सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १५ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
संभाजी सोमा कदम
संभाजी सोमा कदम (5 नोव्हेंबर 1932 – 15 मे 1998) हे प्रतिभावंत व्यक्तिचित्रकार, आदर्श शिक्षक, कलासमीक्षक, कवी, सौंदर्यमीमांसक, संगीताचे अभ्यासक होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी. डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेत प्रथम कलाशिक्षक, मग प्राध्यापक व नंतर अधिष्ठाता या पदावर त्यांनी काम केले.नंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन रहेजा कला शाळेत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले.
व्यक्तिचित्रणामध्ये त्यांनी स्वतःची खास शैली निर्माण केली.व्यक्तिचित्र म्हणजे त्या व्यक्तीच्या अंतरंगाला अधोरेखित करणारे चित्रण होय, ही व्याख्या त्यांनी रुजवली.
त्यांनी अनेक प्रदर्शने भरवली.
जे जे स्कूल ऑफ आर्टच्या ‘रूपभेद’ या अंकासाठी ते लेखन करत. काही काळ त्यांनी मराठी विश्वकोशासाठी लेखन व कलासंपादनाचे काम केले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता प्रल्हाद अनंत धोंड यांनी सांगितलेल्या आठवणींचे ‘रापण’ या नावाने कदमांनी केलेले लेखन उल्लेखनीय आहे.
‘मौज’ या नियतकालिकातून ते ‘विरूपाक्ष’ या टोपणनावाने कलासमीक्षा लिहीत.नंतर ते ‘सत्यकथा’मधूनही समीक्षालेखन करू लागले.
‘पळसबन’ हा त्यांचा कवितासंग्रह. त्यातील त्यांच्या कविता खूप आत्मकेंद्रित आहेत.
संगीतातील सौंदर्यशास्त्र या विषयावरही त्यांनी लेखन केले आहे.
चिं. त्र्यं. खानोलकरलिखित ‘आरसा बोलतो’ हे एकपात्री नाटक त्यांनी दिग्दर्शित केले. यात अमोल पालेकर यांची भूमिका होती.
ते एकल हार्मोनियमवादनाचे प्रयोगही सादर करत असत.
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, गोवा, नाशिक, खैरागड, म्हैसूर, उदयपूर येथील कलासंस्थांमध्ये त्यांची व्यक्तिचित्रे संग्रहित आहेत.
विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना ‘डॉली करसेटजी पारितोषिक’ मिळाले होते.
दिल्लीच्या आयफॅक्स या कलासंस्थेने त्यांना ‘व्हेटरन आर्टिस्ट’हा पुरस्कार देऊन गौरवले.
प्रा. कदम यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, मराठी विश्वकोश :सुपर्णा कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈