सुश्री मंजुषा सुनीत मुळे
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) …
लेखिका , प्राध्यापिका आणि समीक्षिका म्हणून ख्यातनाम असलेल्या श्रीमती सरोजिनी वैद्य यांचा आज स्मृतीदिन . ( १६/६/१९३३ — ३/८/२००७ )
ललित लेखन, चरित्रलेखन, आणि समीक्षा, हे साहित्यप्रकार अधिकतर हाताळणाऱ्या सरोजिनीताई यांनी आधी स. प. कॉलेज, पुणे इथे, पुढे रुईया कॉलेज, मुंबई इथे आणि नंतर मुंबई विद्यापीठात अध्यापक, अधिव्याख्याता, आणि मराठी विभाग-प्रमुख म्हणून एकूण ३७ वर्षे मराठी अध्यापनाचे काम केले. निवृत्तीनंतर महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या संस्थापक व संचालक म्हणून या संस्थेची त्यांनी पायाभरणी केली. त्याचबरोबर शासकीय आणि खाजगी स्तरावरही अनेक संस्थांना मार्गदर्शन केले.
त्यांनी केलेले आणखी एक महत्वाचे काम म्हणजे, अमराठी मंडळींसाठी मराठी शिक्षणक्रम बनवून,अशांना नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या पदविकेची आणि प्रमाणपत्रांची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर कोशवाङमय सूची, चरित्र माहिती, परिभाषा कोश, अशा मूलगामी योजना आखण्याचे, आणि त्या यशस्वीपणे पूर्ण करण्याचे कामही त्यांनी केले. मराठी भाषेच्या व एकूणच वाङमयाच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अथक परिश्रम केले.
एकीकडे त्यांची स्वतःची साहित्य संपदाही वाढतच होती. त्यांच्या प्रकाशित साहित्यापैकी काही निवडक साहित्य असे —
पहाटगाणी — पहिलं ललित लेख संग्रह
टी.एस. ईलीयट आणि नवीन मराठी कविता — समीक्षा
जीवनलेखन —- नाटक
आठवणी काळाच्या आणि माणसांच्या
कहाणी लंडनच्या आजीबाईंची
नानासाहेब फाटक – व्यक्ती आणि कला
संक्रमण —- वैचारिक
समग्र दिवाकर — नाट्यछटाकार दिवाकर यांचे अप्रकाशित लेखन
माती आणि मूर्ती — समीक्षा
रमाबाई रानडे – व्यक्ती आणि कार्य
वाङमयीन महत्ता
गोपाल हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
“ ज्ञानदेवी “ या ग्रंथाचे संपादन आणि लेखन– हे त्यांचे खूप मौलिक काम समजले जाते. याच्या तीन खंडांचे संपादन हा त्यांच्या विद्वततेचा, मौलिक विचारांचा आणि सहृदयतेचा परिपाक असल्याचे गौरवाने म्हटले जाते.
त्यांच्या अनेक ग्रंथांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच इतरही पुरस्कार असे —
भारतीय शिक्षण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, शैक्षणिक कार्यासाठी ‘ सत्यशोधक पुरस्कार ‘, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे तर्फे पुरस्कार, सु.ल.गद्रे पुरस्कार, जांभेकर पुरस्कार, नगर वाचन मंदिर पुरस्कार, दादर वनिता समाजाचा जीवनगौरव पुरस्कार . बडोदा वाङमय परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
चरित्र वाङमयाला वेगळे कसदार वळण देणाऱ्या , सतत ‘ वाङमयसेवक ‘ याच भूमिकेतून काम करत राहिलेल्या , आणि ज्यांना “ वाग्विलासिनी “ असे आदराने संबोधले जात असे , अशा सरोजिनी वैद्य यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈