श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! विधायक कार्य ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“गुडमॉर्निंग पंत”
“नमस्कार, नमस्कार. पण आज तुझ्या आवाजात उत्साह वाटत नाही.”
“पंत कसा असणार उत्साह ? बारा तेरा दिवस सारखं घरात बसून कंटाळणार नाही का माणूस ?”
“तू म्हणतोयस ते बरोबरच आहे. अरे सारखं सारखं घरात बसून, मला पण मी US ला मुलाच्या घरी तर नाही ना, असं वाटायला लागलंय हल्ली ! पण मग तुझ्या घरातल्या कामांचे काय, सगळी कामं संपली की काय ?”
“पंत आता साऱ्या कामांची एवढी सवय झाल्ये की… “
“दोन तीन तासात तू मोकळा होत असशील ना रोज ? “
“हो ना, मग करायच काय हा प्रश्न आ वासून उभा राहतो.”
“अरे मग बायको बरोबर गप्पा मारायच्या !”
“आता लग्नाला दोन वर्ष होऊन गेली, सगळ्या गप्पा बिप्पा मारून संपल्या.”
“काय सांगतोस काय, दोन वर्षात गप्पा संपंल्या ? पण आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी आमच्या गप्पा अजून काही संपत नाहीत !”
“काय सांगता काय पंत, तुमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली तरी तुमच्या गप्पा अजून…. “
“अरे म्हणजे ही गप्पा मारते आणि मी गप्प राहून फक्त हुंकार देत त्या ऐकतो एव्हढेच ! ते सोड, गप्पा नाही तर नाही बायको बरोबर पत्ते बित्ते तरी…… “
“नाही पंत, ती पुण्याची असल्यामुळे तिला पत्त्यांचा तिटकाराच आहे, लहानपणा पासून.”
“मग काही वाचन…… “
“अहो पंत, वाचून वाचून वाचणार तरी किती आणि काय काय ? आणि दुसरं असं की वाचायला सुरवात केली, की झोप अनावर होते आणि झोपून उठलं की पहिली पाच सात मिनिट कळतच नाही, की आपण दुपारचे झोपून उठतोय का रात्रीचे ?”
“पण मग टीव्ही आहे ना बघायला ?”
“अहो पंत त्यावर पण हल्ली सगळे जुने जुने एपिसोड दाखवतायत, काही ‘राम’ नाही उरला आता त्यात !”
“मग टीव्ही वरच्या बातम्या….”
“त्या करोना व्हायरस घालवायला चांगल्या आहेत !”
“म्हणजे, मी नाही समजलो.”
“पंत, म्हणजे त्या बातम्या करोना व्हायरसला दाखवल्या ना, तर तो त्या बघून स्वतःहून पळून जाईल चीनला !”
“काही तरीच असतं तुझ बोलण ! आता मला सांग, आज काय काम काढलेस माझ्याकडे ?”
“पंत, माझ्याप्रमाणेच आपल्या चाळीतले सगळे रहिवाशी बोअर झालेत आणि…. “
“चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने ते तुला मोबाईलवरून सारखे फोन करून यावर काहीतरी उपाय करा, टाइम पास कसा होईल ते सांगा, असे सतवत असतात, बरोबर ?”
“कस अगदी बरोबर ओळखत पंत !”
“अरे चाळीस वर्षांचा तजुरबा आहे मला चाळकऱ्यांचा, सगळ्यांची नस अन नस ओळखून आहे म्हटलं मी !”
“हो पंत, आपल्या चाळीतील तुम्हीच सर्वात जुने रहिवासी, त्यामुळे तुम्हाला… “
“मस्का बाजी पुरे, तुझा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय आणि त्यावर माझ्याकडे उपाय सुद्धा आहे !”
“सांगा सांगा पंत, तुमचा उपाय ऐकायला मी अगदी आतुर झालोय !”
“सांगतो, सांगतो, जरा धीर धरशील की नाही !”
“हो पंत, पण एक प्रॉब्लेम… “
“आता कसला प्रॉब्लेम?”
“अहो सध्या सगळेच कोरोनाच्या संकटामुळे आपापल्या घरी अडकलेत आणि एकमेकांना भेटू…”
“शकत नाहीत, माहित्ये मला.
खरच दुर्भाग्याची गोष्ट आहे ना ?”
“यात कसली दुर्भाग्याची गोष्ट, साऱ्या जगावरच संकट ओढवलं आहे त्याला… “
“अरे त्या बद्दल नाही बोलत मी.”
“मग कशा बद्दल बोलताय पंत ? “
“आता हेच बघ ना, गेल्या बारा तेरा दिवसात मुंबईची हवा, कसलेच पोल्युशन नसल्या मुळे कधी नव्हे इतकी शुद्ध झाली आहे आणि त्याचा आनंद घ्यायचे लोकांच्या नशिबातच नाही. उलट लोकांना मास्क लावून फिरायची पाळी आली आहे.”
“हो ना पंत, पण माझी बायको म्हणते मी अजिबात मास्क नाही लावणार.”
“का, ती पुण्याची आहे म्हणून का ?”
“म्हणजे ?”
“अरे जसा पूर्वी पुणेकरांचा हेल्मेटला विरोध होता तसा मला वाटलं मास्कला पण आहे की काय, म्हणून मी विचारलं.”
“तस नाही पंत, त्या मागे तीच वेगळेच लॉजिक आहे.”
“कसलं लॉजिक ?”
“ती म्हणते ‘मी मास्क लावला तर, मी रागावून गाल फुगवून बसल्ये हे तुम्हाला कस काय कळणार ?”
“खरच कठीण आहे रे तुझ !”
“ते जाऊ दे पंत, आता दोन वर्षात मला सवय झाल्ये त्याची. पण आधी मला सांगा तुमच्याकडे टाइमपास साठी काय… “
“अरे नेहमीच टाइमपास न करता, सध्याच्या परिस्तिथीत थोडे विधायक कार्य पण करायला शिका ! एकदा का या संकटातून सुटका झाली की मग जन्मभर टाइमपासच करायचा आहे.”
“म्हणजे, मी नाही समजलो?”
“सांगतो, आता आपल्या चाळीत एका मजल्यावर पंधरा बिऱ्हाड आणि चार मजले मिळून साठ, बरोबर ?”
“बरोबर !”
“तर तू चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना सांग, येत्या रविवारी सगळ्यांनी घरटी दहा दहा पोळ्या आणि त्यांना पुरेल इतकी कुठलीही भाजी भरून ते डबे चाळ
कमिटीच्या ऑफिस मधे आणून द्यावेत.”
“आणि ?”
“तू आज एक काम करायचस, आपल्या के ई एम हॉस्पिटल मधे जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटून सांगायचं, की येत्या रविवारी आमच्या अहमद सेलर चाळी तर्फे, आम्ही जेवणाचे साठ डबे पाठवणार आहोत. ते आपल्या हॉस्पिटल मधे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि वॉर्ड बॉईजना वाटायची व्यवस्था करा.”
“काय झकास आयडिया दिलीत पंत, त्या निमित्ताने सगळ्यांचा वेळ पण जाईल आणि काहीतरी विधायक कार्य हातून घडल्याचा आनंद पण मिळेल ! धन्यवाद पंत !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
०३-०२-२०२३
दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈