श्रीमती उज्ज्वला केळकर
२२ नोव्हेंबर – संपादकीय
त्र्यं. वि.सरदेशमुख ( २२ नोहेंबर १९१९ ते १२ डिसेंबर २००५ )
ग्रंथालयातून एकदा ‘बखर एका राजाची’ हे पुस्तक खूप आवडलं म्हणून पुन्हा एकदा लेखकाचा नाव पाहिलं. त्र्यं. वि.सरदेशमुख. मग त्यांची पुस्तकं आणायला लागले. त्यांच्या कादंबर्या लोकप्रिय आहेत, तसेच जाणत्यांच्या पसंतीलाही उतरल्या आहेत. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून दिसून येतो. त्यांच्या ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीला साहित्य अॅकॅडमीचा२००३ साली पुरस्कार मिळाला. ‘ससेमिरा’ ही त्यांची पहिली कादंबरी. उच्छाद ही त्यांची आणखी एक कादंबरी.
त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ज्योत्स्ना, वाङ्मायशोभा, धनुर्धारी या मासिकांमध्ये लेख लिहून केली. त्यांनी कादंबरीप्रमाणेच, कविता आणि समीक्षादेखील लिहिल्या. काव्यलेखन त्यांनी वैशाख या टोपणनावाने केले. १९५५साली त्यांचा ‘उत्तररात्र’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.
साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भातील आपले चिंतन त्यांनी आपल्या समीक्षा ग्रंथतून मांडले. मानवी जीवनातील शोकात्मकता आणि त्याचे साहित्यातील व्यक्तिकरण या संदर्भात ‘ बालकवी, केशवसुत , गोविंदाग्रज, मर्ढेकर’ यांच्या काव्याचा ‘अंधारयात्रा’ या पुस्तकात वेध घेतला. गडकरी, ग्रेस, सुर्वे, शरद्चंद्र मुक्तिबोध यांच्या कवितांबद्दल मूलगामी चर्चा त्यांनी केली आहे. काफ्काशी संवाद ( ललित ), कालिदास आणि शाकुंतल- एक अर्ध्यदान (समीक्षा ग्रंथ), गडकर्यांची संसार नाटके यात रा.ग. गडकरी यांच्या नाटकांचे आस्वादन आणि समीक्षा आहे. असे त्यांचे काही समीक्षा ग्रंथ. कवितांच्या कार्यक्रमाची संहिता त्यांनी तुरे चंद्र्फुलांचे या पुस्तकात लिहिली आहे.
त्र्यं. वि.सरदेशमुख यांचे बरेचसे साहित्य अप्रसिद्ध व हस्तलिखित स्वरुपात होते. यात ३ कादंबर्या, ३ व्यक्तिचित्रणे, काही मुलाखती, पुस्तक प्रीक्षणे, प्रस्तावना, प्रदीर्घ निबंध इ. साहित्य होते. नीतिन वैद्य, अनुराधा कशाळीकर ,डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या प्रयत्नाने त्यांचे सुमारे १००० पृष्ठांचे साहित्य प्रकाशात आले.
या महान लेखकाला त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
रविंद्र भट (१७ सप्टेंबर १९३९ – २२नोहेंबर २००८ )
१९६३ साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तो चित्रपट म्हणजे ‘ते माझे घर’ या चित्रपटाचे निर्माते, कथा आणि पटकथाकार म्हणजे सब कुछ होते, रविंद्र भट. कॉलेजमध्ये असताना नाटके बसवणे, त्याचे दिग्दर्शन , कविसंमेलने आयोजित करणे इ. मध्ये ते गुंतलेले असायचे. पुढे ते प्रसिद्ध कवी, कथा-कादंबरीकार, पटकथाकार झाले. काही वर्षे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह होते.
अनादि मी अनंत मी , आभाळाचे गाणे, इंद्रायणी काठी, एका जनार्दनी, घरट्यात एकटी मी, घास घेई पांडुरंगा, देवाची पाऊले, भागीरथ, भेदिले सूर्यमंडळा. इ. कादंबर्या त्यांनी लिहिल्या. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास इ. ची चरित्रे त्यांनी रसाळपणे आपल्या कादंबर्यातून मांडली. या संतांवर तसेच विवेकानंद, सावरकर यांच्यावर त्यांनी बाल कादंबर्याही लिहिल्या.
‘ओठांवरची गाणी, जाणता – अजाणता, मन गाभारा, मोगरा फुलला, हे त्यांचे कविता संग्रह, तर ‘सारी पाऊले मातीची, कृष्णाकाठचा भुत्या या पुस्तकातून त्यांनी ललीत लेखन केले आहे. त्यांनी काही नाटकेही लिहिली. अरे संसार संसार, अवघी दुंदुमली पंढरी अससासा नवरा नको ग बाई, एक कळी फुलली नाही. इ.. नाटके त्यांनी लिहिली आहेत.
साहित्य क्षेत्रात असं चौफेर लेखन करणार्या रवींद्र भट यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. माहिती स्त्रोत – इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈