सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२३ नोव्हेंबर – संपादकीय
आज २३ नोहेंबर :-
थोर शिक्षणतज्ज्ञ ग. वि. अकोलकर यांचा स्मृतिदिन. ( १७सप्टेंबर १९०९ ते २३ नोहेंबर १९८३)
गणेश विनायक अकोलकर हे कुशल अध्यापक, विद्यार्थीप्रिय आणि प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक म्हणून ख्यातनाम होते . नंतर मुख्याध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. आपल्या शाळेत त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. विविध योजना राबवल्या. विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यपद्धतीची ओळख करून दिली. स्नेहसंमेलनात बसवण्यासाठी, मुलांसाठी त्यांनी नाटकेही लिहिली.
आपल्या अध्यापन काळात त्यांनी शिक्षणाच्या अनेक स्तरावर आणि पैलूंवर लेखन केले आहे. त्याबद्दलची त्यांची काही पुस्तके डी.एड., बी. एड. ला पाठ्यपुस्तके म्हणूनही लावली गेली आहेत. त्यांचा संस्कृत वाङ्मयाचा मोठा व्यासंग होता. त्यावरचीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
भारतातील प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण, गांधींचे शैक्षणिक विचार , ग्रामीण विकास आणि शिक्षण, नवशिक्षण, शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन अशी अनेक पुस्तके त्यांनी शिक्षणाविषयी लिहिली आहेत. मराठीचे अध्यापन कसे करावे, यावरही त्यांचे पुस्तक आहे.
शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त, मादाम मेरी क्युरी यांचे चरित्र त्यांनी लिहिले आहे. कुसुमाग्रज गौरव ग्रंथ, नवी क्षितिजे नवी दृष्टी , भाषा संस्कृती व कला इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. बाणभट्टाच्या कादंबरीचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. दिव्या गीर्वाण भारती, तर्क दीपिका, व्यासकुसुमे, श्रीमद्भागवत कथा व शिक्षण इ. पुस्तके त्यांच्या संस्कृत व्यासंगाची साक्ष देतात. त्यांनी समर्थ चरित्र हे रामदासांचे चरित्र लिहिले आहे, तर स्वराज्याचा श्रीगणेशा व स्वराज्याची स्थापना ही त्यांची ऐतिहासिक पुस्तके आहेत. पाठ्यपुस्तक निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. साहित्यप्रभा ( भाग १ ते ३) , इयत्ता ९वीसाठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकांचे त्यांनी संपादन केले. या शिवाय लेखन विकासाचे ७ भाग त्यांनी तयार केले. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे १९६३साली जे अधिवेशन झाले, त्याचे ते अध्यक्ष होते.
अशा थोर शिक्षणतज्ज्ञाला त्यांच्या स्मृतिदिनी सादर वंदन.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १) शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २) इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈