सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २० ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
नरेंद्र दाभोळकर (१ नोहेंबर १९४५ – २० ऑगस्ट २०१३ )
नरेंद्र दाभोळकर हे बुद्धिजीवी, विज्ञानवादी, सामाजिक सुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला आयुष्यभर त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. १९८९ मधे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीती ही संस्था त्यांनी स्थापन केली. या समीतीचे ते अध्यक्ष होते. त्यांचे शालेय शिक्षण सातार्यातील न्यू इंगलीश स्कूलमध्ये झाले. मीरज वैद्यकीय कोलेजातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. ते उत्तम कबड्डीपटू होते. कबड्डीवर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. कबड्डीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना शिवछत्रपती हा पुरस्कारही मिळाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर सातारा इथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
डिसेंबर १९९८ मधे ते साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते संपादक झाले. त्यानंतर मृत्यूपर्यंत ते ‘साधना’चे संपादक होते.
समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, टाकाऊ परंपरा नाहीशा व्हाव्या म्हणून त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अनेक भोंदू बाबांचे पितळ त्यांनी आणि त्यांच्या समीतीने उघडे पाडले. बुवा आणि बाया करत असलेले चमत्कार, हे चमत्कार नसून त्यामागील विज्ञान, त्यांनी व त्यांच्या समीतीने सप्रयोग स्पष्ट केले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर , २ माथेफिरू तरुणांनी गोळ्या झाडून त्यांचा खून केला. महाराष्ट्र ‘अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने दाभोळकरांच्या हत्येचा ‘ रिंगणनाट्याच्या माध्यमातून निषेध केला.
दाभोळकरांचे साहित्य
१. अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, २. ऐसे कैसे झाले भोंदू, ३. तिमिरातून तेजाकडे, ४. प्रश्न तुमचे उत्तर दाभोळकरांचे, ५. ब्रम्ह आणि निरास, ६. माती भानामती, ७. विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी, ८. श्रद्धा अंधश्रद्धा इ. त्यांची महत्वाची पुस्तके आहेत.
दाभोळकरांच्या संस्था –
१. अंधश्रद्धा निर्मूलन समीती २. परिवर्तन
दाभोळकरांना मिळालेले पुरस्कार –
१. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे १ला समाज गौरव पुरस्कार ‘‘अंनिस’ (अंधश्रद्धा निर्मूलन समीती) ला दिला गेला. २. समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्लब ३. दादासाहेब साखळकर पुरस्कार, ४.पुणे विद्यापीठाचा साधना जीवन गौरव पुरस्कार ५. भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर )
दाभोळकरांच्या नावाचे पुरस्कार –
न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे २०१३पासून सामाजिक कार्य करणार्या व्यक्तीला, डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार दिला जातो.
‘दाभोळकरांचे भूत’ या नावाने श्याम पेठकर यांनी नाटक लिहिले. हरीष इथापे यांनी ते दिग्दर्शित केले. समीर पंडीत यांनी नाटकाची निर्मीती केली आणि वैदर्भीय कलावंतांनी ते रंगभूमीवर आणले.
आज नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांच्या लेखनाला शतश: वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
जयंत साळगावकर – (१फेब्रुवारी १९२३ – २० ऑगस्ट २०१३)
जयंत साळगावकर यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. त्यांनी पंचांगआणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. कालनिर्णय ही दिनदर्शिका ९ भाषातून प्रकाशित होते. केवळ मराठी भाषेत कालनिर्णयाचा खप ४८ लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३पासून प्रसिद्ध होत आहे. कालनिर्णयचे ते संस्थापक, संपादक होते. दिनदर्शिकेचा वरच्या पानावर तारीख, तिथी, वार, त्या दिवसाचा सण-वार, विशेष माहिती प्रसिद्ध होते आणि मागील पानावर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी माहिती दिलेली असते.
साळगावकरांनी ज्योतिषशस्त्र आणि धर्मशास्त्र यावर विपूल लेखन करून लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले. सामाजिक आणि संस्कृतिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत.
जयंत साळगावकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम-
महाराष्ट्र सार्वजनिक गणशोत्सव मंडळाचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपड भूषविले आहे. सिद्धिविनायक मंदिराचे ते माजी ट्रस्टी होते. आयुर्विद्यावर्धिनी या आयुर्वेदिक संशोधन करणार्या ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. मुंबई मराठी साहित्य संघ या सस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी या क्षेत्रात महत्वाचे काम करणार्या ट्रस्टचे ते संस्थापक अध्यक्ष होते. श्रीगणेशविद्यानिधी (पुणे) या शिक्षण क्षेत्रात कांम करणार्या ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. इतिहास संशोधन मंडळाचेही ते अध्यक्ष होते.
मुंबई येथे झालेल्या ७४व्या नाटयसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर १९८३ साली झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष समेलनाचे ते अध्यक्ष होते.
जयंत साळगावकर यांची ग्रंथसंपदा
१. सुंदरमठ ( समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरील कादंबरी)
२. देवा तूची गणेशु (गणेश दैवताचा इतिहास, स्वरूप आणि समजजीवनवर त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा)
३. विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर २००० हून अधीक लेख प्रसिद्ध
४. देवाचिये द्वारी – धार्मिक, परमार्थिक अशा स्वरूपाचे लेखन. ३०९ लेखांचा संग्रह प्रसिद्ध
५. दुर्वांची जुडी – देवाचिये द्वारीमधील श्रीगणेशवरील लेखांचे संकलन
जयंत साळगावकर यांना मिळालेले पुरस्कार –
संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी ‘ज्योतीर्भास्कर’ ही पदवी दिली.
ज्योतिषालंकार – मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे सनमानदर्शक पदवी
ज्योतीर्मार्तंड – पुण्यातील ज्योतिष संमेलनात दिलेली पदवी
महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने ‘विद्यावाचस्पती (डी.लिट.) ही बहुमानाची पदवी दिली.
अशा विद्वान ‘विद्यावाचस्पतीला त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शतश: प्रणाम
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈