सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री ज्योत्स्ना तानवडे
💐 अ भि नं द न 💐
आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तावडे यांचा *आनंदाच्या वाटेवर* हा ललित लेख संग्रह पुणे येथे नुकताच प्रकाशित झाला आहे. या नव्या पुस्तक प्रकाशनाबद्दल ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
आज त्यांचा लेख “विसाव्याचा थांबा” प्रकाशित करीत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
विविधा
☆ “विसाव्याचा थांबा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
” कुहू ऽऽ कुहू ऽऽ ” कोकीळेची साद ऐकू आली. जणू वसंताच्या आगमनाची वर्दीच दिली गेली. आता वातावरणात फरक पडत जातो. हळूहळू थंडीचा कडाका कमी होत जाऊन दिवसाची उब वाढायला सुरुवात होते. उन्हाळी कामांची लगबग सुरु होते.
दरवर्षी शाळेच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होतो आणि उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीला आरंभ होतो. तसे तर सुट्टीचे वेध परीक्षेच्या आधीपासूनच लागलेले असतात. सुट्टीतल्या धमाल मस्तीचे बेतही तयार असतात. एक काळ असा होता की, ‘ सुट्टी आणि मामाचा गाव’ यांचं अतूट समीकरणच होतं. मामाकडे मामे – मावस भावंडांचा मेळावा जमायचा तर स्वतःच्या घरात चुलत – आत्ये भावंड जमा व्हायची. सुट्टीतलं जणू शिबिर सुरू व्हायचं. एकत्र गप्पा, गोष्टी, गाणी यांची धमाल व्हायची. वस्तूंची देवाणघेवाण, गोष्टी वाटून घेणे, एकमेकाला समजून घेणे, न भांडता रागावर ताबा मिळवणे अशा कितीतरी गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या. नव्या गोष्टी बनवायला शिकायचो. भातुकलीची तर मजा औरच असायची. शेवटी कला सादरीकरणाला घरचेच व्यासपीठ मिळायचे. सभाधीटपणा यायचा. आता या सर्व गोष्टींच्या आठवणी सुद्धा खूप आनंद देतात. किती छान होते ते दिवस. या एकत्रित रहाण्याने मजा तर यायचीच पण नाती आणखी घट्ट व्हायची.
पण आता काळ बदलला. सामाजिक परिस्थिती बदलली. कुटुंब दुरावली. तशी सुट्टीतली ती मजा सुध्दा संपली. आता सुट्टीचे वेगळेच बेत सुरु होतात. लहान मोठ्या मुलांसाठी सुट्टीत वेगवेगळी शिबिरं भरवली जातात. वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. आज-काल बरेच जण पर्यटनाला प्राधान्य देत आहेत. कारण आजचे जीवनमान खूप धावपळीचं झालेले आहे. एकत्र येत पुन्हा जवळीक साधणे अनेक दृष्टीने अवघड आणि गैरसोयीचे झालेले आहे. अशावेळी या पर्यटनाचा मात्र छान उपयोग होतो आहे. पुन्हा सर्वांनी एकत्र येणं या गोष्टीची जाणीव कोव्हिडच्या काळामध्ये जास्त तीव्रतेने झाली. ट्रिपच्या निमित्ताने एकत्र येण्याचा आम्ही कुटुंबीयांनी खूप छान अनुभव घेतलेला आहे.
जागतिक महामारीने वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, लॉक डाऊन, आयसोलेशन, खा- प्या- खेळा पण सगळं काही घरातूनच या गोष्टीचा अतिशय भयावह अनुभव अकल्पितपणे घ्यावा लागला. लहान-मोठे सगळेजणच यामुळे त्रासले, वैतागले होते. या मनस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी मिळून कुठेतरी चार दिवस ट्रीपला बाहेर जावे असा विचार सुरू झाला.
कारण निर्बंध कमी झाले, बाहेरचे वातावरण सुधारले. पण मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा यांच्या ताणाने ते अगदी कंटाळले होते. तर मोठे लोक रोजची धावपळ, सकाळ, संध्याकाळ गर्दीतून प्रवास, कामाचा ताणतणाव, ताणलेले नातेसंबंध, कामाच्या ठिकाणचे दडपण अशा एकूण व्यस्त आणि तणावपूर्ण वातावरणाने अगदी थकून गेले होते. यापासून चार दिवस तरी सुटका मिळावी, थोडे स्वास्थ्य, निवांतपण अनुभवावं म्हणून पुणे ते हरिहरेश्वरचे नियोजन केले होते.
आम्ही घरचेच बारा जण गेलो होतो. हरिहरेश्वरला ‘भोसले वाडा’ हा बंगलाच बुक केला होता. चार बेडरूम्स, किचन, हॉल, गच्ची, अंगण असा प्रशस्त बंगला होता. गच्ची आणि हॉल मध्ये झोपाळे बांधलेले होते. त्यामुळे लहान-मोठे सर्वजण खुश होते. किचनही सुसज्ज होते. त्यामुळे चहा कॉफी मनाप्रमाणे घेण्याची मजा घेता आली.
बंगल्याजवळच्या आतल्या रस्त्याने सरळ समुद्रावर जाता येत होते. मुख्य गर्दीच्या किनाऱ्यापासून थोडेसे दूर स्वच्छ, निवांत, कसलीही वर्दळ नसलेला हा किनारा. सर्वांनी चार दिवस समुद्रात डुंबणे, पाण्यात खेळणे, ओल्या मातीत खेळणे, ओल्या वाळूतून पाण्यातून दूरवर चालणे याचा मनसोक्त आनंद घेतला. सूर्यास्ताचा आनंद तर अवर्णनीय होता.
एक दिवस ‘दिवे आगर’च्या गणेशाचे दर्शन घेतले. एक दिवस ‘बाणकोट’ हा किनाऱ्यावर टेहळणीसाठी बांधलेला छोटा गड बघीतला. बाणकोट म्हणजे सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्याची प्रमुख जागा होती. सावित्री नदीतील फेरी सेवा घेत आपल्या गाड्यांसह बोटीतून नदीच्या पलीकडे जाण्याचा अनुभव वेगळाच होता. एक दिवस ‘हरिहरेश्वर’ दर्शन आणि मंदिर प्रदक्षिणा केली. इथे स्थलदर्शन करताना काळजी घ्यावी लागली. उन्हाळा तीव्र असल्याने सकाळी आणि दुपारनंतर बाहेर जाणे आणि मधल्या वेळात बंगल्यावर खेळणे, विश्रांती असे नियोजन केले होते.
या जोडीला हापूस आंबे, उकडीचे मोदक, घावन, बिरड्याची उसळ अशा खास कोकणी पदार्थांबरोबर स्वादिष्ट नाष्टा, जेवण यांची मेजवानी होती. त्यामुळे चार दिवस स्वयंपाका पासून सुट्टी मिळाली. हॉल मध्ये फक्त एकच टी. व्ही होता. त्यामुळे सिरियल्स, बातम्या यांच्या भडीमारापासून चार-पाच दिवस अगदी शांततेत गेले. त्या ऐवजी सर्वांच्या गप्पा, जुन्या आठवणी यांना वेळ मिळाला. जोडीने कॅरम, पत्ते, बुद्धिबळ खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. नातवंडेही त्यात आनंदाने सहभागी झाली होती.
या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट जर कोणती झाली असेल तर ती म्हणजे इथे असलेली इंटरनेटची ‘अवकृपा’. या गोष्टीचा मला मात्र खूप आनंद झाला.
एरवी पुण्यामध्ये सर्वांची उजाडल्यापासून फोनच्या तालावर धावपळ सुरू होते. नाचकामच म्हणा ना. ‘वर्क फ्रॉम होम ‘म्हणजे काय तर अखंड कानाला फोन चिकटलेला. कान दुखायला लागतो. डोकं कलकलायला लागतं. चिडचिड होते. त्यावरुन घरात वादावादी, गैरसमज, ताणतणाव वाढतात. घरादाराची शांतताच जाते. इथे मात्र वेगळाच अनुभव येत होता. एक दोघांचे फोन रेंज असल्याने चालू होते ते संपर्कासाठी, निरोपासाठी, बुकिंगसाठी उपयोगी पडत होते. पण इतर बहुतेकांचे फोन रेंज अभावी बंद होते. त्यामुळे हात आणि कानही रजेवर होते. मनही रजेचे निवांतपण मनसोक्त अनुभवत होते. आम्हालाही एरवी कामात बुडालेल्या मुलांचा विनाव्यत्यय पूर्णवेळ सहवास मिळत होता. आम्हा दोघा जेष्ठांसाठी ही ट्रिपची खास कमाई होती.
आयटी क्षेत्राने सर्वच क्षेत्रात आज-काल अक्षरशः क्रांती केली आहे. सगळे जग इतके जवळ आले आहे की, शब्दशः घरात सामावले आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीला तर काळ-वेळाचे नियम लावताच येत नाहीत. प्रत्येक देशाच्या वेळेनुसार रात्रंदिवस संपर्क, चर्चा, मीटिंग्ज सुरू असतात. त्यामुळे या नोकरीत शरीरावर, मनावर अक्षरशः अत्याचार होत असतात. शरीराचे नैसर्गिक चक्रच विस्कटले जाते. त्यामुळे शारीरिक व्याधी, मानसिक ताण-तणावांचे प्रमाण वाढलेले आहे. तो ताण कमी करण्यासाठी मधून मधून अशी पूर्ण विश्रांती घेणे अत्यावश्यक झाले आहे.
आपल्या रोजच्या सवयींपेक्षा वेगळ्या वातावरणात गेल्याने ही सवयींची साखळी लवकर तुटते. वेगळे ठिकाण, वेगळे वातावरण, वेगळी माणसे, वेगळ्या सोयीसुविधा यामुळे वेगवेगळे अनुभव येत असतात. काही घटक छान सुखद अनुभूती देतात. एखाद्या अनोख्या अनुभवाने ‘अरे व्वा, असे पण होऊ शकते !’ ही नव्याने जाणीव होते. तर निसर्गातल्या विविधतेने मन अचंबित होते. अशा भटकंतीने त्या त्या ठिकाणची नैसर्गिक वैशिष्ट्ये, खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा यांची ओळख होते. मन आपोआप शांत होत गेलेले आपल्याला जाणवतही नाही. पण आपण मात्र हासत खिदळत, गाणी म्हणत, गप्पा मारत निवांत फिरत असतो एवढे मात्र खरे.
यासाठी मधून मधून असे छोटे छोटे ब्रेक किंवा ‘विसाव्याचे थांबे’ घेणे अतिशय गरजेचे असते. त्यासाठी फार प्रसिद्ध ठिकाणे मात्र नसावीत. कारण पुन्हा तिथेही गर्दी, रांगा लावणे, वेळेच बंधन यामुळे धावाधाव, ताणतणाव येतोच. तुलनेने थोडीशी छोटी अशी ही ठिकाणे मात्र यादृष्टीने खूपच सोईची असतात.
इथे मुख्य म्हणजे मनाला विश्रांती मिळते. जिवलगांशी सुसंवाद होतो. सगळे ताण, गैरसमज विसरून नाती जवळ येतात. निसर्गाचे सान्निध्य अनुभवायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. काही गोष्टी नव्याने समजतात. आत्मपरिक्षण केले तर चुका लक्षात येतात. मग त्या सुधारायची संधीही मिळते. शेवटी रोजचा जीवन संघर्ष करायचा तो काय फक्त पैसे मिळवण्यासाठी ? नाही! तर कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी, सगळ्यांच्याच आनंदासाठी. तेव्हा रोज धावणाऱ्या प्रवाशांना विश्रांती हवीच ना! त्यामुळे थकलेली गाडी पुन्हा नव्या दमाने रुळावर येते. नवीन ऊर्जा, नवा उत्साह, नवी उमेद, नवे विचार, नव्या योजना घेऊन येते. त्यासाठी मनाला ताजेतवाने बनवणारे असे थांबे घ्यायलाच हवेत.
निसर्गाचे अद्भुत विश्व डोळे भरून पहायला, अनुभवायला हवे. मग मन आपोआप गायला लागते,
या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे !
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈