श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश हरि पाटील 

“कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे दुसरे सुंदर व मनोगत दृश्य नाही.”

हे विचार आहेत लेखक व कवी गणेश हरि पाटील यांचे , जे ग.ह.पाटील या नावानेच प्रसिद्ध होते.मुलांचे भावविश्व जाणून घेवून त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे आजही फुलांसारखे ताजे टवटवीत वाटते.देवा तुझे किती सुंदर आकाश,पाखरांची शाळा भरे पिंपळावरती,शर आला तो धावून आला काळ,डरांव डरांव का ओरडता, छान किती दिसते फुलपाखरू या कविता आठवतात ना ? या सर्वांचे कवी आहेत ग.ह.पाटील.

त्यांची काही पुस्तके:बालशारदा,रानजाई,पाखरांची शाळा,लिंबोळ्या,एका कर्मवीराची कहाणी,आधुनिक शिक्षण शाळा,गस्तवाल्याची गीते इ.

ग.ह.पाटील यांचे निधन वयाच्या 83 व्या वर्षी 01/07/1989 ला झाले.त्यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेत त्यांचे स्मरण करू.

☆☆☆☆☆

लक्ष्मण नारायण जोशी

ल.ना.जोशी हे ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक,ग्रंथसंपादक व पत्रकार होते.त्यांनी मॅट्रीक नंतर पशूवैद्यकशास्त्र शिक्षण घेतले.

सुरूवातीला त्यांनी ‘इंदुप्रकाश’ व ‘गुराखी’ या पत्रांतून लेखन केले.त्या काळात केलेल्या लेखनामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना तुरूंगवास भोगावा लागला.त्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले.त्यांनी विविध एकवीस विषयांवर सुमारे दीडशे पुस्तके लिहिली आहेत.

त्यांच्या लेखनाची विविधता अशी:

चरित्रलेखन: संत एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, बाजीराव,महाराणा प्रताप इ.

भाषांतरे: अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर,ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर,धर्मसिंधु,सार्थ छंदोबद्ध पुरूषसूक्त व शेक्सपियरच्या तीन नाटकांचे भाषांतर. इ

स्वतंत्र लेखन : धंदे शिक्षण,फलाहारचिकित्सा,सचित्र ब्रह्मयोग विद्याशिक्षण,लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश, विनोदलहरी, शांतिनिकेतनमाला, सुगंधी शिक्षक, वर्णजल चिकित्सा शिक्षक  इत्यादी.

याशिवाय त्यांनी अकरा कादंब-या लिहील्या आहेत.

असे हे चतुरस्त्र लेखक वयाच्या 74 व्या वर्षी 01/07/1947 रोजी निधन पावले.त्यांना जाऊन इतका काळ लोटला असला तरी त्यांच्या समृद्ध लेखनामुळे ते अमरच आहेत.त्यांच्या स्मृतीस वंदन!

☆☆☆☆☆

रामचंद्र चिंतामण ढेरे

रा.चिं.ढेरे हे मराठी इतिहास संशोधक व लेखक होते.प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.सांस्कृतिक इतिहास या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांचे अनेक संशोधकांनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत व त्यांना सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.समकालीन कागदपत्रांचा संदर्भ पाहून इतिहास संशोधन करावे असे त्यांचे मत होते.त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता.त्यात संत साहित्य,लोकसाहित्य,

लोकसंस्कृती अशा विविध विषयांचा व मराठी वाड्मयाचा समावेश होता.हा सर्व संग्रह त्यांनी अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

साहित्य संपदा :

अमृतकन्या, श्री आनंदयात्री, कथापंचक, कल्पद्रुमाचे तळी, कल्पवेल, गंगाजल, चित्रप्रभा, श्री तुळजाभवानी, त्रिविधा, नाथ संप्रदायाचा इतिहास, नामदेव-एक विजययात्रा, पुण्याई, प्राचीन मराठीच्या लोकधारा, लोकसंस्कृतीचे विश्व, विराग आणि अनुराग, इत्यादी.

माहितीपुस्तिका:

एका जनार्दनी–पैठण

श्रीगुरूंचे गंधर्वपूर–गाणगापुर

श्रीगुरूदेवदत–औदुंबर,नृ.वाडी

श्रीगोदे भवतापहरी-नासिक,त्र्यंबकेश्वर

जागृत जगन्नाथ–जगन्नाथपूरी

क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी–उज्जैन  इ.क्षेत्रांच्या माहितीपुस्तिका.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 1987 – श्री विठ्ठल एक महासमन्वय

म.सा.प.चा गं.ना.जोगळेकर 2013

पुण्यभूषण-त्रिदल फाउंडेशन.2010

महर्षि वाल्मिकी पुरस्कार–पुणे म.न.पालिका 2013

अ.भा.यादव महासंघाचा विशेष पुरस्कार2015

साहित्य सेवा सन्मान,पुणे2016

अशा या संशोधक साहित्यिकाचे वयाच्या 86 व्या वर्षी 01/07/2016 ला निधन झाले.

त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments