श्रीमती उज्ज्वला केळकर
२९ नोव्हेंबर – संपादकीय
गोपीनाथ तळवलकर (२९ नोहेंबर १९०७ ते ७ जून २००० )
आकाशवाणीच्या बालोद्यान कार्यक्रमातील मुलांचे लाडके नाना म्हणजे, गोपीनाथ तळवलकर . ते पुणे केंद्रावर बालविभागाचे प्रमुख होते. बालोद्यान कार्यक्रम दर रविवारी सकाळी १० वाजता बाळ- गोपाळांच्या गच्च उपस्थितीत सादर होई. अतिशय बालप्रिय आणि लोकप्रिय असा हा कार्यक्रम होता.
मुलांसाठी वा.गो. आपटे यांनी ‘आनंद मासिक काढले होते. गोपीनाथ तळवलकर त्याचे ३५ वर्षं संपादक होते.
त्यांची काही पुस्तके – आकाश मंदीर, छाया प्रकाश, आशियाचे धर्मदीप, चंदाराणी, निंबोणीच्या झाडाखाली (बलवाङ्मय) सहस्त्रधारा ( आत्मचरित्र) त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच सौम्य, ऋजु आहे. त्यात आत्मगौरव, आत्मसमर्थन, अहंकार याचा लावलेशही नाही.
माणूस पाक्षिक सुरू झाल्यावर त्यामध्ये प्रसिद्ध होणार्या कवितांसोबत त्यांचा आस्वाद दिला जाई. ते पान गोपीनाथ तळवलकर लिहीत.
आज त्यांच्या जन्मदिंनानिमित्त त्यांना मन:पूर्वक अभिवादन.
☆☆☆☆☆
माधव ज्युलियन – ( २१ जानेवारी १८९४ – २९ नोहेंबर १९३९)
माधव ज्युलियन हे मराठीतले प्रतिभा संपन्न कवी. त्यांचे नाव माधव त्र्यंबक पटवर्धन. रविकिरण मंडळाची स्थापना त्यांनी केली. या मंडळाबद्दल अत्रे एकदा म्हणाले होते, या मंडळात रवी एकच आहे. बाकी सगळी किरणे आहेत. तो रवी म्हणजे माधव ज्युलियन.
माधव ज्युलियन यांनी शिक्षणानंतर फर्ग्युसन इथे १९१८ ते १९२४ फारसी भाषा शिकवत. मुंबई विद्यापीठात मराठी साहित्यात डी. लिट. पदवी मिळवलेले ते पहिले साहित्यिक. ‘छंदोरचना’ या ग्रंथासाठी त्यांना १ डिसेंबर १९३८ मधे माधव ज्युलियन डी. लिट. मिळाली.
माधवराव पटवर्धन यांनी ज्युलियन नाव का घेतले, याबद्दल अनेक दंतकथा आहेत.
त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. कवितांव्यतिरिक्त त्यांनी भाषाशास्त्रीय लिखाणही केले आहे. ‘भाषाशुद्धीविवेक’ या त्यांच्या ग्रंथात, कालबाह्य झालेल्या मराठी भाषेतल्या शेकडो शब्दांची सूची दिलेली आहेत. काव्यचिकित्सा व काव्याविहार आशी आणखी दोन पुस्तके काव्याची चिकित्सा करणारी आहे. याशिवाय त्यांची आणखी पुस्तके –
- उमरखय्यामच्या रुबाया – १९२९ – अनुवादीत २. तुटलेले दिवे ( यात एक सुनितांची मालाहे दीर्घ काव्य आणि अनेक स्फुट कविता आहेत. ) ३. नकुलालंकार – १९२९ –. दीर्घकाव्य ४. विरहतरंग – खंडकाव्य ५. मधुलहरी हे रुबायांच्या अनुवादाचे दुसरे पुस्तक त्यांच्या निधनानंतर रुबायांच्या अनुवादाचा तिसरा संग्रह निघाला.
त्यांचे २९ नोहेंबर १९३९ ला निधन झाले. त्यांच्या निधंनांनंतर त्यांच्यावर ३ चरित्र ग्रंथ प्रकाशित झाले. १. स्वप्नभूमी माधव ज्युलियन- शंकर. के. कानिटकर ( कवी गिरीष), २. डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन ३. माधव ज्युलियन- गं. दे. खानोलकर
त्यांच्या पत्नी लीलाताईंनीही ‘आमची ११ वर्षे या पुस्तकात त्यांच्या सहजीवनाच्या आठवणी दिल्या आहेत.
त्यांच्या कवितांपैकी त्यांच्या गाजलेल्या कविता म्हणजे- प्रेमस्वरूप आई , मराठी असे आमुची मायबोली.
☆☆☆☆☆
रियासतकार सरदेसाई – (१७ मे १८६५ – २९नोहेंबर १९५९)
रियासतकार सरदेसाई यांचं नाव गोविंद सखाराम सरदेसाई . यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कमशेत इथे झाला. ते मराठी इतिहासकार व लेखक होते. त्यांनी मराठी साम्राज्याचा इतिहास, ‘मराठी रियासत’ या नावाने ८ खंडात लिहिला आहे. ‘मुसलमानी रियासत’ ३ खंडात मांडली आहे व ब्रिटीश रियासत २ खंडात. यातून महाराष्ट्राचा सुमारे १००० वर्षांचा इतिहास लिहिला आहे. भारतीय केंद्रशासनाने इतिहासविषयक साहित्याच्या योगदानासाठी त्यांना १९५५ मधे पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे.
रियासतकर सरदेसाई आणि माधव ज्युलियन यांचा आज स्मृतिदिन. या निमित्त या दोघांनाही मानाचा मुजरा.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : १.शिक्षण मंडळ कर्हाड: शताब्दी दैनंदिनी २. माहिती स्त्रोत – इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈