सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
भानुदास बळीराम शिरधनकर
भानुदास बळीराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर (मृत्यू :12 एप्रिल 1977) हे मराठी लेखक होते.
त्यांची शैली सुबोध होती. त्यांनी लिखाणात नवेनवे विषय हाताळले. नवे शब्द तयार करून ते रूढ करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःला वेगळे अनुभव घेता येत नाहीत, तर ते स्वतः वेगळे अनुभव घेणाऱ्यांपर्यंत पोहोचत.शिकारी, कोळी, सर्कसमधील लोक, जंगल अधिकारी वगैरेंच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांचे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचवले.
शिरधनकरांची ‘उधानवारा’, ‘सागरसंग्राम’, ‘शिमाळ आलं,शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरुपी लेखांची सागरी जीवनावरील इत्यंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके. ‘कारवारचा काळुराम’ (शिकारकथा), ‘तराईच्या जंगलात’, ‘रानातील सावल्या’, ‘घनु वाजे घुणघुणा’ ही त्यांची शिकारी लोकांचे अनुभव शब्दबद्ध करणारी पुस्तके.
‘सर्कसचे विश्व’, ‘वाघ-सिंह माझे सखेसोबती'(दामू धोत्रे यांचे सर्कस अनुभव), ‘चिडियाँघर’, ‘जिवाचं मैतर तुम्ही माझ्या’, ‘फोर्डस्डेलवरील फुफाटा’ ही प्राणी -पक्षांच्या बाबतीतील कुतूहल शमवणारी पुस्तके, ‘ऑलिम्पिकची नवलकथा’, ‘इस्पितळाच्या वाटेवरून’, ‘पुस्तकांची दुनिया’,’गुन्हेगारांच्या मागावर’, ‘कस्टमला झुकांडी’ आणि विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं ‘एस एस सी नंतरच्या वाटा’……
शिरधनकरांच्या पुस्तकांची नुसती नावं जरी बघितली, तरी त्यातलं विषयांचं वैविध्य बघून चकित व्हायला होतं.
त्यांनी अनुवादही केले होते. अमेरिकन लेखक हर्मन मेलविल यांच्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या दर्यावर्दी जीवनावरील कादंबऱ्यांचा त्यांनी केलेला अनुवाद म्हणजे ‘पाचूचे बेट’ व ‘शिस्तीचा बळी’.
दुर्दैवाने शिरधनकरांच्या एकूण पुस्तकांपैकी थोड्याच पुस्तकांच्या प्रती आता उपलब्ध आहेत.
भानू शिरधनकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, लोकसत्ता.कॉम – पंकज भोसले.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈