सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १७ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
रघुवीर सामंत – रघुनाथ जगन्नाथ सामंत यांचा जन्म २४ डिसेंबर १९०९ मधे सांगली येथे झाला. ते रघुवीर सामंत किंवा कुमार रघुवीर या नावाने लेखन करत. त्यामुळे ते रघुवीर सामंत या नावानेच ओळखले जाऊ लागले.
१९३३ साली त्यांनी पारिजात प्रकाशन सुरू केले. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या ज्योतीच्या निधनांनंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ४३ साली त्यांनी ‘वाङ्मय ज्योती’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. दोन्ही प्रकाशन संस्थानतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, कादंबर्या०, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर पुस्तके प्रकाशित केली गेली. मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याकडे त्यांचा विशेष कल होता. अध्यापन, चित्रपट निर्मिती, लॉजिंग-बोर्डिंग असे प्रकाशांनाव्यतिरिक्त इतर अनेक व्यवसाय त्यांनी केले. त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले. ‘ज्ञानपारिजात’या विज्ञानकोशाची निर्मिती हे त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य मानले जाते.
‘हृदय’ हा त्यांचा पहिला व्यक्तिचित्र संग्रह. त्यात ४ भाग आहेत. एकूण १२ व्यक्तिचित्रणे आहेत. यात व्यक्तिचित्रणाबरोबरच व्यक्तिप्रधान कथाही आहेत. १९३५ ते ५५ या काळात त्यांच्या लेखनावर त्यांच्या अध्यापन व्यवसायाचा प्रभाव होता. आदर्शवादी, बोधवादी व कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या ‘हृदय’मधील कथा वास्तववादी व सोज्वळ आहेत.
अमर विश्व साहित्य, (कथा), आम्ही खेडवळ माणसं (कादंबरी), उपकारी माणसे (४ खंड), गीत ज्योती (मुलांसाठी अभिनय गीते) , टॉम सायरची साहसे ( अनुवादीत कथा), मॉबी डिकचा राक्षस (अनुवादित कादंबरी) इ. चांगली पुस्तके त्यांच्या प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित झाली आहेत.
———————————————
बाळ ज. पंडित ( २४ जुलै १९२९ ते १७ सप्टेंबर २०१५ )
बाळ ज. पंडित हे क्रिकेट खेळाडू व प्रख्यात क्रिकेट समालोचक होते. वयाच्या ६-७ वर्षापासून त्यांना क्रिकेटची आवड होती. वडील, मामा आणि चुलत भाऊ यांनी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. १९५९-६०च्या रणजी क्रिकेटमधे ते खेळले. मात्र त्यांची कारकीर्द मैदानापेक्षा मैदानाबाहेरच अधीक गाजली.
लहानपणापासून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. भाषाप्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम यामुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयक लेखन सुरू केले. आकाशवाणीवरूनही त्यांनी क्रिकेटचे समालोचन सुरू केले आणि आपल्या ओघवत्या भाषेत क्रिकेट घराघरात पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. दीर्घकाळ समालोचन करण्याबाद्दल (४२ वर्षे) , ‘लिम्का वर्ल्ड रेकॉर्डने’ त्यांची दखल घेतलीय.
क्रीडा समीक्षक म्हणून ५० वर्षे त्यांनी वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयक लेखन केले. त्यांची ३०हून अधीक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. ‘पराक्रमी दौरा’ आणि ‘द लिटिल मास्टर’ या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ‘आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.
मराठीत देवधरांनी मराठी समालोचन सुरू केले. आणि पंडितांनी ते विशेष लोकप्रिय केले. दोघांनीही क्रिकेटशी संबंधित मराठीत वेगवेगळे शब्द बनवले. शतक, षट्कार, चौकार, यष्टी, गोलंदाज, सीमापार, आपटबार इ. शब्द उदाहरण म्हणून सांगता येतील.
बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली काही पुस्तके-
१. अटीतटीचे सामने, २. असे सामाने असे खेळाडू , ३. आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग, ४. लोकमान्यांचा मानसपुत्र श्रीमंत जगन्नाथ महाराज पंडित , सचिन तेंडुलकर,
२. त्यांनी सुनील गावस्कर यांनी लिहीलेल्या आयडॉल्स, सनी डेज, रन्स अँड रुईन्स या पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.
आज रघुवीर सामंत आणि बाळ ज. पंडित या दोघांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त या दोघांना सादर वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈