सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वा. म. जोशी.
वामन मल्हार जोशी (21 जानेवारी 1882 – 20 जुलै 1943) हे लेखक, पत्रकार होते.
एम. ए.झाल्यावर ते ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.
नंतर जोशींनी ‘विश्ववृत्त’ नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्यातील ब्रिटिश कार्यकर्त्यांच्या विरुद्ध असलेल्या मजकुरामुळे त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.
तुरुंगातून सुटल्यावर जोशी दोन वर्षे दैनिक केसरीचे संपादक होते.
पुढे ते महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व इंग्रजी-मराठी साहित्याचे प्राध्यापक झाले.
कालांतराने जोशी पुण्याच्या एस.एन.डी.टी.महाविद्याल याचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
वा. म. जोशींनी, ‘आश्रमहरिणी’, ‘इंदू काळे व सरला भोळे’, ‘नीति-शास्त्र-प्रवेश’, ‘विचार सौंदर्य’, ‘सुशिलेचा देव’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.
वा. म. जोशी यांच्यावर ‘वा. म. जोशी -चरित्र आणि वाङ्मय’, ‘वा. म. जोशी साहित्यदर्शन’, ‘वामन मल्हार आणि विचार सौंदर्य’ इत्यादी पाच पुस्तके लिहिली गेली आहेत.
1930च्या मडगाव, गोवा इथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा. म. जोशींनी भूषवले होते.
☆☆☆☆☆
डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर
डॉ.रघुनाथ विनायक हेरवाडकर (25सप्टेंबर 1915 – 20 जुलै 1994) हे इतिहासविषयक लेखन व बखरींचे संशोधन करीत.
त्यांचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. असे झाले होते.
ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.
ते बखर वाङ्मयाने मोहित झाले. व त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
त्यांना 140 बखरी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 78 बखरी ऐतिहासिक होत्या. त्या मोडी लिपीत होत्या. शिवाय त्यांत असणाऱ्या अरबी, फारसी, उर्दू शब्दांच्या अनेक अर्थांतून बखरकाराला अभिप्रेत असलेला नेमका अर्थ शोधून काढणे, हे खूप गुंतागुंतीचे असे.पण हे सर्व त्यांनी केले. एखाद्या मुद्यावर सर्वंकष आधार शोधून, समतोल मनाने त्याचा विचार करून ते संपादन करत. त्यांचे लेखन व संपादन शैली अतिशय पद्धतशीर होती.
त्यांनी ‘पानिपतची बखर’, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’, ‘श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे ‘ इत्यादी बखरींचे संपादन करून त्यांनी त्या पुनःप्रकाशित केल्या. याच विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.
याव्यतिरिक्त त्यांनी ‘भाऊसाहेबांची बखर’, ‘मराठी बखर’, ‘ श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत’, ‘थोरले शाहू महाराज’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली /संपादित केली.
वा. म. जोशी व डॉ. रघुनाथ हेरवाडकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈