सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर, ई–अभिव्यक्ती (मराठी)
विद्याधर गोखले
विद्याधर संभाजीराव गोखले (4 जानेवारी 1924 – 26 सप्टेंबर 1996) हे पत्रकार व संगीत नाटककार होते.
प्रथम गोखले शिक्षक म्हणून काम करत होते.नंतर ते पत्रकार म्हणून ‘नवभारत’मध्ये व पुढे ‘लोकसत्ता’त गेले.त्यांनी ‘साप्ताहिक लोकसत्ते’ची पूर्ण जबाबदारी सांभाळली. पुढे ते ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक झाले.
अमरावतीत त्यांना ‘सावधान’ या वृत्तपत्राच्या वीर वामनराव जोशी यांचा सहवास लाभला. त्याबरोबरच गोखलेंनी न. चिं. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, शि. म. परांजपे यांच्या लेखनाचा खास अभ्यास केला. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी ह. रा. महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. त्यांनी विपुल प्रमाणात संपादकीय लेखन केले.
त्यांची शैली गांभीर्यापेक्षा रंजकतेकडे झुकणारी होती. राजकीय लेखनही ते साहित्यिक शैलीने नटवत. संस्कृत व उर्दू साहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. त्यातील वचने व कल्पना ते आपल्या अग्रलेखात वापरत.संपादकाने प्रक्षोभक लिहिण्यापेक्षा मुद्यांकडे,भाषेच्या व शब्दांच्या नेटक्या वापराकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे मत होते. त्यांचे लेखन सरळ, सुबोध असून त्यात विनोदाचा शिडकावा असे.
‘सं.जय जय गौरीशंकर’, ‘सं. पंडितराज जगन्नाथ’, ‘सं. मदनाची मंजिरी’, ‘सं. मंदारमाला’, ‘सं. सुवर्णतुला’, ‘सं.स्वरसम्राज्ञी’ वगैरे गोखलेंनी लिहिलेली नाटके रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. त्यांनी ‘झंझावात’ ही कादंबरीही लिहिली.
गोखलेंनी रंगशारदा प्रतिष्ठानची स्थापना केली.
ते 1989-1991 या काळात उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई या संस्थेचे ते 1995-1996 दरम्यान अध्यक्ष होते.
1993मध्ये सातारा येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
पुण्यात विद्याधर गोखले यांच्या नावाचे, संगीताचे व अभिनयाचे कार्यक्रम करणारे संगीत- नाट्य प्रतिष्ठान आहे.
मुंबईतील दादर येथील बाळ गोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग हे दोन रस्ते एकमेकांना मिळून तयार झालेल्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचे नाव दिले आहे.
मुंबई पत्रकार संघातर्फे दरवर्षी चांगल्या लेखक -पत्रकाराला विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार देण्यात येतो.
विद्याधर गोखले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली!
☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈