श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ २३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर:
विविध प्रकारचे लेखन करूनही प्रामुख्याने नाटककार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भा.वि.तथा मामा वरेरकर यांचा जन्म कोकणातील चिपळूण येथे झाला. मालवण, रत्नागिरी येथे शिक्षण झाले. कोकणातील प्रसिध्द अशी दशावतार ही नाट्यमय लोककला लहान वयातच पहायला मिळाली. त्यामुळे नाटकांविषयी गोडी निर्माण झाली. आपणही काहीतरी, नाटक लिहावे असे वाटू लागले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ‘नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहीले. ते यशस्वी झाले नाही. पण आपण नाटक लिहू शकतो हा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. ते नाटक कंपन्या,नाटककार यांच्याशी संपर्क वाढवू लागले व पुढे नाट्य लेखनाचे आपले स्वप्न त्यांनी समर्थपणे साकार केले. मोठेपणी त्यांना टपाल खात्यात नोकरी मिळाली. पण लेखानाच्या प्रेमापोटी त्यांनी ती काही काळानंतर सोडून दिली व संपूर्ण काळ लेखन केले.
सुमारे सदतीस नाटके, सहा नाटिका कथा, कादंब-या, रहस्यकथा, बंगाली साहित्याचा अनुवाद, असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. शिवाय ते सक्रीय राजकारणातही सहभागी होते.
1908 साली कुंजविहारी हे त्यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक. पण ते फारसे गाजले नाही. नाटककार म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली ती 1918 साली आलेल्या ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकाने. पुढील सुमारे तीस वर्षे त्यांचे नाट्यलेखन चालू होते.
काही प्रसिद्ध नाटके :-
उडती पाखरे, करग्रहण, तुरंगाच्या दारात, संगीत द्वारकेचा राजा, धरणीधर, भूमीकन्या सीता, लंकेची पार्वती, सत्तेचे गुलाम, संन्याशाचा संसार, सिंहगड, सोन्याचा कळस, हाच मुलाचा बाप इत्यादी.
एकांकिका:-
चंद्रचकोरी, ती का गेली, पुन्हा गोकुळ, शुभमंगल इत्यादी. एकूण अकरा.
कादंबरी/दीर्घकथा :-
अनुपमेचे प्रेम, एकादशी, कुलदैवत, चिमणी, झुलत मनोरा, धावता धोटा, पेटते पाणी, विधवाकुमारी इत्यादी सुमारे चाळीस.
अनुवादित साहित्य:-
मराठी वाचकाला बंगाली साहित्याची ओळख करून देण्याचे श्रेय मामा वरेरकर यांनाच जाते. शरदचंद्र आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अनेक कादंब-या त्यांनी अनुवादित केल्या आहेत. तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘एकविंशती’या एकवीस कथाही अनुवादित केल्या आहेत. काही अनुवादित कथा, कादंबरी,नाट्य याप्रमाणे:
अखेरची ओळख, अनुराधा, एकविंशती, गृहदाह, चरित्रहीन, ठाकुरांची नाटके, देवदास, फाटकी वाकळ, भैरवी, माधवी, रत्नदीप इत्यादी.
ललित लेखन :-
आघात(निवडक भाषणे व लेख), बंकिमचंद्र चट्टोपाध्याय(चरित्र), माझा नाटकी संसार(दोन खंडी आत्मचरित्र), माझ्या हिमालयातील यात्रा(प्रवासवर्णन) इत्यादी.
मामा वरेरकर यांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल योग्य असे सन्मानही प्राप्त झाले आहेत. 1959 साली त्यांना पद्मभूषण या किताबाने गौरवण्यात आले. संगीत नाटक अकादमीची फेलोशीप त्यांना मिळाली होती. धुळे येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1938 साली पुणे येथे भरलेल्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार म्हणून राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली होती.
वयाच्या 81 व्या वर्षी 1964साली त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या लेखन कर्तृत्वास सलाम!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकिपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈