चित्र – सौ. वंदना अशोक हुळबत्ते

दीपोत्सवी या सजली धरणी
चांदण्याच जणू आल्या भूवनी
मंगलवाद्ये मंगल समयी
लक्ष्मी पुजन घराघरातूनी

 – नीलांबरी शिर्के

? || शुभ दीपावली || ?

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ४ नोव्हेंबर  –  संपादकीय  ?

आली दिवाळी आनंदाची

आज दिवाळी. आज लवकर उठून ‘मोती’स्नान झाले आहे. घरा-दारात, अंगण-ओसरीत पणत्यांची आरास सजली आहे . इमारती विद्युत माळांनी लखलखत आहेत.

आज श्रीकृष्णाने नरकासुर या दुष्ट राक्षसाचा पहाटे वध  केला आणि सारा प्रदेश भयमुक्त केला, अशी पुराणकथा आहे. म्हणून सकाळी उठून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करायचा ही परंपरा॰  उत्तरप्रदेश , दिल्ली इ. भागात ज्याप्रमाणे दसर्‍याला रावण दहन करण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे गोव्यामधे नरकासुर दहनाची प्रथा आहे. तिथे वेगवेगळ्या भागात नरकासुराचे कागदी पुतळे तयार करतात. त्याच्या पोटात फटाके वगैरे दारू भरतात. आदल्या रात्री नरकासुराची मिरवणूक काढली जाते. आपण नाही का अनंत चतुर्दशीला गणपतीची मिरवणूक काढत, तशी इथे नरकासुराची मिरवणूक निघते आणि नरक चतुर्दशीच्या पहाटे त्याचे दहन केले जाते.

दिवाळी हा दिव्यांचा उसव. तुमचं सारं जीवन प्रकाशाने उजळो, असा संदेश देणारा हा दीपोत्सव. पण काहींच्या जीवनातला अंधार या दीपोत्सवानेही जात नाही. अशांच्यासारख्या जीवनात प्रकाशाची वाट उलगडणारी एक व्यक्ती म्हणजे डॉ. तात्याराव लहाने. आज थोडं त्यांच्याविषयी—

सरकारी रुग्णालये म्हणजे अनास्था, निष्काळजीपणा या विचारांना छेद देणारा, रुग्णासेवेचं एक आगळं वेगळं मॉडेल म्हणजे तात्याराव लहाने. त्यांनी मुंबईच्या जे.जे. इस्पितळाच्या नेत्रशल्य चिकित्सा विभागाला नेटका, सुबक आकार आणला आहे. आपल्या टीमला रुग्णसेवेसाठी कटिबद्ध आणि कार्यक्षम बनवून, त्यांनी लाखो गरीब, गरजूंना दृष्टी मिळवून दिली. २००७ पर्यन्त त्यांनी मोतीबिंदूच्या एक लाख यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्याबद्दल शासनाने त्यांना २००८ मधे ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. आपल्या विभागात स्वच्छता राहते आहे ना, इकडे त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिले. २००४मधे जे.जे. रुग्णालयात रेटिना विभागाची सुरुवात त्यांच्या प्रयत्नाने झाली. . अद्ययावत यंत्रणेने आपला विभाग त्यांनी सुसज्ज केला.

लातूर जिल्ह्यातील मकेगाव या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण अत्यंत गरिबीत गेले. शाळा शिकताना गुरे राखण्याचं काम त्यांनी केले.  पाझर तलाव फोडण्याचंही काम त्यांनी केलं. १० वी पर्यन्तचे त्यांचे शिक्षण त्यांच्या गावातच झाले. पुढे त्यांची हुशारी आणि शिक्षकांची मदत यामुळे ते डॉक्टर झाले. १९८१ साली त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून मेडिसीनची पदवी घेतली. या काळात त्यांनी आपल्या रूममेटचा स्वैपाक करून आपल्या जेवणाची सोय केली. ‘कमवा आणि शिका’ योजने अंतर्गत झाडांना पाणी घालण्याचं ते काम करत. अशी छोटी छोटी कामे करत ते एम.बी.बी.एस. झाले. १९८५ मधे त्यांनी ऑप्थल्मॉलॉजीमधे एम.बी.बी.एस.केले. 

९१ साली त्यांच्या दोन्ही किडन्या फेल गेल्या. त्यामुळे आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावं लागायचं. त्यावेळी ते आंबेजोगाईत होते. तिथे ही सोय नसल्यामुळे त्यांनी मुंबईला बदली मागून घेतली. ९५ साली त्यांच्या आईची किडनी त्यांना बसवण्यात आली. .हा आपला दुसरा जन्म आहे आणि तो गोर-गरिबांची सेवा करण्यातच घालवायचा, असा त्यांनी निश्चय केला आणि त्याप्रमाणे ते वागले. आपल्यातला सेवाभाव त्यांनी आपले सहकारी आणि कर्मचारी यांच्यातही  रुजवला.

चंद्रपूर, नंदूरबार सारख्या दुर्गम समजल्या जाणार्‍या भागात, पब्लिक हेल्थ सेंटरच्या माध्यमातून कॅम्प घेतले. माहिती दिली. शस्त्रक्रिया केल्या. वंचित आणि गरजूंना सेवा पुरवण्यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. दर वर्षी ते बाबा आमटे यांच्या आनंदवनात जात. तेथील कुष्ठरोग्यांवर आवश्यकतेप्रमाणे शस्त्रक्रिया करत. नेत्रदानासाठीही त्यांनी लोकांना उद्युक्त केले.     

समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात (१८फेब्रुवारी २०११) त्यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार मिळाला. त्यांना छ्त्रपती शाहू पुरस्कारही २०२०ला  मिळाला. कधी कधी १८ ते २३ तास काम या कर्मयोग्याने केले आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या जीवनावर चित्रपटही निघाला आहे.

अशा कर्मयोगी डॉ. तात्याराव लहाने यांना आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी विनम्र अभिवादन  ?

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

 

संदर्भ : – १) कऱ्हाड शिक्षण मंडळ “ साहित्य-साधना दैनंदिनी. २) माहितीस्रोत — इंटरनेट  /*खरे खुरे आयडॉल्स- युनिक फिचरच्या पुस्तकावरून

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments