सुश्री मंजुषा सुनीत मुळे
२८ ऑक्टोबर – संपादकीय
आज २८ ऑक्टोबर — सुप्रसिद्ध कवी गिरीश म्हणजे श्री. शंकर केशव कानेटकर, यांचा जन्मदिन. ( २८/१०/१८९३ – ४/१२/१९७३ )
१९२० च्या दशकात पुण्यातील काही समविचारी कवींनी ,कविता लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या “ रविकिरण मंडळाचे “ कवी गिरीश हे अगदी स्थापनेपासूनच एक प्रमुख सदस्य होते. मुधोजी हायस्कुल, फलटण इथे प्राचार्य म्हणून कार्यरत असतांना, त्याच काळात त्यांनी अनेक कविता लिहिल्या. बालकवी आणि गोविंदाग्रज या त्यावेळच्या दोन प्रसिद्ध कवींकडून त्यांनी काव्यरचनेची स्फूर्ती घेतली असे जरी म्हटले जात असले, तरी कवी गिरीश यांची काव्यरचना स्वतंत्र होती. कवितेत विविध वृत्तांचा उपयोग, रेखीव काव्यरचना, वळणदार घोटीव अक्षर, ही त्यांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये होती. कांचनगंगा, चंद्रलेखा, फलभार, बालगीत, आणि, सोनेरी चांदणे, असे त्यांचे ५ काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. याव्यतिरिक्त त्यांची समृद्ध काव्यसंपदा पुढीलप्रमाणे आहे—- चार स्वरचित खंडकाव्ये, प्रसिद्ध पाश्चात्य कवी टेनिसन यांच्या “इनॉक आर्डेन” या दीर्घकाव्याचा “ अनिकेत “ या नावाने काव्यानुवाद, कवी यशवंत आणि कवी गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे “ वीणा झंकार,” आणि “ यशोगौरी “ हे दोन काव्यसंग्रह.
“मनोरंजन” या तेव्हाच्या प्रसिद्ध मासिकात क्रमशः प्रसिद्ध झालेले “ अभागी कमल “ हे त्यांचे सामाजिक विषयावरील खंडकाव्य तेव्हा वाचकांना खूपच आवडले होते. या खंडकाव्यापासूनच सामाजिक खंडकाव्याची सुरुवात झाली असे यथार्थपणे म्हणता येईल. याबरोबरच त्यांनी “ कला “ हे एक खंडात्मक दीर्घकाव्य, आणि “ आंबराई “ हे ग्रामीण जीवनावरील खंडकाव्यही लिहिले.
“पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा,
कुणा गरीबाचा तळमळे बिचारा”
—-अशासारखी त्यांची हृदयाला भिडणारी कविता आम्ही शाळेत असतांना शिकलेली आहे.
त्यांच्या अनेक स्फुट कविताही प्रसिद्ध झालेल्या होत्या.
कवी माधव ज्युलियन यांचे चरित्र, रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या “ ख्रिस्तायन ” या गाजलेल्या पुस्तकाचे पुन्हा संपादन, माधव ज्युलियन यांच्या “ स्वप्नलहरी “ पुस्तकाचे संपादन, अशा इतर कामांचे श्रेयही कवी गिरीश यांचेच आहे.
फलटणप्रमाणेच पुणे आणि सांगली इथेही ते शिक्षक-प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, आणि शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल १९५९ साली “राष्ट्रपती-पदक” देऊन त्यांचा गौरव केला गेला होता, हे आवर्जून सांगायला हवे.
आजचे सुप्रसिद्ध नाटककार श्री. वसंत कानेटकर, आणि गायक मधुसूदन कानेटकर हे कवी गिरीश यांचे सुपुत्रही त्यांच्यासारखेच सुकीर्त झालेले आहेत, हे रसिकांना ज्ञात असेलच.
कविवर्य गिरीश यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र प्रणाम.
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग.
संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈