4 ऑक्टोबर – संपादकीय
( १६/१०/१९०७ — ४/१०/८२ )
प्रसिद्ध कवी कै. श्री. सोपानदेव चौधरी यांचा स्मृतीदिन–—-
कवयित्री बहिणाबाई यांचे हे सुपुत्र स्वतः एक उत्तम कवी होते. कविता लोकांपर्यंत पोहोचायला हवी या उद्देशाने १९२० च्या दशकात तेव्हाच्या काही नावाजलेल्या कवींनी रविकिरण मंडळाची स्थापना केली होती. सोपानदेव चौधरी हे या मंडळाचे सक्रीय सभासद होते. नुसते कविता-वाचन करण्याऐवजी, कविता जर गाऊन सादर केली तर ती लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचेल या विचाराने, सोपानदेवांनी आपल्या कविता चाल लावून सादर करण्यास सुरुवात केली. आणि रसिकांना हा प्रयोग फारच आवडला. पुढे हा एक पायंडाच पडला. सोपानदेवांच्या अशा बऱ्याच कवितांची झालेली गाणी प्रसिद्ध आहेत. एकच उदाहरण द्यायचे झाले तर, “ आली कुठूनशी कानी , टाळ मृदूंगाची धून “ –हे गाणे, जे रसिकांच्या मनात कायमचे नोंदले गेले आहे.
——सोपानदेवांनी केलेले एक अतिशय महत्वाचे काम आवर्जून सांगायलाच हवे. त्यांच्या आई बहिणाबाई यांच्या, साध्या- सोप्या आणि सहज शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाणाऱ्या कितीतरी असामान्य काव्यरचना, आणि त्यापैकी काही कवितांची झालेली गाणी अतिशय लोकप्रिय झालेली आहेत हे आपण सगळेच जाणतो. बहिणाबाई स्वतः अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांना सुचणारं काव्य त्या काम करता करता म्हणायच्या. अर्थातच त्या कविता कुठेही लिहिलेल्या नव्हत्या. त्यांच्या अवतीभवतीच सोपानदेव असायचे. त्यामुळे त्यांच्या कानावर सतत त्या कविता पडायच्या. ते मोठे झाल्यावर आपल्या आईच्या कविता आठवून आठवून त्यांनी कागदावर उतरवल्या, आणि म्हणून त्या महान कवयित्रीचे अप्रतिम काव्य रसिकांपर्यंत पोहोचले, आणि याचे पूर्ण श्रेय सोपानदेवांना जाते.
कवी सोपानदेव चौधरी यांना मनःपूर्वक आदरांजली. आजच्या अंकात वाचूया त्यांची “ आमुची लिपी “ ही मराठीची लिपी म्हणून आणि बोली म्हणून असलेली वैशिष्ठ्ये सांगणारी एक वेगळीच कविता.
सौ मंजुषा सुनीत मुळे
(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈