सौ. गौरी गाडेकर
१९ फेब्रुवारी – संपादकीय
नामदार गोपाळ कृष्ण गोखले (9 मे 1866 – 19फेब्रुवारी 1915)
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध, कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे राजकीय व सामाजिक नेते आणि कुशल राजनीतितज्ज्ञ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला.
1884मध्ये ते बी. ए. (गणित) झाले. ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्यही झाले.
न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी त्यांच्याकडे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला व ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ झाले. केंद्रीय विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषणे केली.
समाजकार्याच्या बाबतीत ते मवाळवादी होते.
शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा सखोल अभ्यास करुन सरकारकडे निवेदन पाठवणे, त्याचा पाठपुरावा करणे वगैरे करून त्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. लोकशिक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता, जातिनिर्मूलन वगैरे संदर्भात त्यांनी कार्य केले. इंग्रजी शासकांना समजतील, अशा पद्धतीने समाजसुधारणा मांडून त्यांनी त्या मान्य करुन घेतल्या.1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळात झाली व ते नामदार झाले. त्यांच्या क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी त्यांना मार्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.
गोखले यांनी ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही संकल्पना मांडली. राजकारण हे साधनशुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते.
कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, तसेच स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हे गोखले यांचे विचार होते. महात्मा गांधी हे त्यांचे शिष्य होते.
लोकमान्य टिळकांच्या ‘मराठा’ या साप्ताहिकात नियमितपणे लेख लिहून ते लोकांमध्ये देशभक्ती जागृत करीत असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ‘सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोखले यांनी काही काळ सांभाळली. पुढे त्यांनी ‘हितवाद’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. ‘सार्वजनिक सभा’, ‘राष्ट्रभाषा समाचार’या वृत्तपत्रांतून लेखन करुन त्यांनी सतत समाजसुधारणांचा पाठपुरावा केला.1887साली ते सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले.
‘अंकगणित’ हे त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते.
आज नामदार गोखले यांचा स्मृतिदिन आहे. या थोर, बुद्धिमान समाजसेवकाला विनम्र श्रद्धांजली. ????
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈