाही… आपण फक्त एक रखेल म्हणूनच ओळखले जातो याची खंत राधेला नेहमी वाटत असते…
अशातच एक दिवस आप्पा दामले याची एन्ट्री या कादंबरीत होते… आणि राधा आणि बापूचं आयुष्य बदलून जातं..आप्पा दामले हे राधा आणि बापू विषयी ऐकून असतात आणि राधेच्या मनातील खंत ही त्यांना कळते तेंव्हा ते ह्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला देतात.. अर्थात ह्या पुस्तकात दाखवलेला काळ म्हणजे केस ठेवलेला ब्राम्हण औषधाला ही सापडणार नाही इतका पूर्वीचा.. त्यात बापू सारखा उनाड कोकणी विक्षिप्त माणूस.. आधीच तो बदनाम मग हे लग्न कोण मान्य करणार असं बापू म्हणतो.. पण इथे हो राधाची हुशारी तिचं बुद्धी चातुर्य दिसुन येत.. गारंबी म्हणजे जग न्हवे.. म्हणत ती बापू सोबत लग्न करते…ह्या सगळ्या मध्ये बापू आणि राधेचा गांधर्व विवाह ही अगदी रोमँटिक आणि निखळ प्रेमाचं प्रतिक वाटतं… बापू भल्या पहाटे राधेला बागेत घेऊन जातो आणि एक अनंताच फुलं देऊन तिच्याशी लग्न करतो.. तो क्षण तो परिसर ते लिखाण सगळचं कस मोहवून टाकत… तो पर्यंत बापू सुपारी चा मोठा व्यापारी बनतो आणि ज्या गावाने अक्करमाशा म्हणून हिणवलं तेच गावं बापुच कौतुक करताना थकत नाही.. ह्या सगळ्या प्रवासात बापूला मिळालेली राधेची साथ राधेच्या अजूनच प्रेमात पाडते.. मध्येच बापू एका महाराजांना भेटतो आणि बुवा बनतो तेंव्हा ह्या त्याच्या भोंदू पणाला राधेचा विरोध तिच्यातल वेगळेपण दाखवून देतो.. व्याघ्रेश्वर त्याच्यावर असणारी श्रद्धा जेंव्हा अंधश्रद्धेचे रूप घेते तेव्हा राधा त्याला कडाडून विरोध करते.,. बाळाच्या जन्मानंतर राधेची एक वेगळीच ओळख आपल्यासमोर येते.. बापूचं विक्षिप्त वागणं, घर सोडून बाहेर राहणं, अस असलं तरी राधेचं बापू वरील प्रेम जराही कमी होत नाही.. काही दिवसांनी बापूलाही आपला भोंदूपणा कळतो मग तो तेव्हा तो राधेकडे परत येतो आणि पुन्हा एक नवी कहाणी सुरू होते.. सगळ्यात अजून बऱ्याच घटना घडवून जातात…. काय आहेत किती उत्कंठा वर्धक आहेत.. हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकीने किमान एकदा तरी गारंबीची राधा आणि गारंबीचा बापू वाचलंच पाहिजे…
जवळजवळ दहा ते बारा वर्षांपूर्वी वाचलेल्या पुस्तकावर मी आज अभिप्राय लिहिलाय त्यामुळे त्यात बऱ्याच चुकाही असतील,.. प्रसंग मागे पुढे झालेले असतील त्या तुम्ही सगळे पुस्तक वाचाल आणि दुरुस्त कराल याची खात्री आहे…
धन्यवाद..
लेखक : श्री ना. पेंडसे
परिचय : सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा नुकताच प्रकाशित झालेला अमृतघट हा काव्यसंग्रह हाती पडताच प्रथम दर्शनी मी दोन गोष्टींमुळे अत्यंत प्रभावित झाले. पहिले म्हणजे काव्यसंग्रहाचे शीर्षक. अमृतघट या शब्दातलं माधुर्य आणि शब्दात असलेला उपजतचा काव्यभाव, रसमयता आणि शुद्धता मनाला आकर्षित करून गेली. अमृतघट म्हणजे अमृताचा घट, अमृताचा कलश. अमृत म्हणजे संजीवन देणारं सत्त्व. तेव्हाच मनात आलं,” नक्की या काव्यसंग्रहातून मनाला संजीवन, चैतन्य, ऊर्जा लाभणार.” नावात काय असतं? असं म्हणतात पण माझ्या मते नावातही खूप काही असतं.
दुसरं म्हणजे या पुस्तकाचं अत्यंत आकर्षक असं मुखपृष्ठ जे सुप्रसिद्ध चित्रकार आणि ग्राफिक्सकार सौ. सोनाली सुहास जगताप यांनी केलेलं आहे. अतिशय मनोवेधक असं हे मुखपृष्ठ आहे. घटातून अमृतधारा ओसंडत आहेत आणि या पार्श्वभूमीवर बासरीच्या सुरात तल्लीन झालेल्या सावळ्या, मोरपीसधारी, घनश्यामाची भावपूर्ण मुद्रा! संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर हे मुखपृष्ठ किती योग्य,अर्थपूर्ण आणि चपखल आहे याचीच जाणीव होते.
अमृतघट उघडला आणि त्यातून बरसणाऱ्या अमृतधारांनी माझे मन अक्षरश: पावन झाले.
भक्तीरसमय ५८ भक्तीगीतांनी हा कलश भरलेला आहे. यात अभंग आहेत, ओव्या आहेत, आरत्या आहेत,अंगाई,लावणी, वृत्तबद्ध भक्तीरचनाही आहेत.
जसजशा तुम्ही या भक्तीरचना वाचत जाता तसतसा तुम्हाला तादात्मतेचा, एकरूपतेचा, अद्वैताचा अनुभव येतो. अवघा रंग एक होऊन जातो.
या संग्रहात गणेशाची आराधना आहे, विठ्ठल भक्तीचा आनंद आहे आणि कृष्ण भक्तीची तल्लीनता आहे. या साऱ्याच भक्तीरचना रूप रस गंध नादमय आहेत यात शंकाच नाही.
जगामध्ये असा कोणी नसेल ज्याच्या मनात परमेश्वराविषयी भाव नाही.” मी परवेश्वराला मानत नाही” असे म्हणणाऱ्या माणसाच्या मनातही कुठेतरी ईश्वरी शक्ती विषयीची, त्याच्या अस्तित्वाची मान्यता असतेच आणि त्या शक्तीशी शरण जाण्याची कधी ना कधी त्याच्यावरही वेळ येतेच तेव्हा तो हतबल जरूर होत असेल पण त्यावेळी तो फक्त शरणागत असतो. अरुणाताईंच्या या भक्तीरचना वाचताना वाचक खरोखरच शरणागत होऊन जातो.
तुज नमो या अभंगात त्या म्हणतात,
तूच एक आम्हा। दावी मार्ग काही। तुजविण नाही। जगी कोणी।।
तुजविण शंभो मज कोण तारी” हा करुणाष्टकातला बापुडा भाव याही शब्दांतून जाणवतो. कर्ताकरविता तूच आहे याची पुन्हा एकदा या शब्दांतून मात्रा मिळते.
सामान्य माणसाची भक्ती ही सगुण असते. त्याच्या श्रद्धास्थानाला एक काल्पनिक रूप असतं आणि ते मनातलं रूपदर्शन त्याला चैतन्य देत असतं.
सगुण भक्ती या काव्यरचनेत अरुणाताई किती सहजपणे म्हणतात,
लागलीसे आता। एक आस बाबा।
दावी तुझ्या रूपा ।जगन्नाथा।।
खरोखर भक्ताची व्याकुळता, आर्तता या संपूर्ण अभंगात दृश्यमान होते.
कृष्ण सखा, कान्हा, मुरलीधर, देवकीनंदन, गोवर्धनधारी अशी कितीतरी मधुर नावे प्राप्त झालेले भगवंताचे रूप आणि मानवी जीवन याचं अतूट नातं आहे. कान्हाच्या भक्तीतला जिव्हाळा ज्याने अनुभवला नाही असा जिवात्माच नसेल.
सावळा हरी या रचनेत अरुणाताई याच लडिवाळ भावनेने लिहितात,
नंदाचा तो नंदन
यशोदेचा कान्हा
करी नवनीताची चोरी
फुटतो गोमातेला पान्हा..
फुटतो गोमातेला पान्हा या तीन शब्दांनी अंगावरचा रोमरोम फुलतो.
ही रचना वाचताना वाचक गोकुळात जातो. कृष्णाच्या बालक्रीडेत सहजपणे रमून जातो.
धून मुरलीची ऐकूनी
अवघ्या गोपी मुग्ध झाल्या
देहभान त्या विसरून
सुरावटीवर डोलू लागल्या…
वाचकही अशाच मुग्धावस्थेत काही काळ राहतो.
माऊली, गुण गाईन आवडी, विठ्ठल विठ्ठल गजरी, वारी निघाली, या भक्तीरचना वाचताना आपण वारकरीच बनून जातो आणि टाळ,मृदुंगाच्या गजरात चाललेल्या वारीचा सहजपणे भाग बनून जातो.
रूप सावळे साजिरे।हरपले माझे मन।
डोळा भरुनिया।पाहू चित्ता वाटे। समाधान ।।
इतके भक्तीरसात आकंठ बुडालेले शब्द पंढरपुरी स्थित असलेल्या माऊलीच्या चरणांचे जणू दर्शन घडवितात.
जीव गुंतला, मृगजळ एक आशा,नावाडी,काय भरवसा उद्याचा,या रचना चिंतनात्मक आहेत. जगण्याविषयी सांगणाऱ्या आहेत. प्रपंचाच्या रगाड्यात रुतलेल्या सामान्य माणसाच्या मनस्थितीचे वर्णन करणाऱ्या आहेत.
लोभ मोह क्रोध मत्सर
षड्रिपू घेरती मला
ना सुटे माझेपण
*प्रपंची जीव गुंतला …*यामध्ये एक प्रांजळपणा जाणवतो. स्वतःच जगणं आणि अवतीभवती वावरणाऱ्या प्रियजनांचे अथवा इतरांच्या जीवनाचे निरीक्षण करताना जे जे टिपलं गेलं त्याची प्रतिबिंबं त्यांच्या या भक्तीरचनेत आढळतात आणि ते सारं वाचत असताना आपल्या जीवनाचे ही संदर्भ आपल्याला सापडतात. हे अगदी सहजपणे घडतं.
जरी या रचना अध्यात्मिक असल्या तरी त्यात अवघडपणा नाही. यात संत संतवाङमयाचा अभ्यास आणि आभास दोन्ही आहे आणि माझ्यासारख्या सामान्य वाचकांसाठी त्या जगण्यासाठी आधारही देतात आणि म्हणूनच त्या वाचनीय ठरतात.
या भक्तिरचना वाचताना श्रीरामाचे दर्शन होतं, बलशाली हनुमान दिसतो, दत्तगुरूंचे दर्शन होते, संत ज्ञानेश्वरांची महती कळते, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे साईबाबा ही दर्शन देतात, शेगावला घेऊन जातात. या भक्तीरचनांमध्ये जशा आरत्या आहेत, ओव्या आहेत, अभंग आहेत तशाच वृत्तबद्ध भक्तीरसात्मक कविताही आहेत. शोभाक्षरी नावाचा एक नवीन गोड काव्यप्रकार या संग्रहात वाचायला मिळतो.
भावसुमने ही रचना शोभाक्षरी आहे.
या रचनेत चरणाच्या प्रत्येक ओळीत नऊ अक्षरे आहेत.त्यामुळे या रचनेला एक सुरेख लय,गेयता प्राप्त होते.
वाहू तुळस विठोबाला
भजू भक्तीने ईश्वराला
नको मजला व्यवहार
एका विठ्ठला नमस्कार…
हे अनंता..हे भुजंगप्रयात वृत्तातले श्लोक अतिशय तात्विक आहेत.मनाला समजावत आधार देतात.
अनंता तुला रे किती मी स्मरावे
तुझे रूप चित्ती सदा साठवावे
दिवा स्वप्न हे पाहते मी मुकुंदा
पृथा स्वर्ग करण्यास तात्काळ यावे
शिवरायावर केलेली ही ओवी पहा…
खानापाशी सैन्य किती
मावळे घाबरले
गनिमी काव्याने त्याने
गडकिल्ले जिंकले …
काही पौराणिक विषयावरच्या ओव्याही यात वाचायला मिळतात.
आणखी एक.. ही लावणी पहा —कशी मजेदार आहे!
प्रतिष्ठापना राम मूर्तीची
डोळा भरूनशान पाहूया
राया चला अयोध्येला जाऊया…
ही आध्यात्मिक लावणी मनाला आनंद देणारी आणि प्रसन्न करणारी आहे.
यात भारतीय सण,रितीपरंपरांवर आधारितही काव्यरचना आहेत.गुरुवंदना आहे.अनमोल विचारधनाचा एक खजिनाच या अमृतघटात साठवलेला आहे
विविध प्रकारच्या तल्लीन करणाऱ्या, देहभान हरपवणाऱ्या, मुग्ध करणाऱ्या, मनावर मायेची पाखर घालणाऱ्या, दुःखावर फुंकर मारणाऱ्या विचार करायला लावणाऱ्या दिशादर्शक, संदेशात्मक, तत्वचिंतनात्मक भक्तीरचनांनी भरलेला हा अमृतघट प्रत्येकानी देव्हार्यात जसे गंगाजल पात्र ठेवतो, तद्वतच संग्रहात ठेवावा इतका मौल्यवान आहे. यातलं सगळं लेखन संस्कारक्षम आहे.
कवयित्रीने मनोगतात म्हटल्याप्रमाणे वडिलांचा लेखन वारसा त्यांनी जपलेला आहे हे नक्कीच. या रचनांमध्ये संस्कार आहेत, शास्त्रशुद्ध काव्यनियमांचे पालन आहे मात्र हे लेखन स्वयंसिद्ध आहे. यात प्रभाव आहे पण अनुकरण नाही, यात अनुभव आहे पण वाङमय चौर्य नाही. हे स्वरचित आणि स्वतः केलेल्या चिंतनातून, मंथनातून, घुसळणीतून वर आलेलं नवनीत आहे.
या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध सिद्धहस्त लेखिका, कवयित्री आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या नाशिकस्थित सौ. सुमतीताई पवार यांची सुरेख प्रस्तावना लाभली आहे. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
पुन्हा एकदा सांगते या भावभक्तीच्या अमृतघटातलं अमृत चाखूनच पहा….