श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ११ जून – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी
खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे या स्वतःच्याच शब्दांप्रमाणे आयुष्यभर ज्यांनी या जगावर प्रेमच केले, उदंड माया दिली, त्या सानेगुरुजींचा आज स्मृतीदिन आहे. 11 जून 1950 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आपले विचार व त्यानुसार प्रत्यक्ष आचरण यांचा मेळ घालून किर्तीरूपी ते अमरच आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब पिढीजात श्रीमंत गावातील खोताचे काम करणारे असले तरी त्यांचे वडिलांचे पिढीपासून त्यांच्या परिस्थितीला उतरती कळा लागली व प्रतिकुल गरीब परिस्थितीतच त्यांचे बालपण गेले. पण आईने केलेल्या संस्कारांची श्रीमंती त्यांना आयुष्यभर पुरली.
इंग्रजी घेऊन एम्. ए. केल्यावर त्यांनी अंमळनेर येथे प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी धरली. विद्यार्थी वसतिगृहाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. याठिकाणी त्यांनी स्वतःच्या कृतीतून सेवावृत्तीचे व स्वावलंबनाचे धडे दिले.
साने गुरुजी हे म. गांधीवादी विचारांनी प्रभावित झाले होते. 1930मध्ये त्यांनी नोकरी सोडली व स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास सुरूवात केली. आयुष्यभर खादीचा वापर केला. सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. 1942 च्या लढ्यात भूमिगत राहून कार्य केले.समाजातील जातिभेद,अनिष्ट रुढीपरंपरा,बंद व्हाव्यात यासाठीही लढा दिला. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह करून मंदिर सर्वांसाठी खुले केले.
1928 साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक व त्यानंतर ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. पुढे 1948 मध्ये ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले.
राष्ट्र सेवा दलाची स्थापनाही त्यांनीच केली.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला.भारताची संस्कृती, विविध भाषा समजून घेण्यासाठी त्यांनी आंतरभारती चळवळ सुरू केली. त्यांना हिंदी, इंग्रजी व्यतिरीक्त तमीळी व बंगाली भाषा ही अवगत होत्या.
या सामाजिक व राष्ट्रीय कार्याबरोबरच त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे 80 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मानवतावाद, राष्ट्रभक्ती, समाजसुधारणा, संस्कार, ही सर्व मूल्ये त्यांच्या लेखनातूनही दिसून येतात.
त्यांनी काही पुस्तकांचा अनुवादही केला आहे.
तमिळ कवी तिरूवल्लीवर यांच्या ‘कुरल’या महाकाव्याचे भाषांतरत्यांनी केले आहे. Les miserables या फ्रेंच कादंबरीचे ‘दुःखी’ या नावाने कादंबरीत रूपांतर केले आहे. शिवाय डाॅ. हेन्री थाॅमस यांच्या ‘The story of human race’ चे मानवजातीचा इतिहास या नावाने ग्रंथात भाषांतर केले आहे.
त्यांची काही पुस्तक अशी:
अमोल गोष्टी, आस्तिक, कला आणि इतर निबंध, गीता हृदय, गोड गोष्टी (दहा भाग), गोड निबंध (तीन भाग), भारतीय संस्कृती, मिरी, मुलांसाठी फुले, रामाचा शेला, धडपडणारी मुले, श्याम खंड एक व दोन, श्यामची आई, मोलकरीण, श्यामची पत्रे, स्त्री जीवन, स्वप्न आणि सत्य इत्यादी….
त्यांनी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, म.गांधी, गोखले, गौतम बुद्ध, विनोबाजी, देशबंधु दास, पं.नेहरू, छत्रपती शिवराय (आठ भाग), भगवान श्रीकृष्ण (आठ भाग) या व्यक्तींची चरित्रेही लिहीली आहेत.
श्यामची आई व मोलकरीण या पुस्तकावर त्याच नावाने मराठी चित्रपटही निघाले आहेत.
करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे ;
बलसागर भारत होवो;
खरातो एकची धर्म यासारखी त्यांची गीते आजही लोकप्रिय आहेत.
संस्कार, संस्कृती, संवेदना, समाजसुधारणा यासाठी आयुष्यभर प्रत्यक्ष व साहित्याच्या माध्यमातून कार्य करून गुरूजी विचारांचा वारसा मागे ठेवून हे जग सोडून गेले. त्यांच्या स्वप्नातील ‘बलसागर भारत’ उभा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈