सौ. गौरी गाडेकर

? २१ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

रा. श्री. जोग.

रामचंद्र श्रीपाद जोग (15 मे 1903 – 21फेब्रुवारी 1977)

रा. श्री. जोग यांचा जन्म गडहिंग्लज, कोल्हापूर इथे झाला.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून संस्कृत व मराठी घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे बीए (1923) व एमए (1925) झाले. एमएला त्यांना संस्कृतची भगवानदास पुरुषोत्तम शिष्यवृत्ती मिळाली. 1926 ते 1963 या काळात ते संस्कृत व  मराठीचे प्राध्यापक होते.

‘निशिगंध’ या टोपणनावाने कवी म्हणून त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले.सरल भावाविष्कार हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य.’ज्योत्स्नागीत’ (1926) व ‘निशागीत'(1928) हे त्यांचे काव्यसंग्रह.

पुढे साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच त्यांनी आपले कार्यक्षेत्र मानले.

‘अभिनव काव्यप्रकाश'(1930), ‘सौंदर्यशोध आणि आनंदबोध'(1943), ‘संस्कृत काव्यवाङ्‌मय ‘(1945), ‘अर्वाचीन मराठी काव्य’ (1946),’केशवसुत काव्यदर्शन’ (1947), ‘काव्यविभ्रम'(1951), ‘मराठी वाङ्‌मयरुचीचे विहंगमावलोकन'(1951) हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ.त्याचप्रमाणे ‘चर्वणा'(1960), ‘विचक्षणा’ (1962) व ‘दक्षिणा’ (1967) हे त्यांचे साहित्यविषयक स्फूटलेखांचे संग्रह. तपशिलाविषयी दक्ष असणारे साक्षेपी व समतोल समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता.

मराठी साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्‌मयेतिहास योजनेतील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या खंडांचे संपादनही त्यांनी केले.

1960 मध्ये ठाणे येथे भरलेल्या 42व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

21 फेब्रुवारी 1977 रोजी रा. श्री. जोग यांनी या जगाचा निरोप घेतला.

 

डॉ. किशोर शांताबाई काळे

डॉ. किशोर शांताबाई काळे(1970-21फेब्रुवारी 2007)

डॉ. किशोर काळे हे मराठी लेखक व समाजसेवक होते.

त्यांची आई कोल्हाटी तमाशा कलावंत होती.या अनौरस मुलाला तिने आपल्या माहेरी सोडले. आजोळी, शाळा-कॉलेजात त्यांच्या वाटेला फक्त निंदा, हेटाळणीच आली.

कोल्हाटी समाजातील पुरुष स्वतः काहीही कमवत नाहीत व व्यसनग्रस्त असतात.

पण आपले आयुष्य घडवण्याचा निर्धार आणि धैर्य यामुळे किशोर काळे यांनी जिद्दीने अभ्यास  करून ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमधून एम  बी बी एस  ही पदवी मिळवली.ते त्यांच्या समाजातील पहिले डॉक्टर झाले.

‘कोल्हाट्याचं पोर’ हे त्यांचे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर 1994मध्ये प्रकाशित केले. या आत्मचरित्रामुळे साहित्यजगतात चांगलीच खळबळ माजली. त्यातून तमाशाच्या कोल्हाटी समाजाचे वास्तव जगासमोर आले. त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले. पुढे त्यांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठीही प्रयत्न झाले.

Against all odds हा त्या पुस्तकाचा संध्या पांडे यांनी केलेला अनुवाद पेंग्विन पब्लिकेशनने प्रकाशित केला.

त्यांचे दुसरे पुस्तक ‘मी डॉक्टर झालो’ हे ‘आपलं प्रकाशन’ने प्रकाशित केलं.

त्यांनी लिहिलेली ‘हिजडा, एक मर्द ‘ ही कादंबरीही गाजली. तिच्यावरून लिहिण्यात आलेल्या ‘अंधारयात्रा’ या नाटकात डॉ. काळे यांनी नायकाची भूमिका केली.

आपल्या समाजाची उन्नती करण्यासाठी व वंचितांचा विकास करण्यासाठी त्यांनी तळमळीने काम केले.

पण आपलं नियोजित कार्य पूर्णत्वाला नेण्यापूर्वीच 21 फेब्रुवारी 2007मध्ये एका अपघातामुळे त्यांचे अकाली निधन झाले.

आज 21 फेब्रुवारी. कै.रा. श्री. जोग  व कै.डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा स्मृतिदिन. त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे विनम्र अभिवादन.

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments