सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? २३ ऑक्टोबर  –  संपादकीय  ?

आज २३ ऑक्टोबर :

मराठीतील प्रसिद्ध कवयित्री आणि कथालेखिका नीरजा यांचा जन्मदिन. प्रसिद्ध समीक्षक श्री. म. सु. पाटील यांची ही कन्या. पण त्यांनी कवितेची सर्जनशील वाट निवडली, ज्यावरचा त्यांचा प्रवास अतिशय दमदारपणे सुरु आहे. ‘ ग्रंथाली ‘ आणि ‘ सानेगुरुजी ट्रस्ट’ च्या अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या पदाधिकारी आहेत. महाविद्यालयात असतांनाच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती. मुंबईत झालेल्या ६० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा यांनी नवोदित कवयित्री म्हणून त्यांची ‘ सावित्री ‘ ही कविता वाचून खूप दाद मिळवली, आणि पुढच्याच वर्षी कविसंमेलनात त्यांना ‘ निमंत्रित ‘ म्हणून बोलावले गेले. पुढे २०१३ साली पुण्यात भरलेल्या ‘ सम्यक साहित्य संमेलनाचे ‘ अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. ‘ सकाळ सप्तरंग’ पुरवणीतले त्यांचे ‘ मी कात टाकली ‘ हे सादर खूप लोकप्रिय ठरले. कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेख संग्रह असे त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झालेले आहे. ‘ वेणा ‘ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. नंतर त्यांचे-स्त्रीगणेश, नीरन्वय, निरर्थकाचे पक्षी, असे काव्यसंग्रह, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसं , असे कथासंग्रह, चिंतनशलाका, बदलत्या चौकटी असे ललितलेख संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूणच सगळ्या लेखनातून आधुनिक जीवनाविषयीच्या जाणीवा ठळकपणे व्यक्त होतांना दिसतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक, यांच्यातर्फे ‘ कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या स्त्री-प्रतिमा ‘ याविषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते, हे विशेषत्वाने सांगायला हवे. त्यांना अनेक साहित्य-पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. उदा. केशवराव कोठावळे पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी ह. स. गोखले पुरस्कार, इंदिरा संत, कवी केशवसुत, पु. भा. भावे यांच्या नावाने दिले जाणारे राज्य पुरस्कार, म . रा. साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार इ. — त्यांची साहित्य संपदा अशीच वृद्धिंगत होत राहो, आणि पुरस्कारांची यादी सतत वाढती राहो या सदिच्छांसह कवयित्री नीरजा यांना त्यांच्या आजच्या जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

आज सुप्रसिद्ध पाक-कला तज्ज्ञ श्रीमती मंगला बर्वे यांचा स्मृतिदिन. मराठीत पाककृतीवरील अनेक पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका म्हणून विशेषतः महिला वर्गात त्या अतिशय सुपरिचित आहेत. . पदार्थांच्या वैचित्र्यपूर्ण पण अतिशय चपखल अशा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधून त्यांनी अनेक नवनवीन पाककृती पुस्तकांच्या माध्यमातून गृहिणींपर्यंत पोहोचवल्या. त्यापैकी ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाची आता ७७ वी आवृत्ती निघालेली आहे. हे पुस्तक म्हणजे सासरी निघालेल्या मुलींसाठी जणू पाचवा वेदच, असे या पुस्तकाबद्दल गौरवाने म्हटले जाते. त्यांनी अशा विविध पाककृतींची अगदी सविस्तर माहिती देणारी एकूण २६ पुस्तके लिहिली आहेत. यातील काही पुस्तके इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. नेहेमीच्या पदार्थांबरोबरच, ओव्हनमध्ये करता येतील असे पदार्थ, चायनीज पदार्थ, लग्नात केले जाणारे रुखवत, मांसाहारी पदार्थ, साग्रसंगीत शाकाहारी २१ मेजवान्या याची साद्यन्त माहिती देणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली. पाककृतींचा नेमकेपणा, त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचे नेमके प्रमाण  हे त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच पदार्थांचे वैशिष्ट्य आहे.

‘लोकरीने विणून केलेली खेळणी ‘ हे एक वेगळ्या विषयावरचे त्यांचे पुस्तकही  प्रसिद्ध आहे.   

पती साहित्यिक अच्युत बर्वे यांच्या कामानिमित्ताने त्या बरेचदा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जात असत. तिथल्या वैविध्यपूर्ण पाककृती पाहून त्यांची जिज्ञासा वाढली. मग तिथल्या आचाऱ्यांकडून त्यांनी वेगवेगळ्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या रेसिपी जाणून घेतल्या, स्वतः करून पाहिल्या, आणि मग मासिकांमधून त्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली, ज्याची पुढे पुस्तके झाली. पाककृतींवरच्या पुस्तकांमध्ये सर्वाधिक खपाचा विक्रम त्यांच्या ‘ अन्नपूर्णा ‘ या पुस्तकाने नोंदलेला आहे. आणि विशेष म्हणजे या एका पुस्तकाच्या रॉयल्टीपोटी मंगलाताईंना तीस लाखांपेक्षाही जास्त पैसे मिळाले , हा साहित्य क्षेत्रातही एक विक्रमच ठरला आहे. 

‘ मंगला बर्वे म्हणजेच अन्नपूर्णा ‘ असे समीकरणच आता झाले आहे. अशा, असंख्य गृहिणींसाठी मार्गदर्शक ठरलेल्या मंगला बर्वे यांना आदराने वंदन. 

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग.

संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “.  २) गूगल गुरुजी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments