सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

वि. स. खांडेकर (11 जानेवारी 1898 – 2 सप्टेंबर 1976)

हे मराठी कादंबरीकार व लेखक होते.

खांडेकरांचा जन्म सांगलीत झाला.

ते काही वर्षे शिक्षकी पेशात होते.

त्यांनी ‘अमृतवेल’, ‘उल्का’, ‘ययाति’ वगैरे एकूण 16 कादंबऱ्या,6नाटके, सुमारे 250 ललित लेख,100 निबंध, ‘देवता’, ‘धर्मपत्नी’, ‘लग्न पाहावे करून’ वगैरे पटकथा आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा, समाजहिताचा प्रचार, समाजजीवनावर भाष्य, माणुसकीचा गहिवर, माणसावरील अपार श्रद्धा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती.

वि. स. खांडेकर 1941 साली सोलापूरला भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

त्यांच्या ‘ययाति’ कादंबरीसाठी त्यांना 1960मध्ये साहित्य अकॅडमी पुरस्कार व 1974मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

1968मध्ये खांडेकरांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. बहाल केली.

सुनिलकुमार लवटे यांनी खांडेकरांचे चरित्र लिहिले. डॉ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने त्यांना अर्थसाहाय्य केले.

शिरीष व्यंकटेश पै (15 नोव्हेंबर 1929 – 2 सप्टेंबर 2017)

या कवयित्री, लेखिका, पत्रकार व नाटककार होत्या.

त्या आचार्य अत्रेंच्या कन्या. त्यांचे पती व्यंकटेश पै हे वकील होते.

त्या बी.ए., एल एल. बी. झाल्या होत्या.

त्या सुमारे 25 वर्षे वृत्तपत्र व्यवसायात होत्या.सुरुवातीला ‘मराठा’मध्ये पत्रकार, मग ‘नवयुग साप्ताहिका’च्या व पुढे ‘दैनिक मराठा’च्या वाङ्मयीन पुरवणीच्या आणि नंतर ‘दैनिक मराठा’च्या संपादक होत्या. वृत्तपत्रातून त्यांचे अग्रलेख, पुस्तक परीक्षणे, मुलाखती व वाङ्मयीन लेख प्रसिद्ध होत. त्यांनी स्फुटलेखन व राजकीय लेखनही केले.

त्यांची भाषा प्रगल्भ होती.

त्या चांगल्या वक्त्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी प्रखर भूमिका निभावली.

सन 1975मध्ये त्यांनी ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणून लोकप्रिय केला.

शिरीष पैंनी ‘कांचनगंगा’, ‘खडकचाफा’, ‘चैत्रपालवी’ इत्यादी 14 कथासंग्रह लिहिले.

त्यांचे ‘कस्तुरी’, ‘एकतारी’, ‘एका पावसाळ्यात’आणि विविध हायकूसंग्रह इत्यादी 20 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

याशिवाय त्यांचे ‘आतला आवाज’, ‘आजचा दिवस’, ‘मैलोनमैल’, ‘अनुभवांती’ वगैरे ललितलेखसंग्रह, तसेच ‘पपा’, ‘वडिलांचे सेवेसी’, ‘वडिलांना आठवून’ हे व्यक्तिचित्रसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुमारे 10 पुस्तकांचा व गीतेच्या आठव्या अध्यायाचा अनुवाद केला आहे.

‘वडिलांच्या सेवेसी’,’मी माझे मला’, ‘ऋतूचित्र’ या पुस्तकांसाठी त्यांना राज्यसरकारचे पुरस्कार मिळाले.

‘एका पावसाळ्यात’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचे ‘केशवसुत पारितोषिक’ मिळाले.

प्रभात चित्रपट कंपनीचा खास पुरस्कारही त्यांना मिळाला.

‘हायकू’ निर्मितीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा खास पुरस्कार त्यांना मिळाला.

प्रदीर्घ साहित्यसेवेसाठी ज्योत्स्ना देवधर, शरतचंद्र आणि अक्षरधन पुरस्कार त्यांना मिळाले.

वि. स. खांडेकर व शिरीष पै यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना आदरांजली.🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments