6 ऑक्टोबर – संपादकीय
आज महामहोपाध्याय द.वा. पोतदार (दत्तो वामन पोतदार) यांचा स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर १९७९) . ५ ऑगस्ट १८९०ला त्यांचा जन्म झाला. हे मोठे इतिहासकार, लेखक आणि वक्ते होते. भारताच्या केंद्रशासनाचे ते मान्यता प्राप्त पंडित होते. १९४८ मधे भारत सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी दिली. १९६१ ते१९६४ ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. ‘मराठी शुद्धलेखन महामंडळा’चे ते अध्यक्ष होते. ‘मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. १९३९ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य समेलमनाचे ते अध्यक्ष होते.हिन्दी साहित्य समेलनात त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी दिली होती.बनारस हिंदू विश्व विद्यालय आणि पुणे विद्यापीठ या दोन्हीही संस्थांनी त्यांना डी. लिट. पदवी दिली होती. ‘त्यांची ऐतिहासिक चरित्र लेखन’, ‘भारताची भाषा समास्या’, ‘मराठी इतिहास व संशोधन’, ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार इ. अनेक पुस्तक प्रसिद्ध आहेत. १९६७ मधे त्यांना ‘पद्मभूषण’ हा पुरस्कार मिळला होता.
☆☆☆☆☆
ग.रा. कामत यांचाही आज स्मृतीदिन. (६ ऑक्टोबर २०१५). त्यांचा जन्म १२ मार्च १९२३ चा. मराठी आणि हिन्दी चित्रपटांचे कथा लेखन त्यांनी केले. मौज व सत्यकथा या मासिकांचे ते काही काळ संपदक होते. ‘नवसाहित्य या शब्दाचे ते जनक. जसे नवकविता, नवकथा इ.. कन्यादान, लाखाची गोष्ट, (ग.दी.मांसहित), शापित इ. गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या होत्या. त्यांची कथा असलेल्या ‘शापित’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.त्यांनी लिहीलेल्या पटकथांचे हिन्दी चित्रपटही गाजले. कच्चे धागे, कला पानी, मेरा गाँव मेरा देश इ. चित्रपटांच्या कथा त्यांच्या होत्या. त्यांना सह्याद्री वाहिनी आणि झी मराठीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला होता.
☆☆☆☆☆
वा.रा.कांत ( वामन रामराव कांत ) या कविवर्याँचा जन्म ६ऑक्टोबर १९१३चा ‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे ते संपदक होते. निजाम सरकारच्या हैद्राबाद आणि औरंगाबाद या आकाशवाणी केंद्रावर ते मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करत होते. मुंबई आकाशवाणी केंद्रावरून ते निवृत्त झाले. त्यांनी कविता, समीक्षा, अनुवाद या क्षेत्रात लेखन केले. त्यांचे दोनुली, पहाटतारा, रुद्रवीणा इ. १० कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी तू हसत रहा, बगळ्यांची माळ फुले इ. त्यांची गाणी लोकप्रिय झाली. वेलांटी (कविता संग्रह ), दोनुली (कविता संग्रह) मरणगंध (नाट्यकाव्य) या संग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
☆☆☆☆☆
निरंजन उजगरे या कवीचा जन्मही ६ ऑक्टोबर(१९४९)चा. तेही लेखक, कवी आणि अनुवादक होते. ते बहुभाषिक असून मराठी, हिंदी, इंग्लीश, तेलुगू, सिंधी , रशियन इ. भाषा त्यांना येत होत्या. काव्यपर्व, जायंट व्हील, म्हराष्ट्राबाहेरील मराठी, फळणीच्या कविता, दिनार प्रहार इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना सोव्हिएत लँडचा नेहरू पुरस्कार व ना.वा.टिळक पुरस्कार मिळाले होते. मालवण इथे १९९६साली झालेल्या ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९९९ साली डोंबिवलीयेथील कवि रसिक मंडळाच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
श्रीमती उज्ज्वला केळकर
(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈