श्री सुहास रघुनाथ पंडित

? २९ डिसेम्बर –  संपादकीय  ?

मंगेश पाडगावकर:

झोपाळ्यावाचून झुलत झुलत ज्यांनी या जन्मावर शतदा प्रेम केले, ज्यांच्या दारात पहाटे पहाटे केशराचे मोर झुलत असतात आणि ज्यांच्या रात्री चांदण्याचे सुरेल गाणे गात येत असतात, आपल्या लाख चुकांची कबुली देऊनही मनातल्या मोरपिसांची शपथ घालत ते केली पण प्रीती हे ही मनापासून  जाहीर  करतात, शब्दांवाचूनही ज्यांना शब्दांच्या पलिकडलं कळलेलं असतं पण तरी शब्द शब्द जपून वेच असं जे सांगून जातात, अवघ्या जीवनाचे गाणे करून हासत जावे जाताना असा संदेश सहजपणे जे देतात ते कवीवर्य मंगेश पाडगावकर !त्यांचा आज स्मृतीदिन. पण आज स्मृतीदिन असे तरी कसे म्हणावे? कारण त्यांच्या शब्दांची पाखरं रोजच आपल्या आजुबाजूला स्मृती ठेवून जात असतात. त्यांमुळे प्रत्येक दिवस हा त्यांचा स्मृतीदिनच असतो.

सुमारे साठ वर्षे साहित्याची सेवा करणारे मंगेश पाडगावकर हे मूळचे सिंधू दुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे. कोकणातील निसर्ग बालमनाने टिपला आणि नंतर काव्यात उतरला. त्यांनी मुंबई विद्यापीठात मराठी व संस्कृत या विषयात एम्.  ए.  पूर्ण केले. काही काळ रूईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र त्यांचे लेखन कार्य अखंडपणे चालू होते.  

प्रामुख्याने काव्यनिर्मिती केली असली तरी त्यांनी साहित्याचा अनुवादही विपुल प्रमाणात केला आहे. 1957 साली त्यांनी थाॅमस पेनचे राजनैतिक संबंध हा  निबंध अनुवादित केला. 2009 मध्ये बायबल चा अनुवाद केला. कमला सुब्रह्मण्यम यांच्याा  मूळ इंग्रजी ग्रंथाचा कथारूप महाभारत या नावाने दोन खंडांत अनुवाद केला  आहे. याशिवाय मीरा, कबीर, सूरदास या संत कवींच्या निवडक पदांचाही अनुवाद ही केला आहे. या व्यतिरिक्त विविध विषयांवरील 25   पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला आहे.

मराठी साहित्यात कविता हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्यांचे काही कविता संग्रह असे: आनंदॠतू, आनंदाचे डोही, उदासबोध उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसांसाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी, चांदोमामा, चोरी, जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, तृणपर्वे , त्रिवेणी, धारानृत्य, बोलगाणी, भोलानाथ, भटके पक्षी, सलाम, क्षणिका इत्यादी… त्यांची अनेक काव्ये लयबद्ध, गेय असल्याने त्यांची गीते झाली. शिवाय अनेक भावगीतेही त्यांनी लिहीली आहेत.

त्यांच्या साहित्य सेवेचा  वेळोवेळी गौरवही झाला आहे. 2010 साली झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे व विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . सलाम या त्यांच्या कविता संग्रहास 1980 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2008  साली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. 2013 साली म. सा. प. चा सन्मान व त्याच वर्षी पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.

मुंबईतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांच्या नावाने भाषासंवर्धन पुरस्कारही दिला जातो.

“आयुष्य हे विध्यात्याच्या वहीतलं पान असतं

 रिकामं तर रिकामं , लिहीलं तर छान असतं”  

पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या राहिलेल्या पानावर काहीतरी छान लिहीत जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते.

☆☆☆☆☆

द. पं. जोशी:

द. पं. जोशी हे मूळचे परभणीचे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबादला गेले. तेथे एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यासू वृत्ती, कुशाग्र बुद्धी, इतिहास व पूर्वसूरींबद्दल प्रेम यामुळे हैद्राबादेत ते सार्वजनिक कामात गुंतले. अनेक सार्वजनिक संस्था, मराठी साहित्य परिषद व मराठी महाविद्यालयांशी त्यांचा संबंध आला. 1959 ते 1992 या कालावधीत त्यांनी विवेक वर्धिनी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

त्यांचे स्वतंत्र, संपादित व अनुवादीत असे एकूण 15 ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध नियतकालिकांमधून 100 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. शिवाय उर्दू व हिंदी भाषेतील अनेक कथा, लेख यांचा मराठीत अनुवाद त्यानी केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते दोनदा उपाध्यक्ष होते. 1998 साली भरलेल्या परभणीचे जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य परिषद, हैदराबाद या संस्थेचे ते 30 वर्षे कार्यवाह व 8 वर्षे अध्यक्ष होते. या संस्थेच्या पंचधारा या त्रैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले होते.

आज त्यांचा स्मृतीदिन! अमराठी प्रदेशात मराठीची सेवा करणा-या द. पं. जोशी याना अभिवादन.

☆☆☆☆☆

 श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया, तुझे गीत गाण्यासाठी

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments