सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

 १९ व्या शतकातले प्रसिद्ध भाषांतरकार व कवी रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचा आज स्मृतिदिन. 

( ९/१/१८५४–४/६/१९१८ ). 

काही वर्षें मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून, आणि नंतर सरकारी न्यायालयात मुन्सफ म्हणून कार्यरत असणारे   

रावसाहेब कानिटकर हे उत्तम अनुवादक आणि कवी तर होतेच, आणि त्याचबरोबर चित्रकला आणि संगीत या कलांचेही ज्ञाते होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

त्यांची अनुवादित पुस्तके अशी—-

मॅक्समुल्लर यांच्या “ Origin and growth of religion “ या पुस्तकाचा मराठी अनुवाद – सन १८८३. 

शेक्सपिअरच्या “ हॅम्लेट “ या प्रसिद्ध नाटकाचा – “ वीरसेन “ किंवा “ विचित्रपुरीचा राजपुत्र “ या नावाने अनुवाद – सन १८८३. 

शेक्सपिअरच्याच -“ टाईमन ऑफ अथेन्स “ , “ कोरिओलेनस “ , आणि “ मर्चंट ऑफ व्हेनिस “ या नाटकांचेही मराठी अनुवाद . 

जॉन स्टुअर्ट मिलच्या “ Subjection of women “ या पुस्तकाचा -” स्त्रियांची परवशता  “ या नावाने अनुवाद –

 सन १९०२ . 

“ गीतांजली “– हा रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद – सन १९१३ – “ अनुवादाचा आदर्श नमुना “ अशी या पुस्तकाची ओळख सांगितली जात असे. 

त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना —

“ श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध “ हे दीर्घकाव्य – सन १८७८.  

“ अकबर बादशहा “ – दीर्घकाव्य – सन १८७९. 

“ संमोहलहरी “ – दीर्घकाव्य – सन १९००.

“ कविकूजन “ हा स्फुट कवितांचा संग्रह, जो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी १९३३ साली प्रकाशित केला. या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी श्री. कानिटकर यांचे अल्पचरित्र प्रसिद्ध केलेले आहे . 

रावसाहेब गोविंद वा. कानिटकर यांना विनम्र आदरांजली.   

☆☆☆☆☆

आचार्य धर्मानंद कोसंबी

“ The prominant Indian buddhist scholar “ अशीच ज्यांची ओळख होती, असे आचार्य धर्मानंद कोसंबी यांचाही आज स्मृतिदिन. (९/१०/१८७६ – ४/६/१९४७). गोव्यातील सांखवल या खेड्यातल्या एका सनातनी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच ज्ञानग्रहणाची उत्कट आस असणाऱ्या कोसंबी यांनी त्यासाठी घर सोडून जाण्याचा प्रयत्नही अनेकदा केला होता. आणि पुढेही याच हेतूने खूप भ्रमंतीही केली होती. बौद्ध धर्माचा अभ्यास आणि संस्कृत आणि पाली या दोन भाषांमध्ये प्राविण्य मिळवण्याचा ध्यास ही तेव्हा त्यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली होती. पुढे पाली भाषेतून बुद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी ते नेपाळला गेले होते. पण या धर्माची तिथली निराशाजनक स्थिती पाहून तिथून ते आधी कलकत्त्याला आणि मग सिलोन ( श्रीलंका ) इथे गेले. तिथल्या विद्योदय विद्यापीठात त्यांनी या विषयाचे रीतसर शिक्षण घेतले, आणि १९०२ साली बौद्धभिक्षू म्हणून त्यांना दीक्षा देण्यात आली. तिथून बर्मा इथे जाऊन त्यांनी बौद्ध धर्माविषयीच्या ब्रह्मी भाषेतल्या पुस्तकांचा तौलनिक अभ्यास केला. सात वर्षांनी भारतात परत आल्यावर कलकत्ता, बडोदा, आणि पूर्ण पश्चिम भारतात त्यांनी या विषयावर अनेक व्याख्याने दिली. अध्यापनही केले. शेवटी ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये रुजू झाले. हार्वर्ड विद्यापीठातले डॉ. जेम्स वूड हे तेव्हा संस्कृत, अर्धमागधी आणि पाली या विषयातील तज्ञाच्या शोधातच होते. त्यांच्या आमंत्रणावरून श्री. कोसंबी हार्वर्डला गेले. तिथेच त्यांनी लिहिलेले  “ विशुद्धीमग्ग “ हे बौद्ध तत्वज्ञानावरचे पुस्तक नंतर फार गाजले. तिथे ते रशियन भाषाही शिकले . त्याबरोबर मार्क्सवाद जाणून घेण्यातही त्यांना फार रुची वाटत होती. १९२९ साली ते रशियाला गेले. लेनिनग्राड विद्यापीठात पाली भाषा शिकवण्याचे कामही त्यांनी केले. भारतात स्वातंत्र्य चळवळ सुरु झाल्यावर ते भारतात परतले. एकीकडे गुजरात विद्यापीठात विनावेतन अध्यापन करत, त्यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी स्वयंसेवक गोळा करण्यास सुरुवात केली. या सत्याग्रहासाठी त्यांनी सहा वर्षे तुरुंगवास भोगला. पण बौद्धधर्माचा मूलगामी शोध घेणे मात्र त्यांनी थांबवले नाही. नंतरच्या काळात त्यांनी मुंबईत अनेक बहुजन-विहारांची स्थापना करून बौद्ध भिक्षूंच्या राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. गोवा मुक्ती संग्रामासाठी ते फार आग्रही होते. आमरण उपोषण करत असतांना त्यांचा मृत्यू झाला. 

आचार्य कोसंबी यांचे प्रकाशित साहित्य —-

१. “ जातककथा “ — मराठीत लिहिलेल्या बुद्धकथा — याचे अनेक भाग आहेत. 

२. “ निवेदन “ हे आत्मचरित्र 

३. “ भगवान बुद्ध “ हा बुद्ध-चरित्रात्मक ग्रंथ –  अनेक भाषांमध्ये याचा अनुवाद झालेला आहे. 

४. “ बोधिसत्व “ हे मराठी नाटक. 

५. “ विसुद्धिमग्ग “ हा पाली भाषेतील ग्रंथ . 

–दोन हजार वर्षांपेक्षाही जास्त काळ अर्ध्या जगात प्रचलित असणाऱ्या विवेकवादी बौद्धधर्माला, नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असा नवा पाया पुन्हा रचून देण्याचे मोठेच काम करणाऱ्या आचार्य कोसंबी यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया, महाराष्ट्र टाईम्स.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments