सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “माई” – लेखक – श्री संजय अनंत कुलकर्णी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक – माई
लेखक – संजय अनंत कुलकर्णी
प्रकाशक – रावा प्रकाशन
पृष्ठे – १६४ मूल्य- 310 रु.
नुकतंच एक पुस्तक वाचलं, ’माई’. हे छोटंसं चरित्र आहे. पुस्तक छोटं आहे, पण पुस्तकाची नायिका मोठी आहे. तिचं व्यक्तिमत्व महान आहे. ‘सामान्यातली असामान्य’ असं तिचं वर्णन लेखकाने केले आहे. आणि पुस्तक वाचलं की आपल्यालाही हे विधान पटतं. माई म्हणजे कृष्णा त्र्यंबक कुलकर्णी. पुस्तकाचे लेखक संजय कुलकर्णी हे माईंचे नातू. संजयजींनी या पुस्तकात साक्षात माई वाचाकांच्या डोळ्यापुढे उभी केली आहे. लेखकाची भाषा साधी, सोपी आहे, त्यामुळे पुस्तकाला गतिमानता प्राप्त झाली आहे. पुस्तक वाचायला घेतले, की कधी वाचून पूर्ण होते, ते कळतही नाही. लेखन खुसखुशितही झाले आहे.
या पुस्तकामागची प्रेरणा करोनाची साथ आहे, असं सांगितलं, तर आश्चर्य वाटेल. या वेळच्या लॉक डाऊनच्या काळात अख्खा देश घरात बंदिस्त झाला होता. आता घरात बसून करायचं काय? संजयजींनी विचार केला, आपल्या आजी-आजोबांच्या आठवणींचं संकलन करू या. मग त्या आठवतील तशा त्यांनी लिहिल्या व व्हाटस अपवरून नातेवाईकांना पाठवल्या. त्यांना लेखन आवडले. मग माईंचा जीवनप्रवासाचा सिलसिला व्हाटस अपवरून सुरू झाला. मग नातेवाईकांनी ते लेख परिचितांना आणि परिचितांनी ते आपल्या नातेवाईकांना पाठवले. यातून हे लेख जगभर पसरले. नंतर लोकाग्रहास्तव त्याचे पुस्तक निघाले. ते पुस्तक म्हणजे ‘माई.’ रावा प्रकाशनने अतिशय देखणे असे हे पुस्तक छापले आहे. माई रहात असलेल्या केसरी वाड्याच्या पार्श्वभूमीवर ठळक असे माईंचे छायाचित्र, असे अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे. कागद चांगला, प्रिंटिंग स्वच्छ आणि निर्दोष आहे.
माई म्हणजे पूर्वाश्रमीच्या कृष्णा सिधये. त्यांना दोन बहिणी आणि दोन भाऊ. त्यांचे वडील भटजी होते. त्यांचा जन्म १९०६ साली झाला. त्या काळात मुलींनी शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती. १०व्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि ११व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. त्या काळाच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या केशवपनाची तयारी सुरू झाली. तेव्हा माई सासरहून, आपली मैत्रीण तारा नाबरकडे पळून आल्या. तिचे वडील पुढारलेल्या विचारांचे होते. त्यांनी तिला आसरा दिला. तिने पुनर्विवाहाचा विचार बोलून दाखवला ही त्या काळातील बंडखोरीच होती. केशवपनाला नकार दिल्याने वडलांनी तिला घरी ठेवून घेतले नाही. कारण गावाने त्यांना वाळीत टाकले असते आणि त्यांचा जो भिक्षुकीचा व्यवसाय होता, तोच बंद पडला असता. पुढे त्या मालवणला प्राथमिक चौथी इयत्तेपर्यंत शिकल्या.
त्याकाळी राष्ट्रीय कीर्तनकार असलेले विनायकबुवा पटवर्धन यांना ताराच्या वडलांनी कृष्णेसाठी स्थळ बघायला सांगितले. ते कीर्तन-प्रवचन करत धुळ्याला गेले असता, त्यांना वकील त्र्यंबक कुलकर्णी यांच्याविषयी माहिती कळली. त्यांची पत्नी आजारपणामुळे दिवंगत झाली होती. त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा मुकुंदा व लग्नाची मुलगी होती. विनायकबुवा त्यांच्या घरी गेले. वडीलधा-यांशी कृष्णेविषयी बोलले. त्यांना पसंत पडल्यावर मुलीकडून होकारही कळवला. मग कृष्णा एकटीच त्यांच्याबरोबर मालवणहून धुळ्याला गेली. त्या काळात हा धीटपणाच म्हणायला हवा. त्यानंतर ‘सरदारगृहात’ सुधारणावादी कार्यकर्त्यांपुढे त्र्यंबक आणि कृष्णा यांचा पुनर्विववाह झाला. पुढे, समाजात ही जोडी, माई व भाऊ म्हणून सुप्रसिद्ध झाली.
माईंचा पुनर्विववाह कायदामान्य असला, तरी तो समाजमान्य नव्हता. पुनर्विववाहाकडे सगळे हेटाळणीनेच बघत. माईंनी विचार केला, की लोकांना घाबरून मी घरात बसले, तर रांधा, वाढा, उष्टी काढा , एवढंच माझं आयुष्य होऊन राहील. मग त्यांनी बाहेर पडायला सुरुवात केली. बाहेरची कामे स्वत: करायची, असे त्यांनी ठरवले. त्या घरच्या बग्गीतून बाजारात जात, तेव्हा, रस्त्यात लोक दुतर्फा उभे आहून त्यांच्याकडे टकमका बघत. घरातल्या खिडक्यात बायका, पुरुष उभे राहून तांच्याकडे बघत. बाईने बग्गीतून जाणे, ही त्या काळात क्रांतीच होती. सोवळ्या बायका तर त्या गेलेल्या वाटेवर पाणी शिंपडून पुढे जात. गावात त्यांच्याबद्दल अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र भाऊंच्या सामाजिक प्रतिष्ठेमुळे त्यांना टाळताही येत नसे. गावातल्या बायकांचा विरोध कमी करायला त्यांनी एक वेगळाच विचार केला. गावातल्या मेहता या दुकानदाराकडून त्यांनी लुगडी आणली व ती विकायला सुरुवात केली. हळू हळू बायकांच्या विरोधाची धार बोथट झाली. घरात बसून व्यवसाय करायची माईंची ही सुरुवात होती. पुढे त्या चांदीवर सोन्याचे पाणी दिलेले मोत्याचे दागिनेही विकू लागल्या. त्यांना मोत्याची चांगली पारख होती.
१९३१ साली माईंना दिवस गेले. माईंनी, त्यावेळी माहेरी जाण्याचा विचार केला. बाकीचे नको म्हणत असताना, माई आठव्या महिन्यात धुळ्याहून सावंतवाडीला एकट्या आल्या, पण गाव वाळीत टाकेल, या भयाने माईंच्या वडलांनी माईंना घरात घेतले नाही. माई डगमगल्या नाहीत. त्या दुसर्या इवशी राजवाड्यावर गेल्या, राणीसाहेबांना आपली सगळी हकीकत सांगितली आणि त्यांचं पहिलं बाळंतपण राजवाड्यात झालं. केशवपनाला विरोध, सासरहून पळून येणं, पुनर्विवाह, बाळंतपणाच्या वेळी, वडील घरात घेत नाहीत, म्हंटल्यावर राणीसाहेबांशी बोलून आपली अडचण सांगणे अशा अनेक प्रसंगात त्यांचा धीटपणा, बंडखोरपणाही दिसून येतो.
भाऊंची वकिली चांगली चालत होती. सगळं कसं छान चालू होतं. १९४८ साली गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर झालेल्या जाळपोळीत भाऊंचा वाडा आणि भाऊंची सारी मालमत्ता जळून नष्ट झाली. भाऊ संघाचे असल्याने त्यांना तुरुंगात टाकले गेले. माई मुलांना घेऊन चाळीसगाव, पाचोरे, जळगाव करत पुण्यात पोचल्या. भाऊही तूरुंगातून सुटून पुण्याला आले. जयंतरावांनी भाऊंना केसरीवाड्यात राहायला जागा दिली. टिळकांच्या घरात राहायला मिळालं, म्हणून भाऊंना धन्यता वाटत होती. टिळकांच्या कार्यालयातच भाऊंचे कार्यालय होते. हळू हळू वकिलीत त्यांचा चांगला जम बसला आणि माईंची पुण्यातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली. लेखक म्हणतात्त,, १९४८, ते १९८८, ही तिची चाळीस वर्षांची वाटचाल खूप प्रेरणादायक होती.
माई विवाह मंडळ चालवत. तो त्यांचा शौकच होता म्हणा ना! विवाह मंडळ नि:शुल्क होतं. पदरमोड करून ते त्या चालवत. पत्रव्यवहार माईंच्या खर्चाने होई. दाखवण्याचा कार्यक्रम अर्थात चहा-पोहे वगैरे केसरी वाड्यातच होई. अशी असंख्य लग्ने त्यांनी जमवली. त्यांची मुलगी शशीकला व मुलगा अरविंद यांची लग्ने या मंडळामार्फतच जमली.
मंगलाचे अरविंदचा मित्र श्रीकांतवर प्रेम होते, पण त्याच्या वडलांचे म्हणणे, मुलींची लग्ने झाल्यावर याचे लग्न करायचे. त्यासाठी मंगल आणि हो, माईसुद्धा सात वर्षे थांबल्या. मुकुंदाचा प्रेमविवाह. त्याची प्रेयसी हेमा कर्णिक सी.के.पी. मांस – मच्छी करणारी आणि खाणारी. पण कडक सोवळं असलेल्या माईंनी या लग्नाला मान्यता दिली. इतकंच नाही, तर इंदूताई टिळकांची वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणारी ‘अन्नपूर्णा म्हणून संस्था होती. या संस्थेतर्फे वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायलाही शिकवत. माई या वर्गांना आवर्जून जात. एकदा एक शेफ तिथे चिकन बनवायला शिकवणार होता. माई याही वर्गाला उपस्थित होत्या. मुलाने त्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, ‘अरे, हे नवीन काय आहे, ते शिकायला नको? उद्या तुम्हीच म्हणालात, ‘मला नॉनव्हेज खायचय’, तर मला मेलीला करता यायला नको?’ त्या चिकन करायला शिकल्या, इतकंच नव्हे, तर पुण्यात एकदा चिकन बनवण्याची स्पर्धा होती, तेव्हा माईंनी त्यात भाग घेऊन चक्क पाहिला नंबर मिळवला होता.
माईंचे घर म्हणजे गोकुळ होते. त्यांना तीन मुले, पाच मुली व बावीस नातवंडे होती. थोरली विमल. त्यांचे चिरंजीव संजय कुलकर्णी हे या पुस्तकाचे लेखक. लेखक म्हणतात, ‘नातेवाईकांचे परिचित आणि परिचितांचे नातेवाईक असे सगळे माईंच्याकडे आश्रयाला असत.’ नात्या-गोत्याचे लोक त्यांच्याकडे असत, असे म्हणताना, त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना गोत्यात आणणारेही लोक असत. त्यांच्याकडे कुणी शिक्षणासाठी, कुणी नोकरी मिळवण्यासाठी, कुणी नोकरी मिळाल्यावर जागा मिळेपर्यंत असे आलटून पालटून अनेक लोक रहात.
माईंच्या घरात चहाचे आधण कपाने नाही, पातेल्याने ठेवले जाई. एक मुलगी दिवसभर चहाची भांडी विसळायला असे. या चहात, कामवाली, केरवाली, भाजीवाली, बंबफोड आणणारा हमाल, पोस्टमन, भाऊंचे अशील असे अनेकानेक असत.
वधूवर सूचक मंडळाचे आणि माईंच्या मोत्याच्या व्यापाराचे व्यवस्थापन कसे होते, हा भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. अतिशय खुसखुशीतपणे आणि दिलखुलासपणे लेखकांनी ही माहिती लिहिली आहे. ती काही चार-सहा ओळीत वर्णन करण्यासारखी नाही. १९७८ साली संधिवातामुळे माईंचे हात-पाय चालेनासे झाले. त्यांचे उभे रहाणे बंद झाले. तरीही माईंचा मोत्याचा व्यापार चालू होता. त्या खुरडत खुरडत चालत. तसाच जिना उतरत वाड्याच्या अगदी दाराशी रिक्षा लावली जाई. त्या मोती चौकात जात. दुकानाच्या मालकाला रिक्षाशी बोलावत आणि व्यवहार करत. जवळ जवळ शेवटपर्यंत त्यांचा हा व्यवसाय चालू होता. हाही भाग प्रत्यक्षच वाचायला हवा. माईंच्या शारीरिक गुढग्यांनी त्यांच्या मानसिक गुढग्यांपुढे गुढगे टेकले. माई विमा एजंटही होत्या. त्यांची दोन बॅंकांमधून खाती होती. देण्या-घेण्याचे व्यवहार चेकने त्या करत. त्याबाबतच्या अनेक डायर्यांतून त्यांच्या नोंदी असत.
माईंबद्दल लिहावं, तेवढं थोडंच. सगळं लिहायचं झालं, तर पुस्तकावरचं पुस्तक होईल. माईंच्या बोलण्यात ‘मेले’ किंवा ‘मेल्या’ हे खास शब्द असत. वाक्याची सुरुवात किंवा शेवट या शब्दांनी होत असे. ‘बस रे मेल्या’ किंवा ‘तेवढी डायरी काढ ग मेले’, ’एवढं पत्र टाक रे मेल्या’, वगैरे… वगैरे… या मेले’ किंवा ‘मेल्या’मध्ये माईंचा लडिवाळ मायाळूपणा होता. लेखक म्हणतात, ‘माई सामान्यातली असामान्य होती.’ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा जसा पुढच्या पिढ्यांवर उमटला, तसाच त्यांच्या संस्काराचा वारसाही त्यांना मिळाला, तो कसा हेही लेखकाने स्पष्ट केलय.
माईंबद्दल इथे थोडंसं लिहिलं. खूप काही लिहायचं राहीलंही आहे. वाचकांनी ते पुस्तकातच वाचावं आणि माईंना पूर्णपणे जाणून घ्यावं.
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170 e-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈