3 ऑक्टोबर – संपादकीय
म.वा. धोंड (मधुकर वासुदेव धोंड ) हे मराठीतले जेष्ठ समीक्षक. आज त्यांचा जन्मदिन. (३ऑक्टोबर १९१४) ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्र्लेषणापासून मर्ढेकरांच्या कवितांच्या शोधापर्यंत आपल्या विचक्षण समीक्षेबद्दल त्यांची ख्याती होती, असे ‘संजीव वेलणकर’म्हणतात. आपल्या मर्मग्राही लेखणीने मराठी समीक्षा क्षेत्रावर यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला. मूलगामी संशोधनाची जोड त्यांच्या समीक्षेला होती. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या ग्रंथाला १९९७ चा साहित्य अॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. ज्ञानेश्वरी स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य ( साहित्य आणि समीक्षा) , मराठी लावणी (समीक्षा) , जाळ्यातील चंद्र, तरीही येतो वास फुलांना, काव्याची भूषणे इ. पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यांचा स्मृति दिन ५ ऑक्टोबर २००७ ला आहे.
☆ ☆ ☆ ☆ ☆
कारवारमध्ये २२ सप्टेंबर १९०९ मध्ये दत्ता तुकाराम बांदेकर या अवलिया साहित्यिकाचा जन्म झाला. कानडी भाषेत ७ बुकं शिकून, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणारे हे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्या प्रकृतीचे मराठी लेखक. त्यांचा स्मृतीदिन आज ३ ऑक्टोबरला आहे. (१९५९)
आचार्य आत्रे यांचा ते उजवा हात होते. साप्ताहिक नवयुगमध्ये ते ‘रविवारचा मोरावळा’ हे सादर लिहीत. त्यांच्या लेखनात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यावर चुरचुरीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेली त्यांची सदरे, त्यावेळी खूप गाजली. ‘सख्या हरी’ या टोपण नावाने त्यांची सदरे प्रकाशित होत. ‘आक्काबाईचा कोंबडा’, जग ही रंगभूमी’, ‘घारुआण्णांची चंची’ ही त्यांची सदरे अतिशय लोकप्रिय झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे ते लाडके लेखक झाले. ते स्वत: मात्र प्रसिद्धी पाराङ्मुख होते.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈