सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २४ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी)
मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. श्रीपाद रघुनाथ जोशी यांचा आज स्मृतिदिन . ( कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० – २४ सप्टेंबर, इ.स. २००२ )
जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता.
कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथात अरबी, तुर्की, फारसी भाषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली, आणि हा व्युत्पत्तीकोश परिपूर्ण करण्याचे महत्वपूर्ण काम जोशींनी केले. ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये प्रकाशित झाली. श्री. जोशी यांनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात पुस्तके महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले.
श्रीपाद रघुनाथ जोशी यांनी जी बरीच पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तके अशी —–
अखेरचं पर्व / अनंंता काय रे केलंस हे? / आनंदी गोपाळ / उलगाउलग (१९८३) : श्रीपाद जोशींना त्यांचे उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश तयार करताना संबंधितांनी जो मनस्ताप दिला त्याची हकीकत सांगणारे पुस्तक / ग. दि. माडगूळकर वाङ्मयदर्शन / गांधीजी : एक झलक / उर्दूची नवरत्नें / कस्तुरीचे कण / ग्रामीण विकासाची वाटचाल / जिब्रानच्या नीतिकथा / रवींद्रनाथ आणि महाराष्ट्र —- ही पुस्तके फक्त उदाहरणादाखल इथे नमूद केली आहेत.
श्रीपाद जोशी यांनी लिहिलेले शब्दकोश——
—–मराठी हिंदुस्तानी कोश (१९४०) : याचे मुख्य संपादक वामनराव चोरघडे यांनी खरंतर फक्त मराठी शब्द निवडले होते आणि त्यांना हिंदुस्तानी प्रतिशब्द देण्याचे काम श्रीपाद जोशी आणि माधवराव सावंत यांनी केले होते.
—–मराठी हिन्दुस्तानी कोश (सुधारित, १९५२) :तुरुंगात बसल्याबसल्या श्रीपाद जोशींनी पहिल्या कोशाचा हा नवा सुधारित कोश तयार केला. या कोशात मराठी आणि हिंदुस्तानी या दोनही भाषांतील शब्दांचे व्याकरण दिले होते. मात्र मूळ मराठी शब्द कोणत्या भाषेतून आला त्याची माहिती नव्हती. हिंदी भाषकांना मराठी उच्चार कळावेत म्हणून च, छ, ज आणि झ खाली जरूर तेव्हा नुक्ते दिले होते. या कोशात १४,००० शब्द होते.
——विद्यार्थी हिंदी-मराठी कोश.
—– हिंदी-मराठी-गुजराती-इंग्रजी कोश : वोरा आणि कंपनीच्या नानूभाई व्होरा यांच्या आग्रहास्तव हाती घेतलेल्या या कोशाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..
——अभिनव शब्दकोश : कोशाच्या पहिल्या भागात हिंदी शब्दांना मराठी व हिंदी प्रतिशब्द दिले होते, तर दुसऱ्या भागात मराठी शब्दांना हिंदी प्रतिशब्द दिले होते. या कोशात उर्दू (अरबी-फारसी) शब्दांचा चांगलाच भरणा होता. शिवाय हिंदी-मराठी वाक्प्रचार, म्हणी आणि इतर उपयुक्त माहिती कोशात दिली होती. या कोशाच्या १९९६ सालापर्यंत एकूण सहा आवृत्त्या निघाल्या.
——उर्दू-मराठी शब्दकोश
——बृहत् हिंदी-मराठी शब्दकोश, तसेच बृहत् मराठी-हिंदी शब्दकोश : या कोशावर संपादक म्हणून गो.प. नेने यांचे नाव आहे, पण प्रत्यक्षात त्यांनी या शब्दकोशातला एकही शब्द लिहिलेला नाही. सगळे काम जोशी यांनीच केले होते.
——उर्दू-मराठी-हिंदी त्रैभाषिक कोश : (१९६२) : खरंतर हा संपूर्ण कोश श्रीपाद जोशी यांनी एकट्याने केला होता. पण अरबी-फारसीचे अर्धवट ज्ञान आणि मराठीबाबत पूर्ण अज्ञान असलेले तथाकथित विद्वान डॉ. निजामुद्दीन एस. गोरेकर या माणसाने कोशातल्या शब्दोच्चारांमध्ये, दुरुस्त करता टेंडर नाही इतकी ढवळाढवळ केली आणि कोशावर स्वतःचे नाव समीक्षक-संपादक म्हणून टाकले. श्रीपाद जोशींना हा कोश प्रकाशनानंतर सहा वर्षांनी पहायला मिळाला, तेव्हा त्यांना कोशातल्या या अक्षम्य चुका दिसल्या. मुद्रण प्रतीचे संपादन व प्रुफे तपासणाऱ्याचे नाव पुस्तकावर समीक्षक संपादक म्हणून छापल्याचे हे एकमेव उदाहरण असावे. असे का केले हे विचारले असता, ‘पुण्याचा हिंदु-ब्राह्मण असलेल्या माणसाला’ काय उर्दू येणार ? असा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाने कोशावर एका मुसलमानाचे समीक्षक संपादक म्हणून नाव टाकल्याचा खुलासा महामंडळाने केला ! या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली, त्यावेळी श्रीपाद जोशींनी सुचवलेल्या दुरुस्त्या धुडकावून लावून महामंडळाने त्याच जुन्या कोशाचे पुनर्मुद्रण केले.—- हा तपशील इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो.
—-उर्दू-मराठी-हिंदी शब्दकोश : हा २०,००० शब्दांचा नवा शब्दकोश श्रीपाद जोशींनी बनवला होता.
इतकी पुस्तके आणि लेखकांसाठी अतिशय उपयुक्त आणि आवश्यक असणारे इतके सारे भाषा-कोश लिहिणाऱ्या श्री. श्रीपाद रघुनाथ जोशी यांना विनम्र आदरांजली .
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
मंजुषा सुनीत मुळे ,
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ ,
मराठी विभाग .