श्री सुहास रघुनाथ पंडित
२७ ऑक्टोबर – संपादकीय
मधु मागशी माझ्या सख्यापरी, जन पळभर म्हणतील हाय हाय, नववधू प्रिया मी बावरते, कशी काळ नागिणी, तिन्ही सांजा सखे मिळाल्या… यासारख्या एकाहून एक सरस भावकवितांचे जन्मदाते राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा आज जन्मदिवस. मध्य भारतातील (म.प्र.) ग्वाल्हेर जवळील मुगावली येथे 1873 मध्ये त्यांचा जन्म झाला. अर्वाचीन मराठी कवींपैकी एक महत्त्वाचे कवी. आपल्या आयुष्यात त्यांनी युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश अशा विविध पदांवर काम केले असले तरी त्यांचा पिंड हा कविमनाचा होता. तो त्यांनी आयुष्यभर जपला. हिंदी आणि उर्दू काव्य, गझल यांचा अभ्यास आणि शास्त्रशुद्ध वैदिक शिक्षण याचा त्यांना मराठी काव्यरचनेत खूप उपयोग झाला. शिवाय टेनिसन, ब्राउनिंग यासारखे पाश्चात्य कवी, जयदेव यांचे संस्कृत काव्य, रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य या सर्वांमुळे त्यांची कविता समृद्ध होत गेली. त्यांची कविता ही संदेश देणारी किंवा प्रचारात्मक नव्हे तर ती विशुद्ध आनंद देणारी भावकविता आहे. गेयता लाभलेली त्यांची कविता म्हणूनच गीतात रुपांतरीत झाली आणि मराठी माणसाच्या ओठावर जाऊन बसली. त्यांच्या कवितेतून त्यांच्या तृप्त, समाधानी जीवनाचे दर्शन घडते. सौंदर्यवादी दृष्टीकोनाबरोबरच परमेश्वरावरील श्रद्धा ही त्यांच्या सात्विक काव्य निर्मितीचे मुख्य गमक आहे.
त्यांचा पहिला कविता संग्रह 1920 ला प्रकाशित झाला. नंतर 1935 मध्ये समग्र तांबे कविता प्रसिद्ध झाली. त्यात 225 हून अधिक कवितांचा समावेश आहे. त्यांनी काव्यविषयक गद्य लेखनही विपुल प्रमाणात केले आहे.रविकिरण मंडळातील कवींवर त्यांच्या साहित्याची छाप पडली होती.1926 साली मध्य भारतीय कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच 1932 मध्ये कोल्हापूर येथे साहित्य संमेलनांतर्गत कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1937 साली ग्वाल्हेर संस्थानने त्यांना राजकवी हा सन्मान दिला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार ठेवले आहेत. तसेच त्यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. या काव्यभास्कराचे ग्वाल्हेर येथे 1941 मध्ये निधन झाले.
भास्कर रामचंद्र भागवत आणि श्रीधर कृष्ण शनवारे या दोन ज्येष्ठ साहित्यिकांचा आज स्मृतीदिन.
भास्कर रामचंद्र भागवत हे प्रामुख्याने बाल साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक. त्यांनी अर्थ शास्त्रातील पदवी संपादन केली होती.परंतू त्यांना सुरूवातीपासूनच इंग्रजी साहित्य व विज्ञान अभ्यासाची विशेष आवड होती.तसेच त्यांनी काही काळासाठी पत्रकारिताही केली. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात मराठी अनुवादक म्हणून काम केले. स्वातंत्र्य चळवळीतीही त्यांचा सहभाग होता. ‘खेळगडी’ या मासिकाचे संपादनही त्यांनी केले होते.
वैतागवनातील वाफाटे हे त्यांचे विनोदी लेखन, फास्टर फेणे या मध्यवर्ती पात्राभोवती गुंफलेले कथानक, साहसकथांचा अनुवाद, किशोरवीन मुलांसाठी अद्भूतरम्य कादंबरी लेखन त्यांनी केले. खजिन्याचा शोध, तुटक्या कानाचे रहस्य, भुताळी जहाज, साखरसोंड्या, जंगलबुकातील दंगल यासारखे अनेक बाल कुमार प्रिय साहित्य त्यांनी लिहिले. 1975च्या बाल कमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या शिवाय ते नाट्य अभ्यासक व नाट्य समीक्षक ही होते. त्यानी मराठी नाट्यकोशाचे लेखन संपादनही केले. अशा या थोर साहित्यिकाचे निधन 27 /10/2001 ला झाले.
श्रीधर कृष्ण शनवारे हे विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक.त्यांनी धनवटे महाविद्यालयात 35 वर्षे अध्यापन केले. या संपूर्ण कालावधीत व अक्षरशः शेवटपर्यंत त्यानी लेखन, काव्यलेखन केले.त्यांचे लेखन विविधांगी आहे. नऊ काव्य संग्रह व समीक्षा, अनुवादात्मक सोळा पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.’अतूट’ हे नाटक त्यांनी मूळ बंगाली साहित्यकृताीवरून लिहिले। उन्ह उतरणी, आतून बंद बेट, थांग अथांग, तळे संध्याकाळचे, तीन ओळींची कविता, सखा हे त्यांचे काही काव्यसंग्रह.राक्षसाचे वाडे हे बालसाहित्य, कथाकार वामन चोरघडे समीक्षाग्रंथ, कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र ही प्रवास वर्णने, थेंब थेंब चिंतन हे चिंतनात्मक अशी समृद्ध साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे.उन्हं उतरणी याला केशवसुत पुरस्कार व थांग अथांग ला कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त झाला आहे.तर आतून बंद बेट हा काव्यसंग्रह नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी लावण्यात आला होता.
‘जातो माघारा’ हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच त्यांचे दि 27/10/2013 ला दुःखद निधन झाले.
अशा या ज्येष्ठ साहित्यिकांना ही शब्दवंदना !
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :- विकिपीडिआ साभार.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈