( १२/१०/१९२२ – ६/६/२००२ )
१२ ऑक्टोबर – संपादकीय
आज १२ ऑक्टोबर :- कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन .
श्रीमती शांता शेळके या एक अतिशय प्रतिभासंपन्न कवयित्री तर होत्याच, पण त्यांची एकूणच साहित्यिक कारकीर्द चौफेर- चतुरस्त्र अशीच होती, ज्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. त्या प्राध्यापिका होत्या, गीतकार, उत्कृष्ट लेखिका, कादंबरीकार, अनुवादिका, बालसाहित्यकार,आणि पत्रकारही होत्या. सुरुवातीच्या काळात ‘ वसंत अवसरे ‘ या टोपण नावानेही त्यांनी काव्यरचना केलेल्या आहेत. आचार्य अत्रे यांच्या “ नवयुग “ मध्ये त्यांनी ५ वर्षं उपसंपादक म्हणून काम केले होते. चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या , तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. १९९६ साली आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले होते. तसेच काही पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जातात. “ आठवणीतील शांताबाई “, “ शांताबाईंची स्मृतीचिन्हे “, अशासारखी पुस्तकेही त्यांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिली गेली आहेत. त्यांची अनेक काव्ये खरोखरच अजरामर झालेली आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ‘ निवडक ‘ हा शब्द त्याबाबतीत वापरताच येणार नाही.
स्वतःला उपजतच लाभलेल्या अतिशय संपन्न अशा प्रतिभेच्या प्रत्येक पैलूला सहज सुंदर अशा साहित्य-कोंदणात सजवून, मराठी साहित्य- शारदेचे तेजच त्यांनी जणू आणखी उजळून टाकले.
मराठीसाहित्याच्या आकाशातल्या या तेजस्वी ताऱ्याला जणू ध्रुवपद प्राप्त झाले आहे, यात साहित्य-रसिकांचे दुमत असणार नाही.
श्रीमती शांताबाईंना त्यांच्या आजच्या जन्मदिनी अतिशय मनःपूर्वक आदरांजली …… ?
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ : कर्हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी , गुगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈