श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
बालकवी
मराठी वाङ्मयात ‘निसर्ग कवी’ म्हणून ज्यांचं नाव आजही कौतुकाने, आदराने, सन्मानाने घेतले जाते, ते बालकवी म्हजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० मध्ये झाला. ते अल्पायुषी होते. अवघं २८ वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. ५ मे १९१८ मधे त्यांचं निधन झालं. लहानपणापासून ते कविता करायचे. रेव्ह. ना. वा. टिळक यांच्या सहवासात त्यांचा काही काळ गेला. त्यांची प्रतिभा ओळखून, टिळकांनी त्यांना आपल्या घरी नेले. ते आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले.
लक्ष्मीबाईंनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणी दिल्या आहेत.
१९०७ मध्ये जळगाव येथे पहिले महाराष्ट्र कवीसंमेलन झाले. त्याचे अध्यक्ष होते, डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर. या संमेलनात ठोंबरे यांनी कविता वाचल्यावर कीर्तिकरांनी त्यांना ‘बालकवी’ ही पदवी दिली.
बालकवींनी निसर्गातील आनेक घटकांवर कविता केल्या. त्यामध्ये निसर्गातील घटकांचे मानवीकरण केलेले दिसते. उदा. ‘फुलराणी’, औदुंबर’ वास्तव वर्णनापेक्षा कल्पनेचा साज चढवून केलेलले वर्णन त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या अनेक कवितेतून उदासीनता व्यक्त झालेली दिसते.
बालकवींच्या कवितेला आज 100 वर्षे होऊन गेली, तरी त्यांची कविता ताजी वाटते. नव्याने कविता लिहू लागलेली कविमंडळी आजही त्यांचं अनुकरण करताना दिसतात. ‘आनंदी आनंद गडे’, फुलराणी, औदुंबर, श्रवणमास, निर्झरास इ. त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत.
बालकवींच्या निवडक कविता असलेली पुस्तके, वी.वा.शिरवाडकर, ना. धों महानोर, अनुराधा पोतदार, नंदा आपटे इ. नी संपादित केली आहेत.
बालकवींवर कृ. बा. मराठे, विद्याधर भागवत, दमयंती पंढरपांडे इ. नी लिहीले आहे. प्दमावती जावळे यांनी बालकवी आणि हिन्दी कवी सुमित्रानंदन पंत यांचा तौलनिक अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे. आज त्यांचा स्मृतीदिन. त्या निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈