सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २७ मे – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री  बाळाजी जोशी (27 जानेवारी 1901 – 27 मे 1994) हे थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, पुरोगामी विचारांचे प्रकांड पंडित, सृजनशील साहित्यिक व चिकित्सक तत्त्वज्ञ होते.

प्रथम वडिलांकडून व नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत त्यांनी अध्ययन केले. पुढील अध्ययनासाठी ते वाराणसीला गेले.कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली.

भारताच्या स्वातंत्र्यआंदोलनात, सन 1930-32च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला.

मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या ‘रॅडिकल डेमोक्रॅटिक’ पक्षाचे ते क्रियाशील सदस्य होते.

अनेक सामाजिक व धार्मिक सुधारणांना धर्मशास्त्रांचा आधार असल्याचे दाखवून आपल्या अभ्यासाचा उपयोग त्यांनी परिवर्तनवादी शक्तींना पाठबळ मिळवून देण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी शंकराचार्य व इतर सनातनी मंडळींचा रोष ओढवून घेतला.

तर्कतीर्थांनी विपुल लेखन केले आहे. त्यापैकी महत्त्वाचे काही ग्रंथ : ‘शुद्धिसर्वस्वम’, ‘आनंदमीमांसा’, ‘हिंदू धर्माची समीक्षा’, ‘जडवाद’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा’ व ‘रससिद्धांत’ इत्यादी.

वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे करण्यात आलेल्या धर्मकोशाचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले.

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. सुमारे एक हजार पृष्ठांचा एक, असे चौदा खंड त्यांच्या संपादकत्वाखाली तयार झाले. यावरून त्यांच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट होते.

 महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष या पदावरही त्यांनी बरीच वर्षे काम केले.

1954मध्ये दिल्लीला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.

1973 मध्ये राष्ट्रपतींनी त्यांना ‘राष्ट्रीय संस्कृत पंडित’ ही पदवी दिली . मुंबई विद्यापीठाने त्यांना ‘एलएल.डी.’ ही पदवी दिली. भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.

☆☆☆☆☆

रा. ग. जाधव

रावसाहेब गणपतराव जाधव (24 ऑगस्ट 1932 – 27 मे 2016) हे वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी व समीक्षक होते.

पुणे विद्यापीठातून एम.ए.झाल्यावर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावतीचे विदर्भ महाविद्यालय, औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे त्यांनी 11 वर्षे मराठीचे अध्यापन केले. त्यापूर्वी ते एस.टी. मध्ये 10 वर्षे कार्यरत होते.

नंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पात दोन दशके काम करून जाधव यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. 2000ते 2002 या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक व मराठी विश्वकोश निर्मिती  मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी कोशाच्या सतराव्या खंडापर्यंत काम केले. या खंडांतून त्यांनी साहित्यविषयक महत्त्वाचे लेखही लिहिले. त्याचप्रमाणे विश्वकोश आकर्षक होण्यासाठी त्यातील लेखांसोबत चित्रे लावण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.

ग. प्र. प्रधान यांच्यासमवेत जाधव यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांत संपादन केले.

‘निळी पहाट’, ‘ निळी क्षितिजे’ व ‘निळे पाणी’ या जाधवांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे  मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले. केवळ विद्रोहाचा डांगोरा पिटण्यापेक्षा विद्रोह समजून घेऊन त्याच्या पलीकडची दिशा पाहावी, असे त्यांचे म्हणणे होते.

याशिवाय जाधवांची ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘आनंदाचा डोह’, ‘कला, साहित्य व संस्कृती’, ‘बापू’ (गांधीजींवरील 91 कवितांचा संग्रह), ‘कविता आणि रसिकता’, ‘काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे’, ‘ खेळीमेळी'(ललित), ‘निवडक समीक्षा’, ‘वाङ्मयीन प्रवृत्ती आणि प्रमेये ‘ वगैरे अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मराठी विश्वकोश व ‘साधना’चे खंड याव्यतिरिक्त जाधवांनी ‘आधुनिक मराठी कवयित्रींची कविता'(1980 ते 1995 या काळातील), ‘ निवडक साने गुरुजी’, तसेच मराठी साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचेही संपादन केले.

‘निवडक समीक्षा’ या जाधवांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्कार मिळाला.

औरंगाबाद येथील 2004 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने विंदा करंदीकर यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

☆☆☆☆☆

प्रल्हाद नरहर देशपांडे

डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे (17सप्टेंबर 1936 – 27 मे 2007)हे लेखक, संपादक व इतिहास संशोधक होते.

पदवी व पदव्युत्तर शिक्षण औरंगाबादला पूर्ण करून तिथेच ते केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागात सर्वेक्षक म्हणून रुजू झाले. त्यावेळी देवगिरी (दौलताबाद) या किल्ल्याचे सर्वेक्षण करताना ऐतिहासिक दृष्टिकोनातून किल्ल्यांचा अभ्यास कसा करावा, याचा वस्तुपाठ त्यांना मिळाला. पुढे जाऊन ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर डॉ. अ. रा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी मिळवली.

नंतर ते धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात इतिहासाचे व्याख्याते म्हणून रुजू झाले.

त्या दरम्यानच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या मुख्य चिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली.मंडळातील ऐतिहासिक दस्तऐवज व इतर सामग्रीची जपणूक करणे, त्यात भर घालणे, त्यासाठी संग्रहालय उभे करणे, खानदेशातील ऐतिहासिक, पुरातात्त्विक सर्वेक्षण करणे,’थाळनेर’सारख्या ठिकाणी उत्खनन करणे, मंडळात येणाऱ्या  संशोधकांना मदत व मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी मनोभावे केली.

‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’ व  ‘109 कलमी बखर’ हे दोन्ही ग्रंथ त्यांनी प्रस्तावनेसह संपादून प्रसिद्ध केले. राजगड व रायगड या छत्रपतींच्या दोन राजधान्यांवर स्वतंत्रपणे लिहिलेल्या पुस्तिका, ‘महाराष्ट्र संस्कृती – जडणघडण, मराठ्यांचा उदय व उत्कर्ष’ हे क्रमिक पुस्तक तसेच अनेक इतिहासविषयक संशोधन लेख त्यांच्या नावावर आहेत.

स. मा.गर्गे यांच्या मराठी रियासतीच्या पहिल्या खंडाच्या संपादनास त्यांनी हातभार लावला.

राजवाडे मंडळाच्या ‘संशोधक’ या त्रैमासिकाचे त्यांनी 25 वर्षे संपादन केले.

राजवाडे संपादित ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ या दुर्मिळ झालेल्या मालिकेचे त्यांनी पुनःसंपादन केले.

 डॉ. देशपांडे हे उत्तम संस्थापकही होते. ‘अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद’, ‘खानदेश इतिहास परिषद’ इत्यादी संस्थांच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कक्षेतील कागदपत्रे गोळा करणे, त्यांच्या आधारे शोधनिबंध लिहिणे यासाठी खानदेशातील तरुण संशोधकांना त्यामुळे प्रेरणा मिळाली.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, तंजावर पेपर्स कमिटी, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन, नवी दिल्ली इत्यादी मंडळावर त्यांची नियुक्ती झाली होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी मिळवली.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. ग.जाधव व प्रल्हाद नरहर देशपांडे यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या तिघांनाही आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी,  विवेक  महाराष्ट्र नायक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments