श्रीमती उज्ज्वला केळकर
२६ ऑक्टोबर – संपादकीय
नोबेल पुरस्कार : आल्फ्रेड बनार्ड नोबेल हे स्वीडिश रसायन शास्रज्ञ होते. डायनामाईट या जगप्रसिद्ध विस्फोटकाचा शोध त्यांनी लावला. या शोधामुळे त्यांना अमाप संपत्ती मिळाली, परंतु आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त प्रमाणात होत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या मृत्यूला आपण करणीभूत झालो, ही गोष्ट त्यांना सलत होती. म्हणून त्यांनी आपल्या मृत्युपत्रामध्ये, स्वत: मिळवलेल्या या अमाप संपत्तीमधील मोठा वाटा नोबेल पुरस्कार देण्यासाठी म्हणून वापरला जावा, अशी तरतूद केली. त्यांच्या या इच्छेनुसार आल्फ्रेड बनार्ड नोबेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनापासून म्हणजेच १०डिसेंबर १९०१ पासून रसायनशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र, किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रामध्ये, संपूर्ण विश्वात अतुलनीय कामगिरी करणार्या संशोधक व शांतीदूताला पारितोषिक म्हणून हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
रवींद्रनाथ टागोर – ( ७ मे १८६१- ७ ऑगस्ट १९४१) भारतामध्ये हा पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीला सन १९१३ साली मिळाला. ते कवी, कथाकार, नाटककार, संगीतकार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, तत्वज्ञ होते. रवींद्र संगीत म्हणून संगीताची नवी धारा त्यांनी प्रवाहीत केली. त्यांचे वैचारिक आणि ललित लेखनही आहे. घर और बाहर, कबुलीवला, द गार्डनर, स्ट्रे बर्ड्स, द गोल्डन बोट, द पोस्ट ऑफिस इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. कबुलीवला, पोस्ट ऑफिस इ. त्यांच्या पुस्तकांवर चित्रपटही निघाले.
त्यांना १९१५ मध्ये किंग जॉर्ज पंचम यांनी नाईटहूड ही पदवी दिली होती. ती त्यांनी ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केली.
सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल –(१७ऑगस्ट – २०१८) व्ही. एस. नायपॉल म्हणून त्यांची विश्वात ओळख आहे. नोबेल परितोषिक मिळवणारे हे भारतीय वंशाचे पण लंडनमध्ये वास्तव्य करणारे साहित्यिक। त्यांना साहित्यासाठी २००१ मधे नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक कादंबर्या लिहिल्या. त्यापैकी ‘ए हाऊस ऑफ मि.विश्वास’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय त्यांनी, ए बेंड इन द रिव्हर, इन ए फ्री स्ट्रीट, अ वे इन द वर्ल्ड, मॅजिक सीडस इ. कादंबर्या लिहिल्या. या व्यतिरिक्त अन्य अनेक विषयांवरची त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी भारताचा इतिहास, सस्कृती, सभ्यता यावर ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ आणि ‘अ वुंडेड सिव्हीलयझेशन’ ही पुस्तके लिहिली.
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :- १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी “. २) गूगल गुरुजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈