( ३०/०४/ १९०९ – ११/१०/ १९६८)
११ ऑक्टोबर – संपादकीय
आज ११ ऑक्टोबर : संत तुकडोजी महाराज यांचा स्मृतीदिन.
अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन, आणि समाजाच्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार, या स्वतःच्या सुनिश्चित ध्येयांसाठी आयुष्य वेचलेले तुकडोजी महाराज हे राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. हे महत्वाचे आणि मोठे ध्येय सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यासाठी त्यांनी भजन- कीर्तनाचा अतिशय प्रभावी मार्ग अवलंबला होता. ‘ खंजिरी भजन ‘ हे त्यांच्या सामाजिक प्रबोधनाचे मोठेच वैशिष्टय ठरले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केल्या. “ ग्रामगीता “ या काव्यातून त्यांनी ‘आत्मसंयमन ‘ या आचरणात आणण्यास अवघड पण आवश्यक अशा विचारावर सहजसुलभ भाषेत विवेचन केलेले आहे. आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मकतेचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रबोधन करत ते देशभर फिरले.
१९४२ च्या “ भारत छोडो “ आंदोलनादरम्यान काही काळ ते अटकेत होते, आणि “ आते है नाथ हमारे “ हे त्यांचे गीत त्यावेळी त्या लढ्यासाठी स्फूर्तिगीत ठरले होते, हेही विशेषत्वाने सांगायला हवे.
त्यांची ध्येये, त्यातही विशेषतः ग्रामविकासाचे ध्येय साकार व्हावे यासाठी त्यांनी उपाययोजनाही सुचवल्या होत्या, ज्या त्यावेळी आणि नंतरच्या काळातही परिणामकारक ठरल्या. त्यांनी सामुदायिक तसेच सर्वधर्मीय प्रार्थनेचा नेहेमीच आग्रहाने पुरस्कार केला. राष्ट्रपतीभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी “ राष्ट्रसंत “ या उपाधीने त्यांना गौरविले. ग्रामगीता, अनुभव -सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली– अशासारखे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदीतून लिहिलेले “ लहरकी बरखा “ हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांच्या आठवणी, विचार आणि चरित्र यावरही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. “ तुकडोजी महाराज साहित्य संमेलन “ आणि “ तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन “ अशी दोन संमेलने त्यांच्या नावाने भरवली जातात. नागपूर विद्यापीठाला “ तुकडोजी महाराज विद्यापीठ “ असे नाव दिलेले आहे, त्यावरून त्यांच्या महान कार्याची महती सहजपणे समजून येते.
— अशा सर्वार्थाने “ राष्ट्रसंत “ असणाऱ्या श्री. संत तुकडोजी महाराज यांना अतिशय मनःपूर्वक श्रद्धांजली..
आजच्या अंकात वाचू या –“ हर देशमें तू “ ही त्यांची हिंदी रचना. हे एक भजन आहे, जे जपानमध्ये भरलेल्या विश्व हिंदू परिषदेत म्हटले गेले होते, आणि दिल्लीतल्या राजघाटावरही हे नियमित ऐकवले जाते.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈