सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक, नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता , अशी अनेकांगी ओळख असणारे श्री. मधुकर तोरडमल यांचा आज स्मृतिदिन. (२४/७/१९३२ – २/७/२०१७)

श्री. तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासूनच झाली होती. मुंबईतल्या पोद्दार शाळेत पहिल्या दिवशी स्वत:ची ओळख करून देत असतांनाच, आपल्याला नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिकेला सांगितले. ते लक्षात ठेवून बाईंनी त्यावर्षीच्या गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, आणि त्यांनी चिं.वि.जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले-  दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनीच केला… आणि मग शाळेत असेपर्यंत गॅदरिंग किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याची  जबाबदारी दरवर्षी त्यांच्यावरच सोपवण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आधी मुंबईतच एका कंपनीत कारकूनी केली… आणि तिथून नगरला येऊन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले….  राज्यनाट्य स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा  ‘एक होता म्हातारा’ या नाटकात साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे, सगळे त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि तेव्हापासून ते अवघ्या नाट्यसृष्टीचे मामा झाले. — इथूनच पुढे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवेश झाला. प्राध्यापकी आणि नाटक ही कसरतच होती. शेवटी नाटकाला प्राधान्य देत ते पुन्हा मुंबईला आले. आणि नाट्यक्षेत्रात आपला चांगलाच जम बसवला.

‘मामा’ हेच नाव अनेकांच्या तोंडी झाल्याने त्यांनी पुढच्या आयुष्यातल्या आठवणी “ उत्तरमामायण “ या त्यांच्या पुस्तकात सांगितल्या आहेत.

त्यांचं  नाव ऐकताच लगेचच आठवतं ते “ तरुण तुर्क म्हातारे अर्क “ हे नाटक आणि त्यात मामांनी अजरामर करून ठेवलेली प्रो.बारटक्के यांची भूमिका. या नाटकाचे ५००० हून जास्त प्रयोग झाले. सुरुवातीला काही समीक्षकांनी ‘‘ सुशिक्षित-सुसंस्कृत स्त्रियांनी हे नाटक बघू नये ’’ असे जाहीरपणे सांगितले, पण त्याचा परिणाम उलटाच झाला.. रसिकांची उत्सुकता वाढली. तिकिटासाठी रांगा लागायला लागल्या. या एकाच नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग होणे ही आश्चर्यकारक गोष्टच होती. विशेष म्हणजे – त्या  दिवशी सकाळच्या प्रयोगाला श्री. बाळ ठाकरे, दुपारी श्री. ग.दि.माडगूळकर, आणि रात्री वसंत देसाई या दिग्गजांनी सहकुटुंब हजेरी लावली होती.

याचबरोबर तेव्हाच्या सुप्रसिद्ध असणा-या चार नाट्यसंस्थांतर्फे सादर केल्या गेलेल्या अनेक नाटकातूनही  त्यांनी कामे केली. ‘अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, काळं बेट लाल बत्ती’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘मत्स्यगंधा’, ‘मृगतृष्णा’ ही त्यातली काही गाजलेली नाटके होत. त्यांनी स्वत:ची `रसिकरंजन` नावाची नाट्यसंस्थाही सुरू केली होती.

आत्मविश्वास, सिंहासन आणि अशाच काही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांनाही रसिकमान्यता मिळालेली होती. ‘संघर्ष’ या दूरचित्रवाणीच्या मालिकेतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

र.धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचा आणि अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंब-यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या व्यतिरिक्त, १५ नाटके, “आयुष्य पेलतांना “ ही रूपांतरीत कादंबरी, “ तिसरी घंटा “ हे आत्मचरित्र,  असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा २००९-१० साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा नाट्यपुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले होते . २००३ ला नगरला झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते .

मामा तोरडमल या अक्षरश: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामचंद्र महादेव तथा राम बापट यांचा आज स्मृतिदिन. (१८/११/१९३१ – २/७/२०१२) .

श्री. राम बापट यांची ख्याती प्रामुख्याने एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमधील कितीतरी नेते आणि कार्यकर्ते पन्नासहून जास्त वर्षे त्यांच्या सतत संपर्कात होते. त्यातील बऱ्याच चळवळींचे आणि संघटनांचे ते स्वतः सर्वेसर्वा होते. पण पेशाने मात्र ते एक हाडाचे शिक्षक होते. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात सन १९६५ ते १९९१ इतका प्रदीर्घ काळ ते आधी व्याख्याता म्हणून , मग प्रपाठक म्हणून आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे गाजली होती. त्यांची रसाळ व्याख्याने , आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती असे त्यांच्याबद्दल गौरवपूर्वक म्हटले जायचे. तसेच “ मौखिक परंपरेचे पाईक “ असेही त्यांच्या कार्याबद्दल बोलतांना आवर्जून म्हटले जायचे.

खरं तर एक सच्चा लोकशिक्षक हीच भूमिका मनापासून स्वीकारत त्यांनी “ लोकशिक्षणाचे “ जणू व्रतच अंगिकारले होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल . समाज-सुधारणांच्या बाबतीत  “ एक समाज-शिक्षक “ म्हणून त्यांचे योगदान फार महत्वाचे होते. विशेषतः दलित ,आदिवासी , मागासवर्गीय समाज आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण , याविषयीच्या चळवळींमध्ये त्यांना जास्त रस होता. त्यांनी अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा तर दिलीच. त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचयही लोकांना करून दिला. शिक्षण , मार्गदर्शन , आणि प्रबोधन या माध्यमातून तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचा मोठा आणि मोलाचा सहभाग होता.

याबरोबरच , नाट्यशास्त्र , कला , सौंदर्यशास्त्र , संरक्षणशास्त्र , या विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता , आणि या संदर्भातही त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. त्यांच्या एकूण भाषणांची संख्या हजारातच मोजावी लागेल.

त्यांच्या असामान्य विचारशक्तीचा देशभरात लौकिक होता.

त्यांच्या लिखाणाचा विचार करता त्यांना “ एका वेगळ्या पठडीतले साहित्यिक असंच म्हणायला हवं. त्यांचे प्रकाशित साहित्य असे —-

१) “ परामर्श “ – हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांसाठी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण अशा सहा प्रस्तावनांचा संग्रह आहे, आणि या संग्रहाला “ उत्कृष्ट मराठी गद्य “ म्हणून पुरस्कार दिल गेला आहे.

२) “ राज्यसंस्था  , भांडवलशाही , आणि पर्यावरणवाद “ या पुस्तकात त्यांचे काही लेख आणि व्याख्याने यांचा समावेश केलेल्या आहे.

३) “ भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म “ १९९७ साली नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या  “ विचारवेध “ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

थोर विचारवंत म्हणून ख्यातनाम झालेल्या श्री. राम बापट यांना मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments