सौ. गौरी गाडेकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
र. वा. दिघे
रघुनाथ वामन दिघे (25 मार्च 1896 – 4 जुलै 1980) हे ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक होते.
ते बी.ए., एलएल. बी. होते. त्यांनी पुणे व पनवेल येथे 16 वर्षे वकिली केली. नंतर ते खोपोलीजवळच्या विहारी येथे राहून लेखन व शेती करू लागले.
ते हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल 1954-55 साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’म्हणून त्यांचा गौरव केला.
1940-45 साली र. वां. नी शेतकऱ्यांच्या कळीचे प्रश्न आपल्या लेखनातून मांडले. आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. ‘फक्त शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करा’, ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे विचार त्यांनी त्याकाळी आपल्या कादंबऱ्यांतून मांडले होते.
त्यांच्या कादंबऱ्या बहुधा ग्रामीण पार्श्वभूमीवरील असत. त्यांचे नायक शेतकरी व वारकरी असत. ते संतांच्या शिकवणीनुसार नैसर्गिक आपत्तींशी झगडा देत.
त्यांच्या साहित्यात नाट्यपूर्ण, साहसी घटना, अद्भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णन, ठसठशीत व्यक्तिदर्शन व ग्रामीण जीवन यांचे प्रत्ययकारी चित्रण आढळते.
र. वां.नी ‘पानकळा’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’, ‘पड रे पाण्या’, ‘निसर्गकन्या रानजाई’, ‘गानलुब्धा मृगनयना’ वगैरे 11 कादंबऱ्या,’सोनकी’, ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’ इत्यादी 6 कथासंग्रह, ‘माझा सबूद’, ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड'(इंग्रजी) इत्यादी 3 नाटके व ‘गातात व नाचतात धरतीची लेकरं’ हा लोकगीतसंग्रह एवढे बहुविध साहित्य लिहिले आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग. ल . ठोकळ यांनी नंतर पूर्ण केली.
त्यांच्या ‘पाणकळा’वर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला.
र. वां.च्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ हा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर यांनी लिहिला आहे.
डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र. वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून ठाकूर यांनी पीएच.डी. मिळवली.
1940 साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ व ‘र. वां.ची ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला.
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी र. वां.चा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.
अशा र. वा. दिघेंचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
☆☆☆☆☆
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, अक्षरनामा.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈