सौ. उज्ज्वला केळकर
ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
शरदिनी डहाणूकर (१९४५- ४ऑगस्ट २०१२)
शरदिनी डहाणूकर या भिकू पै घुंगट यांच्या कन्या. ते मुंबईला प्रख्यात डॉक्टर होते. शरदिनी यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. १९६९ मधे त्या एम.बी.बी.एस. झाल्या. अमेरिकेत राहून त्यांनी जननांग वैद्यक आणि प्रसूतिशास्त्रात उमेदवारी केली. औषधी शास्त्रात त्यांनी एम. डी. केले .भारतीय आयुर्वेदिक शास्त्रात आणि वनस्पती शास्त्रात त्यांना खूप रस होता. भारतात आल्यावर त्यांनी वेणी माधवशास्त्री जोशी यांच्याकडे आयुर्वेदाचे ५ वर्षे शिक्षण घेतले. त्या आधारे त्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आणि त्यांचा औषधोपचरात होणारा उपयोग यांच्याकडे आधुनिक अॅुलोपॅथिक नजरेने पहाण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग प्रस्थापित केला.
मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात त्यांच्या प्रयत्नाने आयुर्वेद संशोधन केंद्र सुरू झाले. त्यांच्या संशोधनाने, भारतात अस्तीत्वात असलेल्या परंपरागत वैद्यकीय ज्ञानाचा, आधुनिक कसोट्यांवर पडताळा घेता आला. या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
शरदिनी डहाणूकर आणि उर्मिला थत्ते यांनी मिळून औषधी व वनस्पती शास्त्रावरची अनेक पुस्तके लिहिली. शरदिनीताईंचे लेखन मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषातून झालेले आहे. वृक्ष, फुले आणि वंनस्पतींवरची त्यांची अनेक मराठी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
शरदिनी डहाणूकर यांची काही मराठी पुस्तके. –
१. औषधे आणि आपण, २.पांचालीची थाळी, ३.फुलवा, ४. मानस्मरणीचे मणी, ५. सगे सांगाती, ६. वृक्षगान, ७. हिरवाई.
आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
सौ. उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈