सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० एप्रिल -संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
मोरो केशव दामले
मोरो केशव दामले (7 नोव्हेंबर 1868 – 30 एप्रिल 1913) हे मराठी व्याकरणकार व निबंधकार होते.
कवी केशवसुत हे त्यांचे थोरले भाऊ व पत्रकार सीताराम केशव दामले हे त्यांचे धाकटे भाऊ.
इतिहास व तत्त्वज्ञान घेऊन ते मुंबई विश्वविद्यालयातून एम. ए. झाले. त्यासाठी त्यांना डेक्कन महाविद्यालयाची दक्षिणा फेलोशिप मिळाली होती.
त्यांनी उज्जैनच्या माधव कॉलेजात लॉजिक व फिलॉसॉफी या विषयांचे अध्यापन केले. नंतर नागपूर येथील सिटी स्कूल वरील सरकारी पद स्वीकारले.
मोरो नामवंत व्याकरणकार होते.त्यांनी असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले. शिवाय व्याकरणविषयक प्रश्नांची इतर अंगेही त्यांनी समोर आणली. विविध उपपत्ती संकलित करून त्यांनी त्यांची चिकित्साही केली. व्याकरणावर पीएच. डी. करणाऱ्यांसाठी त्यांचा ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा आजही मोलाचा ग्रंथ आहे.
1904मध्ये भरलेल्या शुद्धलेखन परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. त्यासंबंधीची सडेतोड मते त्यांनी ‘शुद्धलेखन सुधारणा अथवा सरकारी बंडावा ‘ या पुस्तकाद्वारे प्रसिद्ध केली. याशिवाय त्यांनी ‘विचारभ्रमण आणि आधुनिक असंतोष’ हे एडमंड बर्कच्या ‘प्रेझेंट डिसकन्टेन्ट’चं मराठी भाषांतर केलं.’न्यायशास्त्र निगमन’ व ‘न्यायशास्त्र निगमन -दुसरे पुस्तक ही त्यांची तर्कशास्त्रावरील पुस्तके.
☆☆☆☆☆
वसंत पोतदार
वसंत गोविंद पोतदार (6 सप्टेंबर 1937 – 30 एप्रिल 2003) हे लेखक, पत्रकार व अभिनेते होते.
त्यांनी हिंदी, मराठी व बंगाली भाषेत पत्रकारिता केली. तर त्यांचे एकपात्री प्रयोग मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू व इंग्रजीत होते.
बी. ए. झाल्यावर त्यांनी अध्यापकाची नोकरी धरली.
नंतर पु. लं.च्या मार्गदर्शनावरून त्यांनी ‘वंदे मातरम’ या भारतीय क्रांतीच्या महाभारताचे 5000हूनही जास्त प्रयोग केले. याशिवाय त्यांनी ‘शेर शिवराज’, ‘आक्रंदन एका आत्म्याचे ‘, ‘महात्मा फुले’, ‘योद्धा संन्यासी’ हेही एकपात्री प्रयोग केले.
पोतदारांनी स्वामी विवेकानंदांवरील ‘योद्धा संन्यासी’, पु. लं. वरील ‘एका पुरुषोत्तमाची गाथा’, गाडगे महाराजांवरील ‘ तोची साधू ओळखावा’, ‘अग्निपुत्र’, ‘नाळ’, ‘अनिल विश्वास ते राहुल देव बर्मन’, ‘कुमार गंधर्व’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.
‘वसंत पोतदार -एक असाधारण गद्य शिल्पी’ हे पोतदारांवर विजय बहादुर सिंह यांनी लिहिलेले हिंदी पुस्तकही प्रसिद्ध आहे.
पोतदारांच्या ‘नाळ’ला मसापचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘योद्धा संन्यासी’ला मुंबई ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार मिळाला. तर ‘कुमार’ला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.
मोरो केशव दामले व वसंत पोतदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सादर अभिवादन.🙏
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈