सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर (27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999) हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, कथाकार, नाटककार वगैरे होते. ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या.
त्यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते.
सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती, शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वातील मानवी वृत्तीचा शोध घेतला. ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित केले आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायचा प्रयत्न केला.’पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या कवितेतून त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप प्रत्ययास येते. त्यांचे समृद्ध व प्रगल्भ व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
त्यांची पुस्तके :
‘विशाखा’, ‘ वादळवेल’ इत्यादी 22कवितासंग्रह.
‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’ वगैरे 22 नाटके.
7 लघुनिबंध व इतर लेखनाचे संग्रह.
9 कथासंग्रह.
‘कल्पनेच्या तीरावर ‘ वगैरे 3 कादंबऱ्या.
‘वाटेवरच्या सावल्या’ हे आठवणीपर पुस्तक.
काही एकांकिका संग्रह.
याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.
‘सती सुलोचना’ या धार्मिक चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे.
सुरुवातीच्या काळात ते नियतकालिकात व वृत्तपत्रात संपादक होते.
याशिवाय ‘कुसुमाग्रजां’वर इतरांनी लिहिलेली सहा पुस्तके व वि. वा. शिरवाडकरांवर लिहिलेली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही :
1991 साली साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.
1986मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान केली.
अंतराळातील एका ताऱ्यास ‘कुसुमाग्रज’ हे नाव देण्यात आले.
त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवाय त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार दिले जातात.
10 मार्च 1999 रोजी त्यांचे देहावसान झाले असले, तरी मराठी साहित्यात ते अमर आहेत.
त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈