श्रीमती उज्ज्वला केळकर

? १० नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

कुसुमावती देशपांडे– (१० नोहेंबर १९०४ ते १७ नोहेंबर १९६१ ) 

कुसुमावती देशपांडे कमल देसाई आणि सानिया  या तिघीही  नामांकित लेखिका. तिघींचाही जन्म १० नोहेंबरचा. या तिघीही प्रयोगशील लेखिका असून मराठीला त्यांनी नवे रूप व नवचैतन्य दिले. तीघींचाही मराठी आणि इंग्रजी वाङ्मयाचा दांडगा व्यासंग होता

कुसुमावतींनी इंग्लंडमध्ये जाऊन इंग्रजी विषयात बी.ए. ची पदवी मिळवल्यानंतर, नवी दिल्ली इथे आकाशवाणीवर स्त्रिया आणि मुलांच्या कार्यक्रमाच्या प्रमुख निर्मात्या होत्या. त्यांचा कवी आनिल यांच्याशी १९२९ साली प्रेमविवाह झाला. तो त्या काळात खूप गाजला. कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांचा परस्परांशी पत्रव्यवहार होता. त्यातील निवडक पत्रांचे सांपदन म्हणजे ‘कुसमानिल’ हे पुस्तक. दीपकळी, दीपदान, दीपमाळ, मोळी हे त्यांचे काही कथासंग्रह. नवकथापूर्व काळात त्यांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या, त्या तंत्रापेक्षा त्यांनी मांडलेल्या दृष्टीकोनामुळे. ‘मराठी कादंबरीचे पहिले शतक’ (१९५३) हे पुस्तक त्यांच्या व्यासंगाची आणि समालोचनात्मक लेखनशैलीची ग्वाही देते. मराठी वाङमय समीक्षेच्या क्षेत्रात त्यांनी केलेले लेखन अतिशय महत्वाचे मानले जाते.  ‘पासंग’ या पुस्तकात त्यांचे लेख आहेत.

ग्वाल्हेर येथे १९६१ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्या संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. १८७८पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. त्यानंतर कुसुमावती या पहिल्या महिला संमेलांनाध्यक्षा होत्या.  

अनंत देशमुख यांनी कुसुमावतींच्या वाङ्मायाचा चिकित्सक अभ्यास करून ‘कुसुमावती देशपांडे ‘ हे पुस्तक सिद्ध केले.

☆☆☆☆☆

कमल देसाई – (१० नोहेंबर १९२८ ते १७ जून २०११ )  

कमलताई या प्रयोगशील लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या बहुतेक कथा ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाल्या. सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ लावणारं आणी चिंतन करणारं लेखन त्यांनी केलं. विद्रोही, स्त्रीवादी लेखन , देव, धर्म, विश्व, लैंगिकता, पुरुषी दृष्टीकोनाचे वर्चस्व आशा विषयांवर आपल्या लेखनातून त्यांनी स्वतंत्र विचार मांडले. रंग-१, रंग- २, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, काळासूर्यं आणि हॅट घालणारी बाई, इ. त्यांची पुस्तके. त्यांच्या बव्हंशी कथा दुर्बोध आहेत. त्यांनी सौंदर्यशास्त्रावर व्याख्याने दिली. त्या प्राध्यापिका होत्या. विवरणाची आणि समजावून देण्याची त्यांची पद्धत मात्र अतिशय सुबोध होती. ‘जय हो’ हे त्यांचे आत्मकथन आहे. आधुनिकतेचा स्पर्श त्यांच्या कथांना आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, नाटके, कविता, अनुवाद असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे.

☆☆☆☆☆

  सानिया (१० नोहेंबर १९५२)

सानिया म्हणजे सुनंदा कुलकर्णी. स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि आत्मभानाचा  वेध सानियांनी आपल्या कथातून घेतला. ‘अशी वेळ, अवकाश, आवर्तन, खिडक्या, ओमियागे, परिणाम, प्रतीति, प्रवास, वलय इ. त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांच्या अनेक कथा, कन्नड, गुजराती, उर्दू, बंगाली, इंगलीश, जर्मन इ. भाषांमधून अनुवादीत झाल्या आहेत. आपल्या कथांमधून त्यांनी माणसा-माणसातील, नातेसंबंध, भाव-भावना आनंद, सुख-दु:ख यांचा शोध घेतला आहे. त्यांच्या नायिका चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतंत्र विचार करणार्‍या, जगावेगळं जीवन जगणार्‍या आहेत.

☆☆☆☆☆

ल.रा. पांगारकर (३जुलै १८६२ ते १० नोहेंबर १९४१ )

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे अगदी जुन्या पिढीतले लेखक. ते अध्यात्ममार्गी होते. संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनी लिहिलेले ‘भक्तिमार्ग प्रदीप’ हे प्रचंड खपाचे पुस्तक त्या काळाइतकेच आजही लोकप्रिय आहे. आजही अनेक घरातून हे पुस्तक आढळते. हे पुस्तक म्हणजे भक्तिपर वेच्यांचा संग्रह आहे. ‘मुमुक्षू ‘ या साप्ताहिकाचे ते १३ वर्षे संपदक होते. त्यांनी संत एकनाथ. संत ज्ञानेश्वर यांची चरित्रे लिहिली. ‘मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन’ हा ग्रंथ लिहिला. याशिवाय त्यांनी आनंद लहरी (काव्यसंग्रह ) , चरित्रचन्द्र ( आत्मचरित्र ), नवविद्या भक्ति , पारिजातकाची फुले , मराठी भाषेचे स्वरूप इ. पुस्तके लिहिली. त्यांचे सगळ्यात मोठे कार्य म्हणजे मराठी वङ्मयाचा इतिहास, खंड १ व २  यांचे संपादन होय.

‘‘भक्तिमार्ग प्रदीप’ च्या माध्यमातून घरा-घरात पोचलेल्या ल.रा. पांगारकर यांना आज स्मृतीदिनानिमित्त सादर वंदन. 

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी  २.इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments