श्रीमती उज्ज्वला केळकर
२ फेब्रुवारी – संपादकीय
2 डिसेंबर १९११ साली जन्मलेले अनंत वामन वर्टी व्यवसायाने डॉक्टर पण साहित्याची अतिशय आवड असलेले. विनोदी लेखक म्हणून साहित्य क्षेत्रात मान्यता पावले. नाशिक येथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांना साहित्याप्रमाणेच बॅडमिंटन आणि ब्रीज खेळण्याचीही आवड होती.
१९५३ साली गावकरी प्रकाशनतर्फे ‘अमृत ‘ मासिक काढायचे ठरले, तेव्हा वर्टींनी संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ११९६० मध्ये ‘अमृत ‘ च्याच धरतीवर त्यांनी ‘श्रीयुत’ हे मासिक सुरू केले. चंद्रहास नावाची प्रकाशन संस्थाही त्यांनी सुरू केली. त्यांचे बरेच कथासंग्रह या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले आहेत. नाशिक सार्वजनिक वाचनालयाशी त्यांचा जवळचा संबंध होता. या वाचंनालयातर्फे ते जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करत.
त्यांच्या कथात विविधता आहे. मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण त्यांनी केले आहे. कथेचा चमत्कारपूर्ण शेवट ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. वर्टींनी ५०० पेक्षा जास्त काथा लिहिल्या आहत. त्यांचे २१ पेक्षा जास्त कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी नाटके आणि कादंबर्याही लिहिल्या आहेत.
त्यांनी लिहिलेले ‘राणीचा बाग’ हे नाटक खूप गाजले. सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाला मिळाला. १९५७ साली राज्य नाट्यस्पर्धेच्या वेळी मराठी , गुजराती आणि कन्नड आशा तीन भाषातून एकाच वेळी हे नाटक सादर करण्यात आले.
वर्टींचे काही कथासंग्रह – १. अकरावा गडी २.अखेरचा आघात ३.गुलबदन, ४. दांतकथा, ५. पोलिसी खाक्या, ६.मंत्र्यांचा मंत्री, ७. सायराबानू आणि इतर विनोदी कथा इ.
वर्टींच्या काही कादंबर्या – अभिनय, नवा धर्म, काठपुतळ्या, हेरंब, वाघीण, तिसरी इच्छा, सुलूचा रामा-इडली डोसा
पुरस्कार – वर्टींच्या ‘टॉमी’ या कथेस १९३७मधे किर्लोस्कर मासिकाच्या लघुकथा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले होते. ‘समीक्षक’ या मासिकाच्या कथास्पर्धेत ‘मुमताज या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले होते.
नाशिकमध्ये त्यांच्या सन्मानार्थ एका रस्त्याला डॉ. अ. वा. वर्टी हे नाव दिले आहे.
नाशिक सार्वजनिक वाचंनालयातर्फे दर वर्षी एका कथालेखकास अ. वा. वर्टी पुरस्कार दिला जातो.
२०१० साली डॉ. अ. वा. वर्टी व्यक्ति आणि वाङ्मय तसेच नाटककार वर्टी- एक शोध हे २ शोध निबंध प्रकाशित झाले.
☆☆☆☆☆
वा.गो.आपटे म्हंटलं की डोळ्यासमोर येतं आनंद मासिक. एके काळी या मासिकाने मुलांना खूप भुरळ घातली होती. वा.गो.आपटे त्याचे संस्थापक आणि संपादक. १९०६ साली त्यांनी ते सुरू केले. हे मासिक त्यांच्या हयातीनंतरही अनेक वर्षे चालू होते. ते मराठीतील लेखक, भाषांतरकार, पत्रकार होते, निबंधकार, कोशकारही होते. बंगाली कादंबर्यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
वा.गो.आपटे यांचा जन्म खांदेशातील धरणगाव येथे झाला .’अशोक अथवा आर्यावर्तातील पहिला चक्रवर्ती राजा हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यांनी १९०५ साली लिहिले. बौद्धपर्व अथवा . बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये मराठी पुस्तकांचे परीक्षण ते करीत.
वा.गो.आपटे यांचे बरेचसे लेखन अनुवादीत वा रूपांतरित आहे. मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखन कला आणि लेखन व्यवसाय, मराठी शब्द रत्नाकर, मराठी शब्दार्थ चंद्रिका, मराठी-बंगाली शिक्षक, सौंदर्य आणि ललित कला,इ. त्यांची विविध विषयांवर २४-२५ पुस्तके आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी ३० -३२ पुस्तके लिहिली॰ त्यांचे बालवाङ्मय रंजक व उद्बोधक आहे. बांकीमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वङ्मय त्यांनी मराठीत ४ खंडात आणले.
मराठी शब्द रत्नाकर आणि मराठी शब्दकोश यांचे लेखन हे त्यांचे महत्वाचे वाङ्मईन कार्य.
इतर – वा.गो. आपटे : व्यक्ति आणि वाङ्मय या नावाचा त्यांच्यावरचा ग्रंथ राणे जाधवांनी लिहिला आहे.
मराठी साहित्य परिषद येथील ग्रंथालयाला वा.गो. आपटे हे नाव दिले आहे.
आज वा.गो. आपटे यांचा स्मृतिदिन (२ फेब्रुवारी १९३७). त्याचप्रमाणे डॉ. अ. वर्टींचाही आज स्मृतिदिन. मराठीतल्या या दोन्ही दिग्गजांना विनम्र श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈