सौ. गौरी गाडेकर
२४ फेब्रुवारी – संपादकीय
प्रभाकर रामचंद्र दामले
प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले (24 फेब्रुवारी 1905 – 24 फेब्रुवारी 1986)
त्यांनी तत्त्वज्ञान या विषयात 1924मध्ये बी ए व 1927 मध्ये एम ए केले.
ते नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व नंतर विभागप्रमुख होते. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ फिलॉसॉफी, अमळनेर येथे रिसर्च फेलो होते. कर्नाटक महाविद्यालय, धारवाड येथे तत्त्वज्ञान व इंग्लिशचे प्राध्यापक होते.
1954 मध्ये तर्कशास्त्र व सद्वस्तुमीमांसा विभाग, भारतीय तत्त्वज्ञान परिषद, सिलोन येथे ते अध्यक्ष होते. नंतर 1955, 1958, 1959 साली अनुक्रमे ऑक्सफर्ड व लीड्स, व्हेनिस व म्हैसूरला भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदांमध्ये त्यांनी निबंध सादरीकरण केले.
‘बोधवचने ‘, ‘विचारवडाच्या पारंब्या’, ‘ चिंतन’ व ‘न्यायरत्न महर्षी विनोद यांच्यावर लेख – महर्षी विनोद जीवन दर्शन’ हे त्यांचे मराठी लेखन.
त्यांनी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन’ व ‘डॉ. आय. टी. रमसे’ या पुस्तकांच्या इंग्रजी प्रस्तावनाही लिहिल्या.
त्यांच्या निधनानंतर 2 मार्च 1986च्या ‘केसरी’मध्ये त्यांचे सहकारी प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांनी लिहिलेला ‘श्रेष्ठ विचारवंत :प्राचार्य प्र. रा. दामले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता.
24 फेब्रुवारी 1986 ला त्यांचे देहावसान झाले.
☆☆☆☆☆
लक्ष्मीबाई टिळक
लक्ष्मीबाई नारायण टिळक (1 जून 1868 – 24 फेब्रुवारी 1936)
मनकर्णीका गोखले यांचा वयाच्या 11 व्या वर्षी नारायण वामन टिळक या कवीशी विवाह झाला व त्या लक्ष्मीबाई टिळक झाल्या.
तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लिहितावाचता न येणाऱ्या लक्ष्मीबाईंना त्यांच्या पतीने लिहिणेवाचणे शिकवले. लक्ष्मीबाईंनी लेखिका, कवयित्री, वक्ता बनावे, यासाठी टिळक प्रयत्नशील होते.
लक्ष्मीबाईंनी लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र अतिशय गाजले.85 वर्षे उलटून गेली, तरी त्याची जादू अजूनही कायम आहे. त्यातील प्रांजलपणा व निर्भयता याची तुलना आचार्य अत्रेंनी म. गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग’शी केली.बाईंची तल्लख विनोदबुद्धी, आनंदी, खेळकर स्वभाव, अकृत्रिम,खुमासदार शैली, एवढंच नव्हे तर नितळ, साध्या, अभिनिवेशरहित दृष्टीने आयुष्याकडे पाहत केलेले लेखन मनाला भिडते.
टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर साडेचार वर्षांनी बाईंनीही विचारपूर्वक धर्मांतर केले.त्यांनी नेहमीच आधी विचार बदलले, मग आचार.
टिळकांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहायला घेतले. पण जेमतेम 10 अध्याय लिहून झाल्यावर त्यांचे निधन झाले.लक्ष्मीबाईंनी पुढचे 64 अध्याय लिहून ते महाकाव्य पूर्ण केले.
त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत.’भरली घागर ‘हा त्यांचा एक कवितासंग्रह.
24 फेब्रुवारी 1936 रोजी त्यांचा देहांत झाला.
‘स्मृतिचित्रे’सारखे अभिजात अक्षरवाङ्मय लिहून लक्ष्मीबाई टिळक मराठी साहित्यात अमर झाल्या आहेत.
प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र दामले व लक्ष्मीबाई टिळक या दोघांनाही त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर वंदन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड : शताब्दी दैनंदिनी.
इंटरनेट. ‘मोठी तिची सावली ‘:वंदना बोकील -कुलकर्णी (चतुरंग, लोकसत्ता 19फेब्रुवारी 2022)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈