सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वासुदेव विष्णू मिराशी
महामहोपाध्याय वासुदेव विष्णू मिराशी (13 मार्च 1893 -3 एप्रिल 1985) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक व भारतविद्यातज्ञ होते.
त्यांनी एमएपर्यंत प्रथम वर्ग पटकावला. पुढे त्यांनी एलएलबीही केले.
त्यांनी वेगवेगळ्या कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ ते नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर मानव्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. नागपूरमधील ‘विदर्भ संशोधन मंडळा’च्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या माध्यमातून त्यांनी इंग्रजीतील संशोधन मराठीत लिहून ते विदर्भ संशोधन मंडळाच्या नियतकालिकातून प्रकाशित केले.
प्राचीन शिलालेख, नाणी आणि अभिजात प्राचीन संस्कृत साहित्य ही त्यांची प्रमुख कार्यक्षेत्रे. त्यांचा अभ्यास करून त्यांनी 1934मध्ये मांडलेल्या रामटेक म्हणजे मेघदूतातील रामगिरी ह्या सिद्धांताला 1980 साली वाकाटककालीन मंदिरात सापडलेला शिलालेख पूरक ठरला. अजिंठ्याच्या लेणे क्र.16 येथील वाकाटक लेखाचे वाचन करून त्यांनी वाकाटक वंशावळ निश्चित केली. त्यांच्या प्रदीर्घ, सखोल संशोधनाचा गौरव म्हणून त्यांना ‘वाकाटकांच्या इतिहासाचे अधिकारी’ म्हणण्यात येते.
अकोल्यातील नाणेनिधीचा अभ्यास करून त्यांनी तोपर्यंतच्या साहित्यात उल्लेख नसलेल्या तीन नवीन सातवाहन राजांचा शोध लावला.
‘कॉर्पस इन्स्क्रिप्शनम इंडिकॅरम’ या ग्रंथमालेचे मिराशी हे पहिले भारतीय संपादक होते. त्या नियतकालिकेतील परंपरेतूनच त्यांनी ‘कलचुरी नृपती आणि त्यांचा काल ‘ इत्यादी प्राचीन राजवंशावरील अनेक ग्रंथ लिहिले.
त्यांनी प्रारंभी मराठीतून व नंतर इंग्रजीतून ग्रंथलेखन केले. त्यांचे सुमारे 38 ग्रंथ व चारशेहून अधिक संशोधनात्मक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या अनेक ग्रंथांची हिंदी, ओडिया, कन्नड वगैरे प्रादेशिक भाषांतून भाषांतरे झाली आहेत.
मिराशी यांना अनेक शिष्यवृत्त्या, पारितोषिके मिळाली. सागर, नागपूर, मुंबई, वाराणशी या विद्यापीठांची सन्माननीय डी. लिट. पदवी, तत्कालीन ब्रिटिश सरकारची ‘महामहोपाध्याय’ ही उपाधी, राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद (1956) व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन (1961) यांच्या हस्ते ताम्रपट, व भारत सरकारतर्फे पद्मभूषण (1975) इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले.
☆☆☆☆☆
उद्धव शेळके
उद्धव ज. शेळके (8 ऑक्टोबर 1930 – 3एप्रिल 1992)हे कादंबरीकार होते. ते अमरावती जिल्ह्यातील होते.
वैदर्भीय ग्रामीण जीवनाचं आणि विविध जातीधर्मातल्या स्त्रियांचं व उपेक्षितांचं प्रत्ययकारी चित्रण हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य होतं.
‘शिळान’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह.
ग्रामीण जीवनावरील ‘धग’, वारांगनांच्या आयुष्यावरील वैदर्भीय बोलीभाषेचा वापर असलेली ‘डाळींबाचे दाणे ‘, तसंच ‘धुंदी’, ‘पुरुष’, ‘नांदतं घर’, ‘गोल्डन व्हिला’, ‘निर्माता’ वगैरे अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.
काही काळ शेळकेनी ‘वैशिष्ट्य’ हे मासिक चालवलं.1971 पासून 5वर्षं ते पाठ्यपुस्तक मंडळाच्या ‘किशोर’या लोकप्रिय मासिकाचे संपादक होते.
‘धग’ या कादंबरीसाठी त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तिचं ‘मैलाचा दगड’ असं कौतुक केलं गेलं.
म. म. वासुदेव विष्णू मिराशी व उद्धव ज.शेळके यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, मराठी विश्वकोष,
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈