श्री सुहास रघुनाथ पंडित

? २७ नोव्हेंबर –  संपादकीय  ?

मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक दि.बा.मोकाशी यांचा आज जन्मदिन तर ग. त्र्यं. माडखोलकरआनंद यादव यांचा आज स्मृतीदिन. या साहित्यिकांच्या कारकिर्दीची आज ओळख करून घेऊ.

शिवाय बा.द.सातोसकर या गोमंतकीय साहित्यिकाविषयी आजच्या अंकात स्वतंत्रपणे जाणून घेऊ.

दिगंबर बाळकृष्ण तथा दि.बा.मोकाशी   

उरण,जि .रायगड हे दि.बा.मोकाशी यांचे जन्मगाव.त्यांनी  अभियांत्रिकी पदविका घेतली होती व पुण्यात रेडिओ दुरूस्तीचा व्यवसाय सुरू केला होता.पण त्यांच्यातील  लेखक मात्र अविरतपणे सक्रीय होता.त्यामुळेच ललित ,कथा,गूढ कथा,पिशाच्च कथा,रहस्य कथा ,बाल साहित्य अनुवादित साहित्य अशा विविध प्रकारचे लेखन ते करू शकले.विषयांची विविधता,सोपी भाषा,आशयघन लेखन,व्यक्तिच्या अंतर्मनाचा वेध घेण्याची प्रवृत्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.कथालेखन हा त्यांच्या विशेष आवडीचा प्रांत !

सुमारे पस्तीस पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली आहे.

त्यांची काही साहित्य संपदा  

कथासंग्रह –  आदिमाया,आम्ही मराठी माणसं,कथामोहिनी,तू आणि मी,माऊली,लामणदिवा,वणवा इ. लामणदिवा हा 1947 साली लिहिलेला त्यांचा पहिला कथासंग्रह.

कादंबरी – संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील आनंद ओवरी,देव चालले,पुरूषास शंभर गुन्हे माफ,स्थळयात्रा इ.

यापैकी आनंद ओवरी आणि देव चालले या दोन कादंब-यांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे.वात्स्यायन ही कादंबरी चरित्रात्मक आहे.

ललित साहित्य – 

आमोद सुनासि आले,अठरा लक्ष पाऊले,अमृतानुभव,पालखी,संध्याकाळचे पुणे इ.

यापैकी आमोद सुनासि चा हिंदी तर अमृतानुभव चा गुजराती अनुवाद  व  पालखी चा इंग्रजी अनुवाद झाला आहे.

संध्याकाळचे पुणे हे 1980 साली लिहिलेले त्यांचे शेवटचे पुस्तक होय.

बालसाहित्य –  

अंधारदरी,किमया,गुपित,जगाच्या कोलांट्या,बालचंद्र, तुमचा रेडिओ इ.

या व्यतिरिक्त त्यांना काही पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.हेमिंग्वे च्या FOR WHOM THE BELL TOLLS याचा  ‘घणघणतो घंटानाद’ हा अनुवाद.मेडोज टेलर यांच्या ग्रंथावर आधारित प्लासीचा रणसंग्राम हे ऐतिहासिक पुस्तक भाषांतरित केले आहे.

पुरस्कार – 

त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

गुपित 1957,पालखी1957,स्थळयात्रा1958,आमोद सुनासि आले1960,देव चालले1962,जमीन आपली आई1966.साहित्य अकादमीने ‘,निवडक मोकाशी’ हा कथासंग्रह संपादित केला आहे.

या चतुरस्त्र साहित्यिकाचे निधन 1981 मधे पुणे येथे झाले.

☆☆☆☆☆

गजानन त्र्यंबक माडखोलकर  

ग.त्र्यं.माडखोलकर हे उच्चशिक्षित नसले तरी मराठी,संस्कृत आणि इंग्रजी या तिनही भाषांत त्यांनी भरपूर वाचन केले होते.शिवाय केवळ आवड म्हणून इटली व आयर्लंड च्या इतिहासाचा अभ्यास केला होता.

ज्येष्ठ साहित्यिक न.चिं. केळकर यांचे लेखनिक,दै.ज्ञानप्रकाश चे विभाग संपादक, दै.महाराष्ट्र चे सह संपादक अशा विविध पदावर त्यांनी सुरूवातीला काम केले.नंतर तरूण भारत,नागपूर या दैनिकाचे 1944मध्ये संपादक झाले आणि 1967ला त्या पदावरून निवृत्त झाले.त्यामुळे त्यांचे वृत्तपत्रिय लेखनही विपुल प्रमाणात झाले आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी ‘आधुनिक कविपंचक’ हा समीक्षा ग्रंथ लिहिला.तो खूप गाजला व त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळाली. सुरूवातीला त्यांनी संस्कृत, मराठी काव्यलेखनही केले.कादंबरी,ललित,प्रवासवर्णन,व्यक्तिचित्रण,नाटक,समीक्षा असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत.

मराठी बरोबरच हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार यासाठीही त्यांनी कार्य केले.त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता.शिवाय संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते सक्रीय होते.

1946 साली बेळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव येथे सर्वप्रथम पास झाला.

माडखोलकर यांची साहित्यसंपदा –

कादंबरी – अनघा,उद्धार,कांता, डाकबंगला,अरुंधती,उर्मिला,भंगलेले देऊळ इ.

ललित व राजकीय लेखसंग्रह – अवशेष,आव्हान,चिपळूणकर काळ आणि कर्तृत्व,जीवनसाहित्य,महाराष्ट्राचे विचारधन इ.

व्यक्तीचित्रणे – आधुनिक महाराष्ट्राचा राजा,माझे आवडते कवी,माझे आवडते लेखक,इ.

प्रवास वर्णन – मी पाहिलेली अमेरिका

आत्मचरित्रपर –  मी आणि माझे वाचक,मी आणि माझे साहित्य,मृत्यूंजयाच्या सावलीत ,एका निर्वासिताची कहाणी इ.

नाटक – देवयानी.

लघुकथा –  रातराणीची फुले

समीक्षा – वाड्मयविलास,विलापिका,साहित्य समस्या,श्री.कृ.कोल्हटकर व्यक्तिदर्शन इ.

भारतीय साहित्य शास्त्र या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

27/11/1976 ला त्यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन. ?

☆☆☆☆☆

आनंद यादव  

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जन्मलेले आनंद यादव यांनी आपले लेखन कथा,काव्य,कादंबरी,ललित,समीक्षा अशा विविध प्रकारात केले आहे.त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले.सुरूवातीला काही काळ त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.नंतर पुणे विद्यापीठात प्र पाठक या पदावर काम सुरू करून विद्यापीठातून

मराठी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.त्यांचे लेखन हे मूलभूत सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे होते.एकीकडे सर्जनशील साहित्यिक आणि दुसरीकडे चिकित्सक समीक्षक अशी दुहेरी भूमिका त्यांनी पार पाडली.झोंबी या आत्ममचरित्रात्मक कादंबरीत त्यांनी ग्रामीण बोलीभाषेचा वापर केल्यामुळे त्या भाषेला महत्व प्राप्त झाले.त्यांचे साहित्य कन्नड,तेलुगू,हिंदी,इंग्रजी,जर्मनी अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.

श्री.यादव यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले आहे.जुन्नर,असोदा, विटा,बेळगाव,भंडारा,नाशिक,औदुंबर,जळगाव,पुणे, मुंबई अशा ठिकाणी भरलेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 2009 साली महाबळेश्वर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

शिवाजी सावंत पुरस्कार,पु.य.देशपांडे स्मृती पुरस्कार,आचार्य अत्रे,लाभसेटवार,साहित्य अकादमी असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.त्यांच्या पुस्तकाना राज्य सरकारची विविध दहा पारितोषिके मिळाली आहेत.शिवाय राष्ट्रीय हिंदी अकादमीने त्यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कारही दिला आहे.’झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीस 1990चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.

त्यांचे निवडक साहित्य

काव्य – मळ्याची माती,हिरवे जग इ.

कथासंग्रह – आदिताल,उखडलेली झाडे,घरजावई,डवरणी,माळावरची  मैना इ.

ललित,वैचारिक,समीक्षा—–

आत्मचरित्र मीमांसा,ग्रामसंस्कृती,ग्रामीणता:साहित्य आणि वास्तव,पाणभवरे,मराठी लघुनिबंधाचा इतिहास,साहित्याची निर्मिती प्रक्रिया, स्पर्शकमळे इ.

आत्मचरित्रात्मक –  काचवेल , घरभिंती,झोंबी,नांगरणी.

बालसाहित्य –  उगवती मने,रानमेवा,सैनिक हो तुमच्यासाठी.इ.

आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस अभिवादन! ?

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments