श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १९ मे -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
विजय धोंडोपंत तेंडुलकर
साहित्याच्या विविध प्रांतात आपल्या लेखणीने विजय संपादन करणारे विजय तेंडुलकर यांचा आज स्मृतीदिन!तेंडुलकर म्हटले की आठवते ते घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर ही गाजलेली नाटके. पण त्यांची साहित्यिक कारकिर्द इतकी विस्तृत आहे की आजच्या दिवशी थोडीफार माहिती करून घेणे उचित ठरेल.
विजय तेंडुलकर यांचा जन्म मुंबईतला, पण त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे व कोल्हापूर येथे झाले. शिक्षणात व्यत्यय आला तरी घरातील वातावरण साहित्याला अनुकूल असे होते. कारण त्याचे वडील पुस्तक विक्रेते, प्रकाशक, हौशी नाट्य कलाकार व दिग्दर्शक होते. त्यामुळे मुद्रिते तपासणे, पुस्तके हाताळणे हे आपोआपच होऊ लागले. वाचनाची आवड व सवय लागली. वि. वा. बोकिल, दि. बा.
मोकाशी आणि शिवराम वाशीकर यांच्या लेखनाचा आणि संवाद लेखनाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुणे आणि मुंबई येथे वास्तव्य झाले असले तरी ते दीर्घ काळ मुंबईतच होते. तेव्हा त्यांचा रंगायन, आविष्कार, अनिकेत,
इत्यादी नाट्यक्षेत्राशी संबंधित संस्थांशी संबंध आला. त्यांचे सुरूवातीचे लेखन हे वृत्तपत्रिय व नियतकालिकांच्या संपादनाचे होते. पण नंतर मात्र ते प्रामुख्याने नाटककार म्हणूनच नावारुपास आले.
श्री. गो. म. कुलकर्णी यांनी त्यांच्या विषयी लिहीताना म्हटले आहे की तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार होते. त्यानी कल्पनारम्यतेचा आश्रय केला तोही वास्तवाच्या बळकटीसाठीच. सर्वसामान्यांची सुखदुःखे विशेषतः दुःखेच त्यांच्या चिंतनाचे विषय होते. त्यांच्या लेखनात काव्य आणि कारूण्यही दिसून येते. तंत्रदृष्ट्या नवे प्रयोग हे त्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. “
तेंडुलकर यांची साहित्य संपदा:
कथा
काचपात्रे, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे इ.
कादंबरी
कादंबरी एक, कादंबरी दोन, मसाज
बालनाट्ये
पाटलाच्या पोरीचं लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक इ.
एकांकिका संग्रह
रात्र आणि इतर एकांकिका, भेकड आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व.
अनुवादपर नाट्यलेखन
वासनाचक्र, आधेअधुरे, तुघलक
पटकथा
सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे
या तिनही पटकथाना पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय. .
अर्धसत्य, आक्रीत, आक्रोश,
उंबरठा, सिंहासन, कमला, गहराई, प्रार्थना, मंथन, शांतता कोर्ट चालू आहे, 22जून 1897
नाटक
श्रीमंत(1955पहिले नाटक)
माणूस नावाचे बेट, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, मी जिंकलो मी हरलो, कावळ्यांची शाळा, सरी गं सरी , अशी पाखरे येती, गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल आणि शांतता कोर्ट चालू आहे.
शांतता. . . . . . या नाटकानेच त्यांना राष्ट्रीय किर्ती मिळवून दिली. त्याला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक प्राप्त झाले होते.
अशा या चतुरस्त्र लेखकाला मानाचा मुजरा.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : मराठी विश्वकोश, विकासपिडीया, विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈