सौ. वंदना अशोक हुळबत्ते
चित्रकाव्य
– चिरयौवन – कवी अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
भल्या पहाटे दारावरती
कुणी न कळे केली टकटक
उत्सुकतेने दार उघडले
कुणी पाहुणा येई अचानक
☆
निमिषातच मज कळून चुकले
वार्धक्यच ते होते माझे
वेळेवरती येणे त्याचे
पण मी तर बेसावध होते.
☆
घरात घुसण्या पुढे सरकले
जेव्हा त्याचे अधीर पाऊल
वाट अडवूनी उभी राहिले
विनवीत त्याला होऊन व्याकूळ
☆
‘अजून आहे बराच अवधी
उगा अशी का करीशी घाई?
हसून म्हणाले, पुरेत गमजा’
ओळखतो मी तव चतुराई !’
☆
‘अरे, पण मी अजून नाही
जगले क्षणही माझ्यासाठी
व्याप ताप हे संसाराचे
होते सदैव माझ्यापाठी
☆
एवढ्यात तर मिळे मोकळिक
मित्रमंडळी जमली भवती
ज्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये
सदा रहावे असे सोबती!
☆
मित्रांचे अन् नाव ऐकता
दोन पावले मागे सरले
हर्ष नावरे वार्धक्याला
जाता जाता हसून म्हणाले,
☆
‘मित्रांसाठी जगणार्याला
मी कधीही भेटत नाही.
वय वाढले जरी कितीही
अंतरी त्याच्या चिरयौवन राही.!!
☆
कवी – अज्ञात
प्रस्तुती – सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈