सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ ऑगस्ट – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
लोकमान्य टिळक
लोकमान्य बाळ (ऊर्फ केशव) गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1ऑगस्ट 1920)हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.
ते बी.ए., एलएल. बी. झाले होते.
विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यात टिळक शिक्षक म्हणून विनावेतन काम करीत. पुढे 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्या संस्थेतर्फे 1885मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यात टिळक गणित व संस्कृत हे विषय शिकवीत.
1881मध्ये चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही वर्तमानपत्रे सुरू केली. आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. तरी केसरीत टिळकांचे अग्रलेख प्रसिद्ध होत. पुढे आगरकर व टिळक यांच्यात मतभेद झाल्यानंतर टिळक केसरीचे संपादक झाले.1881 ते 1920 या चाळीस वर्षांत टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. त्यापैकी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे?’, ‘प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल?’, ‘टोणग्याचे आचळ’, ‘टिळक सुटले पुढे काय?’ वगैरे अग्रलेख अजूनही प्रसिद्ध आहेत.
टिळक हे संस्कृत, गणित, खगोलशास्त्र या विषयांमधील मान्यताप्राप्त अभ्यासकही होते. अत्यंत क्लिष्ट विषय ते अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळत.
त्यांची ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’, भगवदगीतेतील कर्मयोगाची समीक्षा करणारे ‘गीतारहस्य’, ‘टिळक पंचांग पद्धती’ इत्यादी अनेक पुस्तके आजही लोकप्रिय आहेत.
‘टिळकांची पत्रे’, ‘सिलेक्टेड डॉक्युमेंट्स ऑफ लोकमान्य बाल गंगाधर टिलक,1880 -1920’ वगैरे पुस्तकांत टिळकांच्या लेखनाचे संपादन केले आहे.
टिळकांच्या जीवनावर ‘लोकमान्य :एक युगपुरुष’ हा चित्रपट काढला होता.
लोकमान्य टिळकांच्या आजच्या या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈