सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२६ नोव्हेंबर – संपादकीय
आज २६ नोहेंबर :-
फक्त आधुनिक मराठी साहित्यातच नाही, तर एकूणच भारतीय साहित्यात मोठी भरारी घेतलेले अग्रेसर लेखक असा गौरव प्राप्त केलेले श्री.भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिन. (२६/११/१९२६ — ३०/१०/१९९६)
‘साहित्यिक ‘ या ठळक ओळखीबरोबरच, कामगार चळवळकर्ते, पत्रकार, म्हणूनही सुपरिचित असणारे श्री. भाऊ पाध्ये ( प्रभाकर नारायण पाध्ये ) यांनी कादंबरी, कथा , नाटक अशा सर्व माध्यमांमधून मुख्यतः सामाजिक विषयांवर आधारित असे विपुल लेखन केलेले आहे. वैतागवाडी, वासूनाका, राडा, वणवा, करंटा, अग्रेसर, वॉर्ड नं. ७–सर्जिकल, होमसिक ब्रिगेड, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, जेल बर्ड्स, डोंबाऱ्याचा खेळ, या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यापैकी ‘ वैतागवाडी ‘ या कादंबरीच्या ५ आवृत्त्या काढल्या गेल्या आहेत . वासूनाका, राडा, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, या कादंबऱ्या आधुनिक मराठी साहित्यातील ‘ क्लासिक ‘ कादंबऱ्या म्हणून नावाजल्या गेल्या आहेत. ‘ वासूनाका ‘ ही कादंबरी काहीशी विवाद्य ठरली होती खरी, पण दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर यासारख्या लेखकांनी त्या कादंबरीतील मानवतेचे वास्तव चित्रण आणि मौलिकता याचे फार कौतुक केले होते.
थोडीसी जो पी ली, थालीपीठ, मुरगी, डोंबाऱ्याचा खेळ , असे त्यांचे कथासंग्रह, आणि पिचकारी ही विनोदी कथाही वाचकांच्या पसंतीस पूर्णपणे उतरले होते. “ गोदाम “ या चित्रपटाची कथाही श्री. पाध्ये यांनीच लिहिलेली होती. त्यांनी “ ऑपरेशन छक्का “ हे नाटकही लिहिले होते. रहस्यरंजन, अभिरुची, माणूस, सोबत क्रीडांगण, दिनांक, चंद्रयुग, अशा लोकप्रिय मासिकांसाठी ते सातत्याने स्तंभलेखन करत असत.
भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर, “ वासूनाका सांगोपांग “ हे वसंत शिरवाडकर यांनी संपादित केलेले पुस्तक, आणि “ मी आणि माझे समकालीन “ हे श्री. दिलीप पु. चित्रे यांनी लिहिलेले पुस्तक,अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
त्यांच्या “ वैतागवाडी “ या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, “ बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर “ या कादंबरीला ललित पुरस्कार, आणि त्यांना स्वतःला ‘ महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ गौरववृत्ती ‘ देऊन गौरवण्यात आले आहे.
आधी ‘ हिंद मजदूर ‘,’ नवा काळ ‘, आणि नंतर सलग दहा वर्षे ‘ नवशक्ती ‘ या दैनिकांसाठी त्यांनी पत्रकारिता केलेली होती.
“ विश्वसाहित्यात हे नाव कायमचे कोरले जाईल “ असे ज्यांच्याबद्दल म्हटले जायचे, त्या श्री. भाऊ पाध्ये यांना हार्दिक अभिवादन.
☆☆☆☆☆
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत कम्युनिस्ट कामगार नेते कॉ.गोविंद पानसरे यांचाही आज जन्मदिन. ( २६/११/१९३३ — २०/०२/२०१५ )
एक वर्तमानपत्र-विक्रेता, मग नगरपालिकेत शिपाई, मग प्राथमिक शिक्षक, अशी वाटचाल करत शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत झालेले कॉ. पानसरे, कामगारांचे वकील म्हणून कोल्हापुरात नावाजले गेले होते. आणि पुढे वकील संघटनेचे अध्यक्षही झाले होते. समाजातील सर्वात जास्त शोषित असणाऱ्यांच्या, तसेच असंघटित कामगार, शेतमजूर, घरगडी, अशासारख्यांच्या हक्कांसाठी, कुठलीही तडजोड न करता लढणारे कार्यकर्ता अशीच त्यांची सर्वमान्य ओळख होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. शांतता व निरपेक्षता यासाठीच्या अभियानांमध्येही ते सातत्याने कार्यरत होते.
त्यांनी,– अवमूल्यन : कळ सोसायची कुणी ?, काश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कूळकथा, कामगार-विरोधी कामगार धोरणे, धर्म-जात-वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा, पंचायत राज्याचा पंचनामा, मार्क्सवादाची तोंडओळख, शेतीधोरण परधार्जिणे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी–पर्यायी दृष्टिकोन, अशी अनेक अभ्यासपूर्ण आणि विचार-प्रवर्तक पुस्तके लिहिली होती. राजर्षी शाहू : वसा आणि वारसा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध होते. त्यांचे सर्वात जास्त प्रसिद्ध पुस्तक म्हणजे “ शिवाजी कोण होता ?”.– ‘ शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवून, त्याद्वारे लोकशिक्षणाची महत्वाची कामगिरी या पुस्तकाने केली आहे ‘ असे या पुस्तकाबद्दल आवर्जून म्हटले गेले होते. आणि या पुस्तकाची १. ५ लाखांहून जास्त विक्री झाली होती. विशेष म्हणजे या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे.
संपादक अशोक चौसाळकर यांनी “ कॉ. गोविंद पानसरे : समग्र वाङ्मय “ हे दोन खंडातले पुस्तक प्रकाशित केलेले आहे. २००३ साली श्री. पानसरे यांचे चित्र असणारे पोस्टाचे तिकीट काढले गेले आहे. त्यांच्या नावाने २०१५ सालापासून एक ‘ प्रबोधन पुरस्कार ‘ ही दिला जातो.
आयुष्यभर प्रामुख्याने फक्त सामाजिक विचार करत राहिलेल्या कॉ. गोविंद पानसरे यांना विनम्र आदरांजली.
☆☆☆☆☆
लोककलाकार, शाहीर विठ्ठल उमप यांचा आज स्मृतिदिन. ( १५/७/१९३१ — २६/११/२०१० )
लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे आकर्षित झालेल्या शाहीर उमप यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वतः लोकगीतांचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली होती. डॉ. बाबासाहेबांनी लोकगीते आणि पथनाट्ये या माध्यमांमधून दलितांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. उमपांनी हेच कार्य आयुष्यभर पुढे चालू ठेवले. एक हजाराहून अधिक लोकगीते लिहून लोकांसमोर स्वतः ती सादर करतांना, पोवाडे, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, धनगरी गीते, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी, नंदीबैल असे अनेकविध प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. कव्वाली आणि गझल गायनातही ते अव्वल समजले जात. आपल्या गाण्यांमधून सतत सामाजिक संदेश दिला जावा, यासाठी ते आग्रही असायचे.
माझी वाणी भीमाचरणी, आणि रंग शाहिरीचे, हे त्यांचे काव्यसंग्रह, आणि “ उमाळा “ या नावाने त्यांच्या गझलांचा संग्रहही प्रसिद्ध झाला होता. पण त्याचबरोबर, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड, विठ्ठल रखुमाई, ही त्यांनी लिहिलेली नाटकेही अविस्मरणीय म्हणावी अशीच होती. ‘ फू बाई फू,फुगडी फू ‘ हे त्यांचे आत्मचरित्र रसिकमान्य ठरले होते.
विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या, विहीर, नटरंग, अशासारख्या १० चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. १९८३ मध्ये आयर्लन्ड इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत
भारताचे प्रतिनिधित्व करून त्यांनी आपल्या देशाला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता हेही आवर्जून सांगायलाच हवे.
राज्य सांस्कृतिक पुरस्कार, व दलित-मित्र पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. महा. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित शाहिरी शिबिराचे ते चार वर्षे संचालक होते. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे सल्लागार, नभोवाणीवर परीक्षक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या कामात सक्रीय सहभाग,— अशा अनेक लोकाभिमुख कामांसाठी आयुष्यभर मनापासून कार्यरत असणारे शाहीर विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
माहितीस्रोत :- इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈