सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२३ डिसेंबर – संपादकीय
आज २३ डिसेंबर —
कला व नाट्यक्षेत्रातील आस्वादक समीक्षक आणि लेखक म्हणून ख्यातनाम असलेले श्री. ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा आज स्मृतिदिन. (२१/५/१९२८ – २३/१२/२०१०)
‘उत्कृष्ट कलासमीक्षक ‘ ही श्री. नाडकर्णी यांची महत्वाची ओळख तर होतीच. पण त्याचबरोबर, साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट, अशा विविध कलाप्रकारांचा मागोवा घेतानाच, त्या काळात येऊ घातलेल्या नवनवीन बदलांची दखल घेणारे लेखन , मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल प्रमाणात केले. त्यांच्या अशा समीक्षणांना जगभरातले अनेक सन्मान मिळाले होते.—- फ्रांस सरकारचा कलाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, ब्रिटिश सरकारचे गौरवचिन्ह, फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब, हे त्यापैकी काही विशेष सन्मान.
मराठी आणि इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात पन्नासपेक्षाही जास्त वर्षे कार्यरत असणारे श्री. नाडकर्णी यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत— पाऊस, भरती, प्रस्थान, चिद्धोश, हे कथासंग्रह, – दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित, या कादंबऱ्या, – एम.एफ.हुसेन यांच्यावर लिहिलेला ‘ अनवाणी ‘ नावाचा, आणि पिकासो, हिचकॉक, डी .डी .दलाल, गायतोंडे यांच्यावरचे चरित्रग्रंथ,– अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, असे समीक्षा ग्रंथ, – ‘ विलायती वारी ‘ हे प्रवासवर्णन, इंग्रजीत लिहिलेले बालगंधर्वांचे चरित्र, अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली होती.
आजच्या स्मृतिदिनी श्री. नाडकर्णी यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
सुप्रसिद्ध कवी वसंत सावंत यांचा आज स्मृतीदिन. ( ११/४/१९३५ – २३/१२/१९९६ )
“ अर्वाचीन मराठीतील प्रवासवर्णने ( १८०० ते १९६५ ) : प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार “ या एका वेगळ्याच विषयात श्री. सावंत यांनी पी.एच.डी.मिळवली होती. एकीकडे त्यांचे काव्यलेखनही जोमाने चालू होते. वारकरी संत साहित्य, आणि बा.भ.बोरकर, मंगेश पाडगावकर, यांच्या सौंदर्यवादी कविता, यांच्या संस्कारांमधून आपले वाङ्मयीन व्यक्तिमत्व घडत गेले असे ते प्रांजळपणे म्हणत असत. तरल संवेदनांनी भारलेले त्यांचे कविमन त्यांच्या प्रत्येक कवितेत आपसूकच जाणवत असे. त्यांच्या कवितांमध्ये तळकोंकणातल्या सांस्कृतिक जीवनाचे काव्यात्मक दर्शन, धार्मिक संज्ञांचा आणि प्रतीकांचा अनेकदा केलेला वापर, अव्यक्त दुःखाची नकळतपणे व्यक्त होणारी अनुभूती, हे सगळे जाणवायचे. निसर्गकवितांमधली ईश्वरी रूपाच्या प्रत्ययाची घेतलेली नोंद, हे सुद्धा त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कवितेतला विविध वृत्त-छंदांचा वापरही मुद्दाम अधोरेखित करावा असाच.
‘ स्वस्तिक ‘ या पहिल्या काव्यसंग्रहानंतर, उगवाई, देवराई, माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड, सागरेश्वर, असे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ‘ दगड तरे पाण्यावर ‘ ही रामकथेवर आधारित असलेली त्यांची संगीतिका, हा त्यांचा एक वेगळाच काव्याविष्कार. ‘ वसा ‘ हे साडेतीन चरणी ओव्यांचा नियम पाळत त्यांनी रचलेले खंडकाव्य, ही त्यांची विशेष निर्मिती ठरली. आधुनिकतेचे घाव बसू लागल्याने नाश पावत चाललेले कोकणाचे सौंदर्य निदान शब्दरूपात तरी जपण्याचा ध्यास त्यांना लागला होता, हेच या काव्यातून जाणवते. शापित होऊन भोग भोगावे, तद्वतच बदलत चाललेल्या कोकणाचे हे जणू ‘ प्रदेशचित्र ‘च आहे. ‘ देवराई ‘ मधून कोकण-संस्कृतीची वेगवेगळी रूपे दाखवतांना –
“ अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना ।
इथे नांदते संस्कृती भारताची, घरातून दारात वृंदावना ।।
—असे म्हणणारे प्रेमळ कवीमन, ‘ वसा ‘ मध्ये मात्र अतिशय हळवे झाल्याचे जाणवत रहाते.
श्री. सावंत यांना पुढील पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे —- “ प्रवासवर्णन- एक वाङ्मयप्रकार “ हा समीक्षाग्रंथ म.रा. साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित करणे हा एक पुरस्कारच म्हणायला हवा. याच मंडळाने दिलेला ‘ कविवर्य केशवसूत ‘ पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार , ‘ उगवाई ‘ या काव्यसंग्रहाला महा. साहित्य परिषदेचे ‘ह. स. गोखले पारितोषिक.
श्री. सावंत यांना भावपूर्ण वंदन.
☆☆☆☆☆
आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रीय असणारे मराठी साहित्यिक श्री. वामन होवाळ यांचा आज स्मृतिदिन. ( १९३५ – २३/१२/२०१६ )
‘ माणूस ‘ ही त्यांची पहिली प्रसिद्ध झालेली कथा. त्यानंतर बऱ्याच मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. “ अस्मितादर्श “ या नियतकालिकासाठीही त्यांनी नियमित लेखन केले. आवर्जून सांगायचे म्हणजे, त्यांच्या ‘ मजल्याचे घर ‘, ‘पाऊसपाणी ‘, या कथांचे इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद झाले आहेत. तसेच इतर काही कथांचे हिंदी,उर्दू आणि कानडी भाषेतही अनुवाद केले गेले आहेत. दलित ग्रामीण विश्वाचे दर्शन, आणि मुंबईतील झोपडपट्टीतील रहिवाश्यांच्या जीवनाचे चित्र रेखाटणाऱ्या आपल्या कथा ‘ कथाकथन ‘ या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रमुख कथाकथनकार ही त्यांची विशेष ओळख.
त्यांचे प्रकाशित साहित्य असे — ऑडिट, बेनवाद, येळकोट, वाटा आडवाटा, वारसदार, हे कथासंग्रह. आंधळ्याची वरात बहिऱ्याच्या घरात, आणि जपून पेरा बेणं, ही लोकनाट्ये, आणि आमची कविता हे त्यांनी संपादित केलेले पुस्तक.
श्री. होवाळ यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे साहित्य संमेलन, आणि कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले होते.
दलित साहित्यिकांमधील प्रमुख साहित्यिक अशी ख्याती प्राप्त केलेल्या श्री. होवाळ यांना आदरपूर्वक प्रणाम.
☆☆☆☆☆
आज ज्या आणखी एका लेखकांना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वंदन करायला हवे, ते म्हणजे श्री. विष्णू सीताराम चितळे. ( १०/३/१९०० – २३/१२/५३ )
ह्यांनी रूढार्थाने ललित-साहित्य निर्मिती केली नव्हती. पण इतिहास संशोधन आणि इतिहास-विषयक लेखन करतांना , लहानांबरोबरच मोठ्यांनाही आपल्या देशाचा इतिहास समजला पाहिजे, आणि त्यासाठी मुळात त्यांना तो वाचण्यात रुची निर्माण झाली पाहिजे, म्हणून ते सतत प्रयत्नशील होते. आणि याच तळमळीने त्यांनी कितीतरी चित्रे, नकाशे, आलेख यांचा समावेश असलेली पुढील पुस्तके लिहिली होती.—– ब्रिटिशांचा इतिहास, हिंदुस्थानचा अभिनव इतिहास, नवभारताच सांस्कृतिक इतिहास, शनिवारवाडा, सिंहगड, इ.– कुणालाही वाचण्यात रस वाटावा अशा या पुस्तकांबरोबर ‘ इतिहास संचार ‘ नावाचा त्यांचा स्फुटलेखांचा संग्रहही प्रसिद्ध झाला होता. ऐतिहासिक वंशावळी तयार करण्याच्या रियासतकार सरदेसाईंच्या मोठ्या कामात श्री. चितळे यांचा मोठा सहभाग होता.
“ स्वान्तसुखाय “ लेखन न करता, अखिल भारतीयांचा विचार करत आपल्या शब्दसामर्थ्याचा सार्थ उपयोग करणाऱ्या श्री. चितळे यांना आदरपूर्वक नमस्कार.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :- इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈